अध्यात्माचा महामेरू पुंडलिक नाना जायभावे !
अशा महामेरू पुंडलिक नाना यांच्या आज सकाळी ०६:४५ ला अकाली "एक्झिट" वर जी.पी. खैरनार यांनी लिहीलेली शब्द पुष्पांजली !!
अध्यात्माचा महामेरु पुंडलिक उर्फ नाना सुकदेव जायभावे काळाच्या पडद्याआड !
******************************
नाशिक शहरातील मोरवाडी येथील रहिवासी असलेले स्व. सुखदेव भावराव जायभावे यांचे तीन नंबरचे पुत्र पुंडलिक उर्फ नाना सुखदेव जायभावे यांचे शुक्रवार दिनांक ११मार्च, २०२२ रोजी सकाळी ६.४५ वाजता हृदय विकाराच्या झटक्याने दुःखद निधन झाले. पुंडलिक उर्फ नाना सुकदेव जायभावे हे किसान काँग्रेस आघाडीचे जिल्हा अध्यक्ष श्री.संतु पाटील जायभावे, नाशिक महानगरपालिकेचे माजी नगरसेवक तथा कर्मवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्था, नाशिकचे सहचिटनीस ऍड. श्री. तानाजी आप्पा जायभावे, नाशिक महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका श्रीमती इंदुबाई सुदाम नागरे व प्रथितयश बांधकाम व्यावसायिक श्री. समाधान आण्णा सुकदेव जायभावे यांचे बंधू होत !
लक्ष्मीआई व सुकदेव जायभावे यांना सात मुले व एक मुलगी असा परिवार होता. लक्ष्मीआई यांचे माहेर नाशिक जवळील पिंपळगाव बाहुला येथील गामने कुटुंबातील. पिंपळगाव येथील गामने कुटुंब तसे सांप्रदायिक पंथाचे. त्यामुळे आई लक्ष्मीआई यांच्या संपूर्ण आयुष्यात सांप्रदायिक पंथाच्या निस्सीम भक्तीच्या अभ्यासाचा प्रभाव लक्ष्मीआई यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील प्रत्येक घटकात अनुभवास मिळाला. आई लक्ष्मीआई यांचा सांप्रदायिक वारसा आदरणीय पुंडलिक जायभावे यांनी पुरेपूर जपण्याचा प्रयत्न केला. कौटुंबिक परिस्थिती हलाखीची असतांना सुरवातीच्या काळात नाना जायभावे यांनी मोठ्या कुटुंबास आर्थिक हातभार लागावा म्हणुन व्ही. आय. पी. कंपनीत कामगार म्हणून काम केले. सडपातळ शरीरयष्टी, गोरा रंग, लांब नाक, अजाण बाहु, पांढऱ्या शुभ्र कपड्यांचा पेहराव व बोली शब्दात आदरयुक्त दरारा याप्रमाणे पुंडलिक जायभावे यांचे वर्णन करता येईल. पुंडलिक जायभावे यांचे मृत्यूसमयी वय साधारण ६२ वर्ष होते.
नाशिक शहरातील मोरवाडी गावातील सुखदेव जायभावे व लक्ष्मीआई जायभावे यांचं जायभावे कुटुंब हे शेतकरी, कुटुंब वत्सल व आस्था प्रेम मनापासून भरलेलं कुटुंब !आपल्या आठ बहीण भावांच्या उन्नतीसाठी खांद्याला खांदा लाऊन सचोटीने लढणारे नाना आपल्यात नाहीत हे नमूद करतांना शब्द जड होतात. जायभावे कुटुंबाने प्रामाणिक कष्टाच्या जोरावर आदर्श व नाशिक शहरातील प्रतिष्ठित घराणे म्हणुन नावारुपास आलेले आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही. लक्ष्मीआई व सुखदेव जायभावे यांना अनुक्रमे श्री. संतु जायभावे, श्री. बाळु जायभावे, श्री. पुंडलिक जायभावे, श्री.रामदास जायभावे, ऍड. श्री. तानाजी जायभावे, श्री. ज्ञानेश्वर जायभावे, श्री. समाधान जायभावे असे सात भाऊ व ग.भा.इंदूबाई सुदाम नागरे ही एक बहीण याप्रमाणे जायभावे कुटुंबाची ओळख सांगता येईल. यातील पुंडलिक उर्फ नाना जायभावे यांचे अकाली जाणे खुपचं दुःखदायक व क्लेशदायक आहे.
जायभावे कुटुंबाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व जायभावे कुटुंब हे निर्व्यसनी व शुद्ध शाकाहारी आहे. आई लक्ष्मीआई व सुखदेव जायभावे यांच्या संस्कारामुळे सात भाऊ व एक बहीण यांचे एकमेकांवर असलेले प्रेम, आस्था, जिव्हाळा व कुटुंबातील प्रत्येक घटकाबरोबर असलेली आत्मीयता ही प्रत्येक जायभावे कुटुंबात पुरेपूर आहे याचा प्रत्यय येतो.
आदरणीय नाना जायभावे यांना साखर वाढीचा त्रास होता, कारणास्तव त्यांच्या तळपायास असलेली जखम त्यांना कायम सतावत असे. याही कठीण परिस्थितीत दुर्धर आजारावर मात करण्यासाठी आदरणीय नाना जायभावे दररोज सकाळी उठून काही किलोमीटर सायकलिंग करायचे. आपला छंद म्हणुन पंढरपूर विठ्ठलाची आषाढी एकादशीची वारी नाना सायकलिंग करुन करत असत. त्रिमूर्ती चौकात सकाळी लवकर उठुन आपल्या सदगुरु हॉटेलच्या व्यवसायाच्या माध्यमातून दिनक्रम सुरू होत असे. सद्गुरु हॉटेल चालू केल्यानंतर नाना जायभावे यांनी दुर्गा माता मंदिराची प्राणप्रतिष्ठा केली. आपला हॉटेल व्यवसाय सांभाळून सामाजिक बांधिलकी म्हणुन व आध्यात्मिक ओढ असल्याने नाना जायभावे दुर्गा माता मंदिराची प्रेम भावनेने व श्रद्धेने पूजा करत असत. दुर्गामाता मंदिराची निगराणी, जीर्णोद्धार व मंदिराची निगा ठेवण्याचे काम आदरणीय नाना जायभावे अविरत करत असे. नवरात्र उत्सव काळात नाना दुर्गा माता भक्तांच्या सेवेत अहोरात्र तल्लीन होत असत.
लक्ष्मीआई व सुखदेव जायभावे यांच्या सातही मुलांना प्रत्येकास आदराची दादा, नाना, आप्पा, भाऊ, माऊली व आण्णा ही आदराची टोपण नावे आजी लक्ष्मीआई यांनी ठेवलेली होती. त्यातील आई लक्ष्मीआई यांच्या पाठोपाठ आदरणीय नाना जायभावे यांनी अचानक इहलोकी निघून गेले. आदरणीय नाना जायभावे आपली आई लक्ष्मीआई यांची सेवा करण्यास अवेळी स्वर्गात गेले की काय ?
जायभावे कुटुंब तसे मोरवाडी येथील मुळ रहिवासी परंतु हे कुटुंब सद्य स्थितीत जनकनगरी, खुटवडनगर येथे वास्तव्यास आहे. आदरणीय नाना जायभावे यांच्या पश्चात पत्नी विजयाताई, कन्या आरती, पूजा मुलगा प्रवीण व नातू निवेश असा परिवार आहे. आदरणीय पुंडलिक उर्फ नाना जायभावे यांच्या अकाली जाण्याने जायभावे कुटुंब, त्यांचे आप्तेष्ट यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. परंतु याही पलीकडचे दुःख आदरणीय नानांवर प्रेम करणाऱ्या मोरवाडी ग्रामस्थांसह, जनकनगरी, सावतानागर व खुटवडनगर वाशीयांना झाला आहे.
आदरणीय नाना जायभावे यांच्या शिकवणीची शिदोरी मुलगा, मुलगी, नातवंड यांना तर मिळालीच, परंतु नाना जायभावे ज्या ज्या ठिकाणी वास्तव्यास गेले तेथील रहिवासी समाज घटकांना मिळाली, हे अभिमानाने नमूद करावे लागेल. आई लक्ष्मी आई यांनी नाना जायभावे यांचे नाव पुंडलिक ठेवले होते. विठ्ठलाच्या निस्सीम भक्त असणाऱ्या लक्ष्मीआई या पुंडलिक उर्फ नाना जायभावे यांच्या रुपात साक्षात पांडुरंगास बघत असणार यात शंका नाही.
आदरणीय नाना जायभावे यांच्या अकाली जाण्याचे दुःख जायभावे कुटुंबातील नानांचे भाऊ, बहीण, चिरंजीव प्रवीण, मुली आरती,पूजा पुतणे व पुतण्या यांना झाले असणार व याची सल भविष्यात संपूर्ण जायभावे कुटुंबास जास्त जाणवेल यात शंका नाही.
आमचे जेष्ठ बंधुतुल्य पुंडलिक उर्फ नाना जायभावे यांना आई दुर्गामाता सदगती देवो, ही विनम्र प्रार्थना !
लेखन:- जी.पी.खैरनार, नाशिक
भावपुर्ण श्रध्दांजली,
उत्तर द्याहटवाते क्रॉम्पटन कंपनीत कामगार प्रतिनिधी सुद्धा होते
भावपूर्ण श्रद्धांजली
हटवा🙏💐🙏