१५ डिसेंबर आंतरराष्ट्रीय चहा दिन ! बेवफा सनम से चाय अच्छी है | ये दिल तो जलाती है, मगर होठों को चुम लेती है | चहा महात्म्य जाणण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
१५ डिसेंबर आंतरराष्ट्रीय चहा दिन !
"चहा महात्म्य"
चहा हा आपल्या जीवनातील प्रत्येक घटना आणि भावनात्मक प्रसंगांशी जोडलेला आहे. सकाळची सुरुवात चहाने होते तर चहा मुळे सायंकाळचा आनंद द्विगुणीत होतो. जगभरात १५ डिसेंबर हा दिवस ‘आंतरराष्ट्रीय चहा दिन’ म्हणून साजरा केला जातो. चहांच्या मळ्यामध्ये आणि कारखान्यांमध्ये काम करणाऱ्या श्रमिकांच्या स्थितीकडे लक्ष वेधणे, हा यामागील मुख्य उद्देश आहे. जगात दररोज सुमारे तीनशे कोटी कप चहा पिला जातो. भारत सुमारे एक शतक चहा उत्पादनात आघाडीवर होता. भारत हा जगातील सर्वात जास्त चहा उपभोक्ता देश असून भारतातील एकूण चहा उत्पादनापैकी ७० टक्के चहा देशातच वापरला जातो.
बेवफा सनम से अच्छी ‘चाय’ ! किंवा चहा : एक अमृत तुल्य पेय ! किंवा चहा : एक लोकप्रिय पेय !
जगातील पाण्याखालोखाल लोकप्रिय असलेल्या चहा या पेयाचे अनेक प्रकार, फायदे, उपयोग असल्याने चहा शिवाय राहू न शकणाऱ्या तसेच चहा म्हणजे ‘अॅसिडिटी’ किंवा ‘निद्रानाश’ असा समज करून चहाला दूर ठेवणाऱ्यानाही ‘चहा’ हा विषय आवडेल असाच आहे. चहा म्हणजे तरतरीत करणारं उत्साहवर्धक पेय म्हणून त्याची अमृताशी बरोबरी करून चहाचा अमृत तुल्य असाही गौरव केला आहे. दोन मित्र भेटल्यास, पाहुणे घरी आल्यास, कामाचा कंटाळा आल्यास, विद्यार्थ्यांना अभ्यासासाठी जागरण करण्यास, काही वेळा भूक मारण्यास, लहान-सहान कामे करवून घेण्यासाठी चहा दिला घेतला जातो. शिवाय या निमित्ताने ‘चाय पे चर्चा’ होऊन ‘मन की बात’ सांगता येते. लग्नगाठीही चहा मुळे जुळविता येतात. एका हिंदी सिनेमा तील (सौतन) नायिका आपल्या नायकाला म्हणते ‘शायद मेरी, शादी का खयाल,
दिल मे आया है, इसीलिये मम्मीने मेरी,
तुम्हे चाय पे बुलाया है’ !
शिवाय, चहा विकण्याचा व्यवसाय हलक्या दर्जाचा व कमी कमाईचा असल्याचा समाजातील प्रचलित समज भ्रामक व खोटा असल्याचे अनेक चहाविक्रेत्यांनी सिद्ध करून दाखविले आहेच. पुण्यासारख्या अति चोखंदळ ग्राहकांच्या पसंतीस उतरेल असा दर्जेदार आणि ग्राहकांना चटक लावणारा चहा देण्याचे कसब येवले यांचे कडे असलेने ते या व्यवसायातून चांगली उलाढाल करीत असून तीन वर्षापूर्वी प्रत्येकी १५ कामगार असणारी त्यांची तीन चहाची दुकाने होती. लवकरच ते चहाची १०० दुकाने सुरु करून हजारोपेक्षा जास्त लोकांना रोजगार देण्याच्या विचारात आहेत.
आंतरराष्ट्रीय चहा दिनाची सुरुवात १५ डिसेंबर २००५ साली दिल्ली येथून झाली. मात्र त्यानंतर तो पुढील वर्षी श्रीलंकेत साजरा केला गेला आणि त्यानंतर तो जगभरात साजरा होऊ लागला. भारतातील चहामळ्यांचे मालक, चहा-उत्पादक आणि श्रमिक संघटना आपली मजुरी, उपजीविकेचे साधन आणि जीवनस्तर यासंबंधीचे आपले अधिकार अधोरेखित करण्यासाठी हा दिवस साजरा करतात. भारतातील काही राज्यात चहाचे मळे असून ब्रिटीश राजवटी मध्ये भारतात चहा आल्याचे मानले जाते. भारतात सर्वप्रथम १८३४ मध्ये चहा उत्पादनाला सुरुवात झाली. आज चहा भारतातील बहुतांश घरात पोहचला आहे. चहा उत्पादनात चीन प्रथम क्रमांकावर असून त्यानंतर भारत आणि केनिया चा क्रमांक लागतो. भारतामध्ये चहा ची सुरुवात अत्यंत मजेशीर रित्या झाली. १८३४ मध्ये जेव्हा गव्हर्नर जनरल लॉर्ड बेंटिंग भारतात आले, तेव्हा त्यांनी आसाम राज्यातील लोक चहाची पाने पाण्यात उकळून पीत असल्याचे पाहिले. चहाचा ते औषधाप्रमाणे उपयोग करत होते. बेंटिंग यांनी त्यांना चहा बद्दल माहिती दिली. एक समिती स्थापन केली आणि त्यानंतर चहाची परंपरा भारतात सुरू झाली. यानंतर १८३५ मध्ये आसाम मध्ये चहाच्या बागा लावण्यात आल्या. भारतामध्ये सन १८८१ मध्ये ‘इंडियन टी असोसिएशनची’ स्थापना केली गेली, जिने भारतातच नाही तर आंतरराष्ट्रीय बाजारा मध्ये सुद्धा चहाचे उत्पादन पोहोचवले. त्याकाळी चहा हा इंग्रजांच्या उत्पन्नाचा प्रमुख स्त्रोत होता. येथे चहा पिकवून ते मोठ्या प्रमाणात परदेशात पाठवित. इंग्रजांनी चीनी बियाणे,लागवड आणि शेतीचे तंत्र वापरून आसाम मध्ये चहा उद्योगास सुरूवात केली. तत्पूर्वी चहा चा उपयोग फक्त औषध म्हणूनच केला जात होता. तथापि भारतामध्ये चहाचे व्यापारिक उत्पादन ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी च्या आगमनानंतर सुरू झाले.
अलीकडे चहा मध्ये अनेक प्रकार आले असून त्यात सी.टी.सी. चहा जो सर्वत्र उपलब्ध असतो, दूध-साखर नसलेला आरोग्यदायी ग्रीन टी, लिंबाचा रस घातलेला लेमन टी, यंत्राद्वारे बनवलेला चहा, ग्रीन टी मध्ये तुळस,वेलदोडे, दालचिनी घातलेला औषधी हर्बल टी आणि कोणताही दूध-साखर न घातलेला ब्लेक टी (काळा चहा) यांचा समावेश होतो. यापैकी ब्लेक टी पिण्याकडे लोकांचा कल वाढू लागला आहे. यानिमित्ताने मराठवाड्यातील एका चहाच्या टपरीवरील फलकातील अर्थपूर्ण ओळी आठवतात :
बेवफा सनम से
चाय अच्छी है |
ये दिल तो जलाती है,
मगर होठों को चुम लेती है |
प्रा. विजय कोष्टी,
सहयोगी प्राध्यापक
पी.व्ही.पी. कॉलेज, कवठेमहांकाळ
**********************************
लेख कसा वाटला हे कमेंटबाॅक्स लिहायला विसरू नका, चहा पिणे आरोग्यास लाभदायक की हानिकारक याविषयी तज्ञांचा सल्ला घ्यावा, वरील लेखातील मजकूर हा लेखकाचा लेखनप्रपंच असून याबाबत न्यूज मसालाकडून कोणताही आग्रह केला जात नाही !
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा