स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या महिलांना ‘प्रबोधन’ तर्फे शिष्यवृत्ती !
स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या महिलांना ‘प्रबोधन’ तर्फे शिष्यवृत्ती !
महिला दिनानिमित्त अभियान : महिलांच्या पंखांना मिळणार बळ !
नाशिक(प्रतिनिधी)::- महिलांना प्रशासनात करिअर करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. एमपीएससी, यूपीएससी, बँक भरती, सरळसेवा भरती परीक्षा सारख्या स्पर्धा परिक्षांच्या माध्यमांतून अनेक सरकारी नोकऱ्यांमध्ये महिला तसेच विद्यार्थीनी आपले करिअर घडवू शकतात. मात्र योग्य मार्गदर्शन अन् बिकट आर्थिक परिस्थितीमुळे गुणवत्ता असून सुद्धा अनेक महिला, विद्यार्थीनी करिअरपासून वंचित राहतात. अशा महिला तसेच विद्यार्थीनींना प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेअंतर्गत ‘रेडिओ एमपीएससी गुरु’ च्या वतीने १०० टक्के शिष्यवृत्ती योजना अभियान राबविले जाणार आहे, अशी माहिती प्रबोधन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सुनील पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
या अभियानाबाबत सांगताना सुनील पाटील म्हणाले की, ‘महिला दिनाचे औचित्य साधून या अभियानास प्रारंभ करण्यात येणार असून, या अभियानाअंतर्गत एमपीएससी, युपीएससी या स्पर्धा परीक्षांची तयारी कशी करावी, विषयांचा अभ्यास कसा करावा, परीक्षांच्या अखेरच्या टप्प्यापर्यंत अभ्यासाचे नियोजन कसे करावे, याचे सखोल मार्गदर्शन या क्षेत्रातील तज्ज्ञांमार्फत करण्यात येणार आहे. शिष्यवृत्ती योजना ही प्रबोधन बहुुद्देशीय संस्थेअंतर्गत रेडिओ एमपीसीएसी गुरुच्या वतीने स्पेक्ट्रम अकॅडमीतर्फे दिल्या जाणाऱ्या एमपीएससी, युपीएससी, रेल्वे, स्टाफ सिलेक्शन, बँकिंग, सरळसेवा, पोलीस भरती अशा सर्व प्रशिक्षणासाठी लागू असणार आहे. शिष्यवृत्तीसाठी २० मार्च आणि २७ मार्च रोजी ऑनलाइन आणि ऑफलाइन पद्धतीने परीक्षा घेतली जाणार आहे. ही परीक्षा बहुपर्यायी स्वरूपाची असून, एकूण दोनशे गुणांची असणार आहे. त्यामध्ये शंभर प्रश्न विचारले जाणार असून ते मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, सामान्य अध्ययन, चालू घडामोडींवर असणार आहेत.
दरम्यान, प्रबोधन बहुउद्देशीय संस्था ही एक अशासकीय संस्था असून, २००८ पासून संस्था कार्यरत आहे. शैक्षणिक, सामाजिक, आरोग्य, कृषी, पर्यावरण, युवक कल्याण अशा विविध क्षेत्रात महाराष्ट्र व गोवा राज्यात कार्यरत आहे. संस्थेमार्फत विविध प्रकारचे प्रशिक्षण यापूर्वी यशस्वीपणे राबविले आहेत. शैक्षणिक क्षेत्रात करियर मार्गदर्शन, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, कौशल्य विकास प्रशिक्षण यासारख्या उपक्रमातून रोजगार व स्वयंरोजगार निर्मितीसाठी संस्थेमार्फत विविध उपक्रम राबविले जात असून, त्यातून आजवर मोठ्या संख्येने युवकांना रोजगार व स्वयंरोजगार उपलब्ध झाले आहेत. त्याचबरोबर संस्थेच्या माध्यमातून स्वच्छता अभियान राबविणे, वृक्ष लागवड व संवर्धन करणे, युवकांमध्ये एड्स व व्यसनाधिनतेविषयी प्रबोधन करणे, विविध शैक्षणिक स्पर्धा आयोजित करणे अशी अनेक समाजोपयोगी कामे सातत्याने करीत आहे.
---
नांव नोंदणी आवश्यक !
शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठी नाव नोंदणी आवश्यक असून, नोंदणी शुल्क शंभर रुपये ठेवण्यात आले आहे. त्याचबरोबर दोनशे गुणांचा पेपर देणे अनिवार्य असणार आहे. याबाबतच्या अधिक माहितीसाठी 9225129681 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
---
भारतातील पहिला रेडिओ-
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी संस्थेच्या माध्यमातून भारतातील पहिला ‘रेडिओ एमपीएससी गुरु’ हा रेडिओ सुरू करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना तो सहजपणे गुगल प्लेस्टाेरवरून डाऊनलोड करता येऊन कुठेही, कधीही आपल्या स्मार्टफोनवर ऐकता येऊ शकतो. तोही पूर्णपणे मोफत. या रेडिओच्या माध्यमातून स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा लाभ होत आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा