आम्ही चालवू हा कलावारसा...
आम्ही चालवू हा कलावारसा...
आदिवासी वारली चित्रशैलीला ११०० वर्षांची प्रदीर्घ परंपरा आहे. या कलेच्या प्रसार - प्रचारासाठी माझे आजोबा पद्मश्री जिव्या सोमा म्हसे यांनी खूप मोठे योगदान दिले. अवघे आयुष्य वेचले. त्यांनी अक्षरशः क्रांती घडवली व चार भिंतीत असलेल्या वारली कलेला जगाचे दरवाजे उघडून दिले. आदिवासी पाड्यांवरची आमची ही चित्रभाषा जगातील अनेक देशांपर्यंत पोहोचली आहे. त्यात आमच्या म्हसे परिवाराचा मोलाचा वाटा आहे, याचा मला अभिमान वाटतो. माझे भाऊ, बहिणी सुरेख चित्रे रेखाटतात. आमचा हा समृद्ध कलावारसा आम्ही नक्कीच निष्ठेने पुढे चालवू. हा ठेवा पुढील पिढ्यांच्या हाती सोपविण्यात आमचे योगदान नक्कीच देऊ. सुनीता बरफ मनापासून असे सांगत होती.
डहाणू तालुक्यातील गंजाड येथे म्हसे परिवारात सुनीता हिचा जन्म १९८२ साली झाला. पद्मश्री जिव्या यांच्या सदाशिव या मुलाची सुनीता ही मोठी मुलगी. पुढच्या पिढीतील ती सर्वात मोठी असल्याने आजोबांचा सहवास तिला सर्वात जास्त लाभला. बालपणीच आपले घर परिसरातल्या इतरांपेक्षा काहीसे वेगळे आहे, याची तिला जाणीव झाली.
ती म्हणते,"आजोबा, वडील व काका बाळू वारली पेंटिंग करायचे. ते बघतच मी मोठी होत होते. खेळण्यापेक्षा माझा कल कलेत रमण्याचा होता. छोटे कागद घेऊन त्यावर पेन्सिलने माणसे, पशुपक्षी, झाडे, डोंगर रेखाटण्यात मी तासनतास रमून जायची. पहिली ते सातवीपर्यंत जवळच्या जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण झाले. आठवी ते दहावीपर्यंत रानशेत येथील आश्रमशाळेत राहून शिक्षण घेतले. कासा येथील महाविद्यालयात अकरावी व बारावीचे शिक्षण झाले. डहाणूच्या महाविद्यालयातून इकॉनॉमिक्समध्ये बी.ए. पूर्ण केले. साधारणपणे दहावीनंतर वारली कलेकडे मी गांभीर्याने बघायला लागले. आजोबांनी माणूस हाच मध्यवर्ती मानून आयुष्यभर चित्रे रंगवली. मलासुद्धा माणूस, त्याच्या रूढी- परंपरा, जीवनशैली, यांचे आकर्षण वाटते. निसर्ग आणि माणूस यातील नातेसंबंध मला कायमच प्रेरणादायी वाटतात. त्यांनाच मी चित्ररूप देते."
सुनीताशी बोलताना सतत जाणवत होते की, वारली कलेमुळेच तिचे बालपण आनंदात गेले. या कलेमुळेच म्हसे परिवाराला वेगळी ओळख मिळाली. आजोबा जिव्या यांनी जागतिक कॅनव्हासवर आपली लखलखती नाममुद्रा उमटवली. त्यांनी अनेक देशांचा प्रवास केला. तेथील सुसज्ज कलादालनांमध्ये त्यांची चित्रप्रदर्शने झाली. पुढे वडील सदाशिव व काका बाळू यांनी जपान व इतर देशांमध्ये जाऊन म्हसे परिवाराचा कलाप्रसार अधिक व्यापक स्तरावर नेला. या साऱ्याचा अभिमान तिच्या शब्दाशब्दांत व्यक्त होत होता. वारली कला ही 'संवाद साधण्याची चित्रलिपी' म्हणूनच तिच्याकडे बघायला हवे. त्यातील प्रतीकात्मकता, सांकेतिक आकार समजून घ्यायला हवेत. वारली चित्रे केवळ सजावट म्हणून कधीच रेखाटली जात नाहीत. ही कला निसर्ग, पर्यावरण यांच्याकडे आत्मीयतेने बघायला शिकवते. त्यामुळेच ती आदिवासी वारली जमातीच्या वैशिष्ट्यपूर्ण जगण्याची व स्वतंत्र अस्तित्वाची ओळख ठरली आहे. नवी पिढी उच्चशिक्षण घेऊन वारली कलेचे नवनवे आयाम, पैलू उलगडते आहे. परंपरागत असे हे कलावैभव प्राणपणाने जोपासत आहे. त्यातून चांगली अर्थप्राप्ती होते व कलेबरोबरच कलाकारांना प्रतिष्ठाही मिळते हे महत्त्वाचे! सुनीता व तिची भावंडे वारली कलेचे जतन करण्याबरोबरच संवर्धन करतील याची खात्री वाटते.
-संजय देवधर
(वरिष्ठ पत्रकार, वारली चित्रशैलीतज्ज्ञ, नाशिक )
*********************************
लग्नचौक रंगविल्याचा क्षण अविस्मरणीय!
सुनीताचे लग्न २००७ साली गंजाड जवळच्या सिकंदर बरफ यांच्याशी झाले. सिकंदर चित्रकलेत जास्त रमत नाहीत. पण हॉटेल व्यवसाय सांभाळून लेखन, कविता करणे, गायन या कला त्यांनी जपल्या आहेत. ते उत्तम खाद्यपदार्थ बनवतात. त्यांचे एक यू-ट्यूब चॅनलही असून, सतत कलात्मक मुशाफिरी सुरू असते. सुनीता मोठी खडकी पाडा येथील अंगणवाडीत शिक्षिका आहे. नोकरी व्यतिरिक्त मिळणाऱ्या फावल्या वेळेत ती सातत्याने वारली चित्रे रंगवते. तिच्या आजोबांच्या स्मरणार्थ वारली चित्रसंग्रहालयाची निर्मिती करण्यात आली आहे. तेथे अनेक कलाप्रेमी पर्यटक भेट देतात. तेथेच सुनीताच्या चित्रांची विक्री होते. चार वर्षांपूर्वी एका लग्नसोहळ्यात तिला लग्नचौक काढण्याची संधी मिळाली. जीवनातील तो क्षण अविस्मरणीय असून, सर्वाधिक समाधानाचा होता असे ती अभिमानाने सांगते. शालेय जीवनात तिला वारली कलेची अनेक प्रमाणपत्रे मिळाली. सह्याद्री वाहिनीच्या 'चालता बोलता' या कार्यक्रमात सहभागी होऊन सुनीताने रौप्यमुद्रा देखील मिळवली. सातवीत शिकणारी तनुश्री व दुसरीत शिकणारी रिद्धी या तिच्या दोन मुली वारली चित्रकलेत प्रगती करत आहेत याचा सुनीताला विशेष आनंद वाटतो.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा