डॉ. रेणू स्वरूप यांना यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान ! कष्टकरी शेतकऱ्यांच्या शेतीला विज्ञानाची जोड आवश्यक-शरद पवार !!
यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार डॉ. रेणू स्वरुप यांना प्रदान
कष्टकरी शेतकर्यांच्या शेतीला विज्ञानाची जोड आवश्यक - शरद पवार
न्यूज मसाला वृत्तसेवा,
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) : यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार यंदा जैवतंत्रज्ञान विभागाच्या माजी सचिव डॉ. रेणू स्वरुप यांना यशवंतराव चव्हाण यांच्या १०९ व्या जयंतीनिमित्ताने प्रतिष्ठानचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. ५ लाख रुपये, शाल, श्रीफळ व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे.
यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार समितीचे अध्यक्ष अनिल काकोडकर यांनी राष्ट्रीय पुरस्काराबद्दल थोडक्यात माहिती दिली. राष्ट्रीय पुरस्काराच्या मानपत्राचे वाचन प्रतिष्ठानचे कोषाध्यक्ष हेमंत टकले यांनी केले. यावेळी अरुण गुजराथी, खासदार सुप्रिया सुळे याही उपस्थित होत्या.
मी केंद्रात कृषिमंत्री म्हणून शपथ घेतली, त्यावेळी देशात धान्यटंचाई असल्याने विदेशातून धान्य आयात करण्याचा निर्णय घेतला होता. ती फाईल घेऊन सचिव माझ्याकडे आले, त्यावेळी मी अस्वस्थ झालो. आपण बाहेरच्या शेतक-यांवर अवलंबून रहायचे नाही तर इथेच प्रश्न सोडवायचे, यासाठी कष्टकरी शेतक-यांच्या शेतीला विज्ञानाची जोड देण्याची आवश्यकता होती, त्यानंतर आपण केवळ अन्नधान्याचा प्रश्न सोडवला नाही तर गव्हाचे निर्यातदारदेखील झालो, यात संशोधकांचे मोठे योगदान लाभले, असे शरद पवार यांनी यावेळी सांगितले. तसेच गेली ३० वर्षे संशोधन क्षेत्रात कार्यरत राहिलेल्या संशोधकास हा पुरस्कार मिळत असल्याबद्दल आनंदाची बाब असल्याचेही सांगितले.
कोरोना संसर्ग सुरु झाला तेव्हा आपल्या देशात आरटीपीसीआर चाचण्यांचे संच फार कमी होते, आपण विदेशावर अवलंबून होतो. मात्र केवळ ६० दिवसांत आपण या चाचण्यांच्या बाबतीत स्वयंपूर्ण झालो, दररोज १० लाख संच उपलब्ध करण्याची क्षमता आपण निर्माण केली, यामागे संशोधकांचा सहभाग मोठा होता, असे विचार डॉ. स्वरुप यांनी व्यक्त करून पुरस्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा