अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा ! साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत !! चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे !!! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!




अखंड शारदोत्सवाची गोदातटाला परंपरा...

    जवळपास सारे जग  वेठीस धरणाऱ्या कोरोनाच्या संकटामुळे, यंदा मार्च महिन्यात नाशिकला होणारे ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन ९ महिने लांबणीवर पडले. आता ते ३ ते ५ डिसेंबर दरम्यान होणार आहे. भुजबळ नॉलेज सिटीच्या परिसरात होणाऱ्या या संमेलनाचे अध्यक्ष ज्येष्ठ संशोधक, शास्त्रज्ञ व विज्ञानलेखक डॉ. जयंत नारळीकर आहेत. यापूर्वी नाशिकला १९४२ साली ऑक्टोबर महिन्यात २७ वे व २००५ साली जानेवारी महिन्यात ७८ वे  अशी दोन संमेलने झाली होती. नाशिकला समृद्ध अशी साहित्यिक, सांस्कृतिक परंपरा आहे. नाशिक ही मंत्रभूमी, देवभूमी, धर्मभूमी, कर्मभूमी, स्वातंत्र्य चळवळीतील शौर्यभूमी, साहित्य क्षेत्रातील सारस्वतांची भूमी, मोक्षभूमी तसेच आधुनिक काळातील तंत्रभूमी म्हणून ओळखली जाते. नाशिक हे जनस्थान म्हणजे साधकांसाठी सिद्धस्थान आहे. श्रीरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही तपोभूमी आहे. येथे दर बारा वर्षांनी सिंहस्थ कुंभमेळा भरतो; तशीच सारस्वतांची मांदियाळी साहित्य संमेलनाच्या निमित्ताने तीन दिवस जमणार आहे.

  नाशिकला साहित्य, संस्कृतीची दीर्घ व समृद्ध परंपरा लाभलेली आहे. येथील भूमीत अनेक ऋषिमुनींनी तपश्चर्या करून पुराणे व दुर्मीळ ग्रंथ लिहिले. काही वर्षांपूर्वी  'संवाद' या संस्थेतर्फे सातत्याने साहित्यिक उपक्रम राबवले जात. प्रस्थापित व नवोदितांचा त्यात उत्स्फूर्त सहभाग असायचा.'नाशिक कवी' ही संस्था बाळासाहेब मगर,शरद पुराणिक, सुभाष सबनीस व सहकारी चालवतात. जुन्या-नव्या कवींची सांगड घालून विविध काव्यमैफली आयोजित केल्या जातात.सांस्कृतिक क्षेत्रात गायन, वाद्यवादन, नृत्य या कलाप्रकारांमध्ये अनेक दर्जेदार कलाकारांनी योगदान दिले आहे. आजही ताज्या दमाचे कलाकार आपला ठसा उमटवत आहेत. गायनाचार्य पं.विष्णू दिगंबर पलुस्कर यांनी गायनकलेचा प्रसार-प्रचार येथूनच केला. त्यांनी अनेक शिष्य घडवले. गांधर्व महाविद्यालय व विष्णू संगीत विद्यालयाने नाशिकमध्ये संगीत रुजवले. महिलांनाही गायनाचे प्रशिक्षण देऊन संगीतकलेला प्रतिष्ठा मिळवून दिली. कथक नृत्यशैलीत कीर्ती कला मंदिरच्या रेखा नाडगौडा तसेच संजीवनी कुलकर्णी, विद्या देशपांडे, भरतनाट्यम नृत्यशैलीत सोनाली केळकर या सातत्याने कार्यरत आहेत. विद्यार्थिनी घडवून परंपरा पुढे नेत आहेत. चित्रमहर्षी वा. गो. कुलकर्णी यांनी जलरंग निसर्गचित्रणाची परंपरा नाशिकच्या गोदाघाटावर निर्माण केली. पुढे शिवाजी तुपे, पंडित सोनवणी, आनंद सोनार यांनी ती जपत पुढच्या पिढीला हा वारसा दिला. शिल्पकलेत मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांनी नाममुद्रा कोरली आहे. नासिक कलानिकेतन व इतर काही संस्था चित्रकलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण देतात.

   नाशिक जिल्ह्यातील भगूरचे भूमिपुत्र असलेल्या सावरकरांची नाशिक ही कर्मभूमी. नाशिकमध्ये सशस्त्र क्रांतीची मशाल स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांनी प्रज्वलित केली. त्यांनी ब्रिटिशांची जुलमी राजवट उलथवून टाकण्याचे महान कार्य केले. स्वातंत्र्य संग्रामात त्यांचे अद्वितीय योगदान होतेच, त्याचबरोबरीने साहित्यक्षेत्रातही त्यांनी मोलाची कामगिरी केली. ते स्वतः श्रेष्ठ साहित्यिक, प्रतिभावंत कवी, नाटककार होते. इंग्रजी शब्दांना पर्यायादाखल अत्यंत समर्पक असे अनेक मराठी प्रतिशब्द त्यांनी दिले. आता आपण साहित्य संमेलनाच्या निमित्ताने हा खास अंक काढत आहोत. त्यासाठी विशेषांक हा शब्द सावरकरांनीच दिला आहे. याशिवाय दररोजच्या वापरातील अनेक शब्द ही त्यांची मराठी भाषेला लाभलेली देणगी आहे. (याचा सोयीस्कर विसर आयोजकांना पडला होता. मात्र नागरिकांच्या सामूहिक रेट्याने त्यांना वेळीच जाग आणली!) आता संमेलन गीतामध्ये सावरकरांचा ठळकपणे उल्लेख करण्यात आला आहे. मुख्य प्रवेशद्वाराला स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नाव द्यावे, तसेच व्यासपीठावर प्रतिमा असावी या मागण्यांनीही जोर धरला आहे. दरम्यान साहित्य संमेलन हा राजकीय अड्डा होऊ नये अशीही अपेक्षा सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे. काळाराम मंदिराचा लढा याच नाशिकमध्ये झाला. येथील गोदाघाटाला पेशवे आणि अहिल्याबाई होळकर यांनी सौंदर्य प्राप्त करून दिले. अनेक सारस्वतांनी येथे साहित्यसेवा केली व नाशिकचे नाव उज्ज्वल केले. त्याचा  धावता आढावा घेण्याचा प्रयत्न या लेखात केला आहे.

  संत निवृत्तीनाथ, समर्थ रामदास स्वामी, श्री चक्रधर स्वामी, शृंगेरीपीठाचे शंकराचार्य डॉ. कुर्तकोटी, देवमामलेदार यशवंतराव महाराज यासारख्या सिद्ध पुरुषांचे वास्तव्य या मातीला लाभले. साने गुरुजींनी श्यामची आई ही कादंबरी नाशिकच्या कारागृहात लिहिली. चित्रमहर्षी दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटसृष्टीची बीजे येथेच रोवली. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गीत व ध्वज नाशिकच्या भूमिपुत्राने तयार केले. स्वच्छतेचे पुजारी गाडगेबाबा यांनी सोप्या शब्दात लोकप्रबोधन केले. नाशिक शहराला लाभलेल्या अनेक प्रतिभावंतांच्या प्रज्ञेने एकूणच समग्र साहित्यविश्वाला उंचीवर नेले. त्यांच्या प्रेरणेने पुढील पिढ्या घडल्या आणि घडत आहेत. श्री चक्रधर स्वामींनी मराठीतील पहिला लीळाचरित्र हा ग्रंथ लिहिला. दोन वर्षे ते नाशिकला वास्तव्यास होते. या काळात त्यांनी अनेक मठ, मंदिरे उभारली. समर्थ रामदास स्वामींनी नाशिकच्या टाकळी मठात मारुतीची स्थापना करुन गायत्री पुरश्चरण केले. राममंत्राचा तेरा कोटी जप करून त्यांनी अनेक ग्रंथ रचले. दासबोध, मनाचे श्लोक लिहून समाज प्रबोधन करण्याचे महत्त्वाचे कार्य केले. स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर उर्फ कवी गोविंद सुरुवातीला शृंगारिक लावण्या लिहीत. लोकमान्य टिळक व सावरकर बंधू यांच्या सहवासात आल्यावर त्यांच्याच प्रेरणेने गोविंद यांनी देशभक्तीपर रचना केल्या. सावरकरांच्या मित्रमेळ्यामध्ये ते  सहभागी झाले. पुढे याच मित्रमेळ्याचे अभिनव भारत संस्थेत रूपांतर झाले.  रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले, नमने वाहून स्तवने उधळा, कारागृहाचे भय काय त्याला, अशा त्यांच्या अनेक कविता गाजल्या व त्यांनी युवकांना स्फूर्ती दिली. 

   वि. वा. शिरवाडकर तथा कुसुमाग्रज यांचे मूळ नाव गजानन रंगनाथ शिरवाडकर. नाशिककरांचे ते लाडके 'तात्यासाहेब'! दत्तक गेल्याने ते विष्णू वामन शिरवाडकर झाले. महाविद्यालयात शिकत असताना रत्नाकर मासिकात त्यांच्या कविता प्रसिद्ध होऊ लागल्या. नंतर कथा, कादंबऱ्या, नाटके व ललित साहित्य ते लिहू लागले. साप्ताहिके व दैनिकांमध्ये लेखन करायला लागले. १९४२ मध्ये त्यांचा विशाखा हा काव्यसंग्रह प्रकाशित झाला व मराठी साहित्यातील वैभव ठरला. ययाती आणि देवयानी, वीज म्हणाली धरतीला, दूरचे दिवे ही त्यांची नाटके गाजली. नटसम्राट ही सर्वोत्कृष्ट नाट्यकृती ठरली. हे नाटक मैलाचा दगड मानले जाते. अनेक कलाकारांनी आव्हान पेलून त्याचे असंख्य प्रयोग केले व ते गाजले. अलीकडे त्यावर चित्रपटही निघाला. तो फारसा न रूचल्याने, त्यावर रसिकांनी टीका केली. (बॉक्स ऑफिसवर मात्र तो यशस्वी ठरला!)१९८७ साली कुसुमाग्रजांना सर्वोच्च अशा ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिककरांनी हा आपलाच गौरव मानला. १९५० साली कुसुमाग्रजांनी लोकहितवादी मंडळ सुरू केले. यंदाच्या साहित्य संमेलनाचे हे मंडळच यजमान आयोजक आहे. नाशिकच्या सार्वजनिक वाचनालयाला १७५ वर्षांची दीर्घ परंपरा आहे. या वाचनालयाचे १९६२ ते १९७२ अशी तब्बल १० वर्षे तात्यासाहेब अध्यक्ष होते. त्यांच्या हयातीतच कुसुमाग्रज प्रतिष्ठान स्थापन करण्यात आले. त्याच्या माध्यमातून वर्षाआड जनस्थान व गोदावरी गौरव पुरस्कार देण्यात येतात. नाशिकमध्ये मध्यवर्ती भागात कुसुमाग्रज स्मारक हे वास्तुसंकुल उभे असून तेथे सातत्याने साहित्यिक, सांस्कृतिक उपक्रम राबविण्यात येतात.

    वसंत शंकर कानेटकर यांनी एच.पी.टी. महाविद्यालयात मराठीचे प्राध्यापक म्हणून ज्ञानदान केले. कथा, कादंबरी लेखन करतांनाच ते नाटकांकडे वळले. वेड्याचं घर उन्हात हे त्यांनी १९५७ साली लिहिलेले पहिले नाटक रंगभूमीवर आले. त्याला राज्य नाट्य महोत्सवात लेखनाचे पारितोषिक मिळाले. त्यांनी एकूण १४ नाटके लिहिली व ती गाजली. प्रख्यात नाटककार वसंत कानेटकर यांच्या  नाटकांनी मराठी रंगभूमीला गतवैभव प्राप्त करून दिले. रायगडाला जेव्हा जाग येते या त्यांच्या नाटकाला संगीत नाट्य अकादमीने गौरविले. ५२ व्या मराठी नाट्यसंमेलनाचे तसेच इंदूरच्या महाराष्ट्र साहित्य सभेच्या शारदोत्सवाचे ते अध्यक्ष होते. त्यांच्या पश्चात स्मृती जपण्यासाठी महापालिकेने एक उद्यान निर्माण केले आहे. मात्र त्याचीही हेळसांड झाल्याने दुर्दशा झाली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी दादासाहेब गायकवाड, भीमगीतांचे लेखक वामनदादा कर्डक, बाबूराव बागूल यांचेही दलित साहित्यात मोलाचे योगदान आहे. वामनदादांनी गीतगायनाचे अनेक कार्यक्रम केले. वर्धा येथे झालेल्या पहिल्या आंबेडकरी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. बाबूरावांनी  प्रखर वास्तववादी कथा, कादंबऱ्या लिहिल्या. कामगार चळवळीतही त्यांचा सहभाग होता. जेव्हा मी जात चोरली... ही कथा त्यांनी सुरतला आलेल्या अनुभवावर लिहिली व ती खूप गाजली.

   नाशिकला १८४० मध्ये पहिली सिटी लायब्ररी सुरू झाली. १९२४ साली तिचे सार्वजनिक वाचनालयात रूपांतर झाले. १८० पेक्षा जास्त काळ हे वाचनालय वाचकांची गरज भागवत आहे. येथे प्रचंड ग्रंथसंपदा तसेच दुर्मीळ पोथ्या, हस्तलिखिते आहेत. वस्तुसंग्रहालय, नाट्यगृह, प्रदर्शन हॉल असून सातत्याने साहित्यिक व सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असते. याशिवाय अनेक सार्वजनिक व खासगी वाचनालये नाशिककरांसाठी साहित्यसेवा बजावत आहेत. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी १९०५ मध्ये नाशिकच्या गोदाकाठी वसंत व्याख्यानमालेची मुहूर्तमेढ रोवली. प्रदीर्घ परंपरा लाभलेल्या या व्याख्यानमालेत अनेक दिग्गज व्याख्याते येऊन गेले आहेत. दरवर्षी १ ते ३१ मे ही व्याख्यानमाला भरते. कोरोनाच्या काळात ऑनलाईन व्याख्याने झाली. याशिवाय नाशिकमध्ये अनेक छोट्या मोठ्या संस्था कार्यरत आहेत. नाशिकमध्ये १८६९ मध्ये नासिकवृत्त हे पहिले साप्ताहिक त्र्यंबक हरी काळे यांनी सुरु केले. नंतर नासिकवैभव, लोकसेवा, नासिक समाचार  तसेच वि. ग. केळकर यांचे लोकसत्ता ही साप्ताहिके निघत. पुढच्या काळात काही साप्ताहिके सुरू होऊन अल्पकाळात बंद पडली. अलीकडच्या काळात गेल्या दहा वर्षांपासून नरेंद्र पाटील यांनी सुरू केलेले साप्ताहिक न्यूज मसाला ही सामाजिक, साहित्यिक वारसा जपण्याचा प्रयत्न करीत आहे, स्वातंत्र्यसैनिक दादासाहेब पोतनीस यांनी आधी गांवकरी हे साप्ताहिक सुरू केले. १९४७ साली त्याचे दैनिकात रूपांतर झाले. नंतर देशदूत, रामभूमी, भ्रमर व इतर अनेक दैनिके सुरू झाली. आज महाराष्ट्रातील बहुतेक मोठ्या दैनिकांची कार्यालये नाशिकमध्ये असून स्वतंत्र आवृत्या प्रकाशित होतात. नववाचकांना वाचनाची गोडी लावण्याचे काम वृत्तपत्रे करतात. साहित्य, संस्कृतीने समृद्ध अशा नाशिकमध्ये ९४ वे साहित्य संमेलन होईल. त्यातून उत्तम साहित्यिक विचारमंथन व्हावे हीच अपेक्षा.

                           -संजय देवधर
                      (वरिष्ठ पत्रकार, नाशिक)
***********************************
संमेलन आणि वादांची मालिका

     ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन सोहळ्यासाठी वादग्रस्त निवृत्त शासकीय अधिकारी व पानिपतकार विश्वास पाटील, ज्यांच्या नावाला पहिल्यापासून अनेकांचा तीव्र विरोध होता असे हिंदी ऊर्दू गीतकार जावेद अख्तर यांना निमंत्रित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्घाटन समारंभाला उपस्थित राहतील असे संयोजकांनी घोषित केले आहे. परंतु त्यांच्यावर अलीकडेच शस्त्रक्रिया झाल्याने प्रकृतीच्या कारणामुळे ते उपस्थित राहणार का याबाबत साशंकता व्यक्त होत असताना ते आॅनलाईन उपस्थिती देणार असल्याचे सांगितले जात आहे. आधी गीतकार गुलजार व ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांच्याही नावांची चर्चा होती. मात्र नंतर ही दोन्ही नावे मागे पडली. एकूणच हे साहित्य संमेलन की महाविकास आघाडीचा राजकीय मेळावा ? असा प्रश्न साहित्यिक व नागरिकांना पडत आहे. संमेलन आणि वादांची मालिका काही संपत नाही अशाचप्रकारे नवनवे वाद समोर येत आहेत.
**********************************
संमेलन गीतावर अनेक आक्षेपांचा सूर !

     नाशिकला होत असलेल्या साहित्य संमेलनाचे गीत कवी मिलिंद गांधी यांनी लिहिले असून संगीतकार संजय गीते यांनी संगीतबद्ध केले आहे. प्रारंभी सडकून झालेल्या टीकेनंतर स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या नावाचा समावेश करण्यात आला. आता अधिकृत गाणे सादर करण्यात आले आहे. या चित्रफितीत शाहीर प्रताप परदेशी यांचे छायाचित्र चुकीचे असल्याचे निदर्शनास आले. यामध्ये स्वातंत्र्यशाहीर गोविंद त्र्यंबक दरेकर, कुसुमाग्रज, नाटककार वसंत कानेटकर, लोककवी वामनदादा कर्डक, साहित्यिक बाबुराव बागुल, रेव्हरंड टिळक व लक्ष्मीबाई टिळक, कॉम्रेड श्रीपाद डांगे, शाहीर भीमराव कर्डक, लेखक व माजी संमेलनाध्यक्ष उत्तम कांबळे, शायर जोया व आदम मुल्ला, गीतकार योगेश्वर अभ्यंकर, कवी गोपाळ देशपांडे, लावणीकार पंढरीनाथ सोनवणी, कवी अरुण काळे,किशोर पाठक, आनंद जोर्वेकर, शोध ग्रंथकार मुरलीधर खैरनार, न्यायमूर्ती रानडे, अ. वा.वर्टी, चंद्रकांत महामीने, चंद्रकांत वर्तक, चित्रमहर्षी दादासाहेब फाळके, सूरतपस्वी पं. विष्णू दिगंबर पलुस्कर, अभिनेते दत्ता भट व बाबुराव सावंत, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांचे छायाचित्रांसह उल्लेख आहेत. मात्र चित्रकलेच्या क्षेत्रात महनीय कामगिरी बजावलेले वासुदेवराव कुलकर्णी, शिल्पकलेत आपली नाममुद्रा कोरणारे मदन गर्गे, लोंढे बंधू, तांबट बंधू यांचा पुसटसाही उल्लेख नसल्याबद्दल कलाक्षेत्रात नाराजीचा सूर उमटतो आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।