जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम, समन्वय सभेत विविध कामांचे सादरीकरण ग्रामसेवकांनी साधला उत्कृष्ट कामांव्दारे जिल्हा परिषदेशी ‘समन्वय’.
समन्वय सभेत विविध कामांचे सादरीकरण
ग्रामसेवकांनी साधला उत्कृष्ट कामांव्दारे जिल्हा परिषदेशी ‘समन्वय’
नाशिक – जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्हा व तालुकास्तरीय अधिका-यांची समन्वयक सभा आज जिल्हा परिषद सभागृहात घेण्यात आली. एरव्ही आढावा व असमाधानकारक कामाबाबत कानउघाडणी अशाच पारंपरिक पध्दतीने होणा-या समन्वय सभेला छेद देत आज जिल्हयातील विविध कामांमध्ये उत्कृष्ट काम केलेल्या ग्रामसेवकांनी आपल्या कामांचे सादरीकरण करत ग्रामस्तर ते थेट जिल्हास्तर असा उत्तम ‘समन्वय’ साधला. जिल्हास्तरीय यंत्रणेकडून कोणताही आढावा न होता गटविकास अधिका-यांनीच विविध कामांबाबत सविस्तरपणे सादरीकरण केले. नाशिक जिल्हा परिषदेत अशाप्रकारचा पहिलाच अभिनव उपक्रम राबविण्यात आला. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी विविध कामांबाबत सुचना देऊन उत्कृष्ट काम केलेल्या कर्मचारी व अधिका-यांना शाबासकी दिली.
जिल्हा परिषदेच्या वतीने आज तब्बल एक ते दिड वर्षांनंतर तालुकास्तरीय अधिकारी व जिल्हास्तरीय खातेप्रमुख यांच्या उपस्थितीत समन्वय सभेचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती लीना बनसोड यांच्या उपस्थितीत गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून सर्व तालुक्यांमध्ये तालुकास्तरीय आढावा सभा घेण्यात आल्या. यामध्ये विविध योजनांचा, कामांचा आढावा घेण्यात आला. आढावा बैठकीनंतर कामांमध्ये कोणती प्रगती झाली याबाबत आज गटविकास अधिका-यांना सादरीकरण करण्याचे निर्देश देण्यात आले आले होते. त्यानुसार सर्व गटविकास अधिका-यांनी केलेल्या कामांचा आढावा सादर केला. त्याचप्रमाणे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून करण्यात आलेली उत्कृष्ट कामे, माझी वसुंधरा अभियानामध्ये करण्यात आलेली कामे याबाबत जिल्हयातील विविध ग्रामपंचायतीमधून आलेल्या ग्रामसेवकांनी सादरीकरण करुन कशाप्रकारे काम पूर्ण केले, त्याचा ग्रामस्थांना, लाभार्थ्यांना काय फायदा झाला याबाबत माहिती दिली.
यावेळी मार्गदर्शन करताना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी आदर्शग्राम विकासाची त्रिसूत्री असलेल्या पायाभूत सुविधा, सामाजिक सुविधा आणि आर्थिक विकास याबरोबरच मानवी विकास साध्य करण्यासाठी ग्रामसेवकांनी प्रामाणिकपणे काम केल्यास गावात बदल घडणार असून गावाचा कायापालट करण्याची ताकद ग्रामसेवकातच असल्याचे नमूद केले. विविध कामांमध्ये व योजनांमध्ये अतिशय विश्वासाने सोपविलेली जबाबदारी उत्कृष्टपणे पार पाडल्याबाबत त्यांनी उपस्थित ग्रामसेवकांचे अभिनंदन केले. समन्वयक सभेसाठी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अर्जुन गुंडे, ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक उज्वला बावके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) आनंदराव पिंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) रवींद्र परदेशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालविकास) दिपक चाटे यांच्यासह कार्यकारी अभियंता (ग्रापापु) कार्यकारी अभियंता (बांधकाम), कार्यकारी अभियंता (ल.पा), गटविकास अधिकारी, सहाय्यक गटविकास अधिकारी, उपअभियंता (ग्रापापु) आदि उपस्थित होते.
यांनी केले सादरीकरण
हनुमान दराडे (ग्रामसेवक, ग्रापं शिरसाठे ता. इगतपूरी) – माझी वसुंधरा अभियान
भारती देशमुख (ग्रामसेविका, माळेगाव ता. पेठ) – भात खाचरे दुरुस्ती
जी.जी. जाधव (ग्रामसेवक, साल्हेर ता. बागलाण) – भातखाचरे, बांधबंदिस्ती
लिंगराज जंगम (ग्रामसेवक, पिंपळगाव बसवंत ता. निफाड) – माझी वसुंधरा अभियान
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा