वारली पाड्यांवरचा साधासुधा गावगाडा ! अमेरिकेत ही वारली चित्रकलेचा डंका ! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा




वारली पाड्यांवरचा

साधासुधा गावगाडा !

    वारली...महाराष्ट्रातील आदिवासींची एक प्रसिद्ध, कलाप्रेमी जमात. वारली असा शब्द उच्चारताच डोळ्यांसमोर येते ती जगभरात प्रसिद्ध असलेली वारली चित्रकला. पालघर, ठाणे, नाशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात वास्तव्यास असलेल्या आदिवासींनी वारली चित्रकला जगभरात पोहचवली आहे. जागतिक स्तरावर वारली चित्रकलेचा प्रसार होऊन आदिवासींना रोजगार मिळू लागला आहे. आपल्या चित्रांच्या विक्रीसाठी आता हा समाज परदेशात पोहचला असला तरीही; या समाजाची आपल्या गावाशी असलेली नाळ तुटलेली नाही. आजही वारली समाजाचे राहणीमान अतिशय साधे आहे. लहान लहान बांबूंच्या झोपड्यांची वस्ती, घराजवळ केलेली भातशेती आजही महाराष्ट्राच्या आदिवासी ग्रामीण भागात पाहायला मिळते. वारल्यांच्या वस्तीला पाडा म्हणतात. जव्हार, पालघर, डहाणू, तलासरी, सिल्वासा या शहरी भागात मात्र अलीकडे हे चित्र काहीसे बदलत असून, सिमेंट कॉन्क्रीटची जंगले निर्माण होत आहेत. परिणामी वारली संस्कृती, दैनंदिन जीवनशैली व साहजिकच त्यांची निसर्गाभिमुख चित्रशैलीही लोप पावू नये ही नववर्षाच्या प्रारंभी प्रार्थना !
   वारली लोकांचे पाडे  विखुरलेल्या झोपड्यांच्या गटागटांनी वसलेले असतात. वारली जमातीच्या शेतजमिनी एकमेकांच्या घरांना लागून असतात. दहापंधरा लोक आपापल्या शेतजमिनीजवळ राहता यावे, यासाठी एकत्र झोपड्या बांधतात. अशाप्रकारे एकत्र वसवलेल्या झोपड्यांचा पाडा तयार होतो. तीन ते दहा पाडे मिळून एक गाव बनलेले असते. एखादी विहीर किंवा ओढा जवळ आहे असे पाहून तेथे पाडा वसवला जातो. एका पाड्यावर दहाबारा ते तीस चाळीस आणि क्वचित शंभर पर्यंतही घरे असतात.
वारल्यांच्या झोपड्या चौकोनी किंवा आयताकार  असतात. झोपडीची दारे बहुदा पूर्वेकडे ठेवलेली असतात. दारापुढे ओटा व पडवी असते. झोपड्यांच्या भिंती कारवी वनस्पतीच्या, कोवळ्या बांबूच्या केलेल्या असतात. त्याला बुंधी असे म्हटले जाते. झोपडीसाठी छप्परही बुंधीचे बांधतात. काहीजण या छतासाठी बांबूच्या कामट्या वापरतात. बांधणीच्या या पद्धतीला  'ओळंबणे’ असे म्हणतात. जंगलातील झाडांच्या वाखाचा ते दोरीसारखा उपयोग करतात. छपरावर भाताचा पेंढा पसरवतात. पेंढा घालण्यापूर्वी छपरावर सागाची किंवा पळसाची पाने पसरतात. त्यामुळे झोपडीत पावसाचे पाणी येत नाही.
   मुख्य पीक भाताचे असल्यामुळे वारल्यांचा प्रमुख आहार भात आहे. वारली स्त्रिया मातीची चूल बनवतात. स्वयंपाकघराला ओवारा म्हणतात. स्वयंपाक करण्यासाठी चारपाच मातीची मडकी, पातेली, डाव किंवा पळी, तवा आणि लहानसा कालथा हाच त्यांचा संसार ! प्रत्येकाला जेवणासाठी लहान पितळेची थाळी आणि वाडगा असतो. बसण्यासाठी एखादा लाकडी फळीवजा पाटही असतो. त्याला वारली लोक ‘दडी’ म्हणतात. चवळी, तूर, नाचणी वगैरे धान्ये आणि मीठ, चिंच असे जरुरीचे पदार्थ घरात माळ्यावर मडक्यात किंवा टोपल्यात भरून ठेवलेले असतात. वारली जमातीचे हे पारंपरिक राहणीमान पाहिल्यावर, बदलत्या काळातही त्यांनी जपलेल्या या जुन्या वस्तूंचे अप्रूप वाटते. एकीकडे सर्वत्र काळ बदलत असला तरी; ग्रामीण भागात वारली आदिवासींनी जपलेले त्यांचे साधेसुधे राहणीमान आपल्याला आकर्षित करते. तशीच त्यांची चित्रशैली साधीसोपी असून कमीतकमी साहित्यातून निर्माण होते. वारली जमात कलासक्त आहे. म्हणूनच कलासमृद्ध आदिवासी पाडे उध्वस्त न होता टिकले पाहिजेत. त्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज आहे.
                                         -संजय देवधर
(वरिष्ठ पत्रकार व वारली चित्रशैलीतज्ज्ञ, नाशिक)
*********************************
वारली चित्रशैली १८व्या शतकात अमेरिकेत ?

  साधारणतः दहाव्या शतकात भारतात महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यात आदिवासी वारली चित्रशैली उदयाला आली. संशोधनानुसार तसे पुरावे मिळतात. पण ही कला आपल्या राज्यात- देशात सर्वत्र पोहोचण्यास सत्तरावे दशक उजाडावे लागले ! त्यानंतर या कलेने  'जगाच्या कॅनव्हास'वर स्थान मिळवल्याचे मानले जाते. पण काही दिवसांपूर्वी या समजाला छेद देणारे एक चित्र समोर आले. माझा मुलगा सुयश अमेरिकेत नेब्रास्का स्टेटमधील ओमाहा येथे 'यूएनएमसी' युनिव्हर्सिटीत पीएच.डी. करीत आहे. तो तेथील 'जोस्लिन आर्ट म्युझियम' मध्ये एक चित्रप्रदर्शन बघण्यासाठी गेला होता. तेथे १८३३-३४ दरम्यान कार्ल बाडमेर या चित्रकाराने काढलेल्या एका चित्राने त्याचे लक्ष वेधून घेतले. या चित्रातील व्यक्तीच्या वस्त्रावर वारली चित्रशैलीशी साम्य असणारी रेखाटने स्पष्टपणे दिसतात. ज्या काळात दळणवळणाची फारशी साधने नव्हती तेव्हा वारली कलेने सातासमुद्रापार झेप घेतली होती असेच या चित्रावरुन ठळकपणे दिसते ! यामुळे एक नवेच संशोधन सामोरे आले आहे. संशोधक वृत्तीच्या सुयशने हे कलात्मक संशोधन केले असेच म्हटले पाहिजे. त्याने त्या चित्राचे फोटो मला पाठवले.  जिज्ञासूंना https://www.joslyn.org/collections-and-exhibitions/temporary-exhibitions/details.aspx?ID=1621 या लिंकवर अधिक माहिती मिळवता येईल.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !

मविप्र मॅरेथॉनसाठी ऑनलाइन नोंदणी सुरु, जास्तीत जास्त स्पर्धकांनी सहभागी व्हावे : ॲड. नितीन ठाकरे