कृषी पर्यटनाने द्राक्षांचे महत्व वाढेल ! जिल्ह्याला द्राक्ष राजधानीचा मान !!
जिल्ह्याला द्राक्ष राजधानीचा मान
नाशिक ( प्रतिनिधी ):- कृषी पर्यटनाने द्राक्षांचे महत्व अधिक वाढेल. शेतकऱ्यांचे दर्जेदार उत्पादन वाढून उत्तमभाव मिळेल. नाशिक जिल्हा द्राक्ष राजधानी ठरली आहे असे प्रतिपादन खा. हेमंत गोडसे यांनी केले. ते नाशिक द्राक्ष महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. व्यासपीठावर जगदीश होळकर, ट्रॅव्हल असोसिएशनचे अध्यक्ष राकेश बकरे, दत्ता भालेराव, सुला वाईनचे उपाध्यक्ष संजीव पैठणकर, सोमा वाईनचे अधिकारी पाचपाटील, कृषिविभाग अधीक्षक सोनवणे उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. विभागीय प्रकल्प उपसंचालक मधुमती सरदेसाई - राठोड यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.
द्राक्षपंढरी असा नावलौकिक असणाऱ्या नाशिकमध्ये ग्रेप हार्वेस्ट महोत्सवाने रंगत आणली आहे. विभागीय उपसंचालक पर्यटन संचालनालय यांच्या मार्फत दोन दिवसांच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. महाराष्ट्र पर्यटन महामंडळाच्या गंगापूर धरणाजवळ असलेल्या ग्रेप पार्क रिसॉर्ट येथे ही संधी पर्यटकांना उपलब्ध झाली. अतिशय सुंदर निसर्गरम्य वातावरणाने बाहेरून आलेले पर्यटक लुब्ध झाले. उद्घाटन सोहोळा होण्यापूर्वी सकाळी ८ वाजता द ग्रेस ग्रेप एस्केप फॅमिली कार ट्रेझर हंट हा कार्यक्रम रंगला. त्यात २० कार सहभागी झाल्या. नाशिक परिसरातील पर्यटन स्थळांची माहिती व्हावी व अधिक चालना मिळावी हा त्यामागे उद्देश होता. उद्घाटन झाल्यावर लगेचच ११ वाजता द्राक्षांपासून विविध चविष्ट खाद्यपदार्थ तयार करण्याची स्पर्धा घेण्यात आली. वॉव ग्रुपने त्याचे संयोजन केले. दुपारी १ वाजता लोकनृत्य सादरीकरण झाले. सायंकाळी ४ वाजता जगप्रसिद्ध आदिवासी वारली चित्रकला प्रशिक्षण कार्यशाळा घेण्यात आली. आदिवासी कलाकार देवराम पारधी यांनी प्रात्यक्षिक सादर करून उपस्थित सहभागी कलारसिकांना मार्गदर्शन केले. त्यानंतर आसमंतात नाशिक ढोल घुमला. शिवसंस्कृती ढोल ताशा पथकातील युवक युवतींनी त्यात सहभाग नोंदवला. रंगारंग फॅशन शो झाला. कलादालनात नाशिकच्या अनेक चित्रकारांच्या कलाकृती प्रदर्शित करण्यात आल्या आहेत. रिसॉर्टच्या प्रांगणात द्राक्षांसह विविध दालने मांडण्यात आली आहेत.
पर्यटन आणि द्राक्ष उद्योग संस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने एकाच छताखाली अभिनव व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात आले. द्राक्षांच्या ५३ प्रजाती असून त्यांची स्पर्धा ठेवल्याने पर्यटकांना हे कृषीवैभव जाणून घेता आले. उद्या रविवारी महोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी विनेयार्ड व वायनरी टूर आखण्यात आली आहे. संध्याकाळी नाशिकचा प्रसिद्ध एम. एच.१५ बँडसोबत म्युझिकल कार्यक्रम होईल. याशिवाय कॅलिग्राफी कार्यशाळा होईल. विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांची रेलचेल असेल. पर्यटकांनी महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा