तारप्याच्या कथा अन् व्यथा... "मी तारपा !" आदिवासी संस्कृतीचे सुरेल प्रतीक! जव्हार संस्थानातील डौलदार तारपा नृत्याचे संवर्धन होईल का ? जाणण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
"मी तारपा !"
आदिवासी संस्कृतीचे सुरेल प्रतीक!
एकेकाळी मला मानाचे स्थान होते. जव्हार संस्थानच्या दरबारात डौलदार तारपा नृत्य आयोजित केले जाई. आज मला घडवणारे आहेत, सारे कौशल्य पणाला लावून प्राणपणाने वाजवणारे आहेत; पण हळूहळू माझ्या सुरावटीवर भान हरपून, बेभान होऊन नाचणारे पाय शहरांकडे वळले आणि माझे सूर हरपले! नवीन पिढीत माझे संगोपन, संवर्धन करण्याची ऊर्मी नाही. तारपा वाजवून पोट भरणार का ? असा प्रश्न युवकांना पडतो. तसे मला आठवणीत ठेवण्यासाठी काही प्रयत्न केलेही जातात; पण ते अगदीच नगण्य! हे असंच होत राहिलं तर माझी रवानगी लवकरच वस्तुसंग्रहालयात होईल! पुढच्या पिढ्यांना 'कोणे एके काळी' तारपा नावाचे वारली जमातीचे एक वाद्य होते, असे ऐकावे लागेल. ते टाळण्यासाठी आज मी माझी कथा आणि व्यथा मांडणार आहे...
सरकार दरबारी घुंगरांचा आवाज ऐकला जातो, लावणी नृत्याला प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. त्याबद्दल मला अभिमानच वाटतो. पण त्याच वेळी माझी सुरावट ऐकायला मात्र कुणाला वेळ नाही. इतिहासाने कधी माझी दखल घेतली नाही आणि वर्तमानाला देखिल माझ्या अस्तित्वाची किंमत नाही याची खंत वाटते. त्यामुळेच माझा भविष्यकाळ बहुदा अंधारात असेल. पूर्वी दिवसभर जीवाचे रान करीत काबाडकष्ट करणारे वारली रात्ररात्र माझ्यात प्राण फुंकत. आपल्या व्यथा, वेदना विसरून स्त्रीपुरुष, युवक, युवती माझ्या तालावर नाचत, तल्लीन होत. ते जेव्हा हातात हात गुंफून पायांवर ठेका धरीत तेव्हा मलाही स्फुरण चढे. पण आता काळ बदलला. आदिवासींना मी आपला वाटेनासा झालो. अनेक ठिकाणी माझ्याऐवजी सिंथेसायझरवर माझी नक्कल होऊ लागली. माझी जागा आधुनिक वाद्याने घेतली. मी 'हयात' असून आणि मला वाजवणारे जाणकार वयस्कर तारपेकरी अद्याप सक्षम असूनही ऐकणारे कान, तल्लीन होणारी मने आणि थिरकत साथ देणारे पाय मला कालौघात सोयीस्करपणे विसरले! शासकीय उदासीनतेचा फटकाही बसला. एखादे वाद्य सातत्याने वाजवले गेले तरच त्याचे अस्तित्व टिकते. माझ्या बाबतीत असेच विपरीत घडत गेले. मी मलाच परका झालो. तरुण वादक निर्माण होत नसल्याने अलिकडे तारपा नृत्याला उतरती कळा लागली आहे.
आदिवासी जगला तर माझे अस्तित्व अबाधित राहील. मी सुरात वाजत राहिलो तर आदिवासी ताठ मानेने जगेल. वारली चित्रशैली व माझा जन्म एकाच पाड्यातला. आज वारली चित्रांनी भारतात सर्वत्र लोकप्रियता मिळवली आहे. जग पादाक्रांत केले आहे. दुसरीकडे मी मात्र माझ्या अस्तित्वाचाच प्रश्न निर्माण झाला आहे. पूर्वी खूपदा मी शाळा - महाविद्यालयांच्या स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने शहरांमध्ये गेलो. तेवढ्यापुरते माझे कौतुक करण्यात आले. मात्र लोककलेत माझा समावेश झालाच नाही. याचे कारण सातत्याने वेगवेगळे सूर निर्माण करणे हे एक आव्हान असते. 'मराठी पाऊल पडते पुढे' या कार्यक्रमाच्या माध्यमातून नितीन चंद्रकांत देसाई यांनी माझी ओळख रसिकांना करून दिली. अजिंठा चित्रपटात माझ्या सुरांवर ३० कलाकार नाचले. लोककलेचे उपासक सदानंद राणे, इंदुमती लेले यांनी मला सह्याद्री वाहिनीवर नेले. पण पुढे काहीच घडले नाही व माझे सूर जणु हरपले.आता माझी ही कला नामशेष होण्याची भीती वाटते. जगभरातील रसिकांना खरं तर माझ्यामुळे वारली चित्रशैली विषयी कुतूहल निर्माण झाले. तारपा नृत्याच्या चित्रांनी रसिकांवर मोहिनी घातली. जिव्या सोमा मशे या चित्रकाराला पद्मश्री सारखा मोठा सन्मान मिळाला. आदिवासी संस्कृतीत माझा जन्म झाला याचा मला अभिमानच आहे. मी केवळ वाद्य नाही तर निसर्गाशी समरस होऊन मानवाने कसे जगावे, हे देखिल ते शिकवते.असं असलं तरी मी मात्र आता उपेक्षित ठरलो आहे. हे चित्र बदलायला हवं. त्यासाठी वारली युवकांनी मला आपलंसं करावं, एवढीच माझी माफक मागणी आहे.
-संजय देवधर
(ज्येष्ठ पत्रकार व वारली चित्रशैलीतज्ज्ञ, नाशिक)
*******************************
तारपा व त्यावरील नृत्य जगले पाहिजे- वैद्य
मोखाड्याचे राजन वैद्य म्हणतात, तारपा हे वाद्य आदिवासी वारली जमातीत सुखदुःखाच्या प्रसंगी वाजवले जाते.मावल्या देवांसाठी भगत उपवास करतात. जोपर्यंत देवाला नैवेद्य दाखवला जात नाही तोपर्यंत तारपा वाजवला जात नाही. पावसाळ्यात तारपा वाजवणे बंद होते. तारपा या वाद्याची व नृत्याची ताकद ओळखून मी गेली २५ वर्षे प्रचार - प्रसाराचे काम करतो. कल्याण मलंगगड येथील यात्रेत पहिला कार्यक्रम केला. त्यासाठी तारपावादक व १५ स्त्रीपुरुष कलाकारांचा चमू मोखाड्यातून घेऊन गेलो. २६ जानेवारी २००५ रोजी राजपथावर चित्ररथासमोर आमच्या चमूने अनवाणी पायांनी तारपानृत्य केले तेव्हा अभिमानाने ऊर भरुन आला. २०१९ ला छत्तीसगड येथे झालेल्या महोत्सवात ३ लाख रुपयांचे पारितोषिक आम्ही पटकावले. तारपा नृत्य करतांना मध्यभागी तारपावादक असतो. नृत्य करणाऱ्यांचे नेतृत्व वर्तुळातील पहिला पुरुष करतो. त्याला उडव्या म्हणतात. त्याच्या हाती घोळकाठी असते. ती आपटल्यावर नृत्याची लय, दिशा बदलते. बांबूच्या काठीवर वरच्या टोकाला लांबट लोखंडी पाकळ्यांचा घोळ लावलेला असतो. लोककला संमेलने, राजकीय मेळावे, सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्यस्पर्धा अशा अनेक ठिकाणी तारपानृत्याचे सादरीकरण केले आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे गेली दीड - पावणेदोन वर्षे सगळे बंद आहे. तरीही काही कार्यक्रम ऑनलाईन केले. तारपा, त्यावरील नृत्य जगले पाहिजे हा माझा ध्यास आहे
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा