नव्या पिढ्यांमध्ये कलापरंपरा  रुजवणारे संपत ठाणकर !  लेखाचा उत्तरार्ध वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!






नव्या पिढ्यांमध्ये कलापरंपरा 
रुजवणारे संपत ठाणकर
 (उत्तरार्ध)

  अभ्यासू आदिवासी वारली चित्रकार संपत ठाणकर सातत्याने कलेच्या  प्रसारासाठी प्रयत्नशील आहेत. स्वतः चित्रे रेखाटण्याबरोबरच जमातीतील इतर प्रज्ञावंत कलावंत, लेखक, कवी यांचा ते शोध घेतात. त्यांना प्रोत्साहन देण्याचेही काम करतात. हाडाचे शिक्षक असल्याने स्वस्थ न बसता नोकरीव्यतिरिक्त त्यांनी असंख्य आदिवासी मुलांना वारली चित्रकला शिकवली आहे. त्यातील अनेकजण पारंगत होऊन कलेच्या माध्यमातून उदरनिर्वाह करीत आहेत. कुडाच्या भिंतीवरची ही कला जगभरात पोहोचली. मात्र वारल्यांच्या नव्या पिढ्यांनी आपली परंपरा, संस्कृती विसरु नये ही संपत यांची तळमळ आहे. त्यासाठी वारली चित्रकलेवर त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांच्या तिन्ही भागात तपशीलवार, सचित्र मार्गदर्शन केले आहे.

   'वारली चित्रकला' या पुस्तकाच्या पहिल्या भागात ही कला ठिपके, रेषा व सोप्या-मूलभूत आकारांवर आधारित आहे हे संपत यांनी सोदाहरण सांगितले आहे. रेखाटनाचा सराव कसा करावा हे देखील ते सांगतात. त्रिकोण, वर्तुळ व चौकोन या प्राथमिक भौगोलिक आकारांचा वापर करून मानवी आकृत्या, त्यांच्या हालचाली कशा रेखाटाव्या त्याचे नमुनेही त्यांनी दिले आहेत. प्राणी, पक्षी, कीटक, सरपटणारे प्राणी तसेच झाडे, वृक्षवेली व झोपड्या, लग्नचौक, देवचौक, तारपानृत्य, जंगल, शेती, आदिवासी वस्ती - पाडे यांची क्रमवार रेखाटने केली आहेत. सुबक चित्रे रेखाटण्याचे, रंगविण्याचे सोप्या पद्धतीने मार्गदर्शन केले आहे. पुस्तकाच्या दुसऱ्या भागात कुटुंबाचे चित्रण असून त्यात स्त्रीपुरुष व मुले रंगवली आहेत. नातीगोती व कुळांची माहिती चित्रातून दिली आहे. ग्रामदेवता, चेडा आणि कुळवीरांचा तपशील त्यात आढळतो. जंगलातील दऱ्याखोऱ्यात राहणारा आदिवासी कालांतराने वस्ती करून पाड्यांवर रहायला लागला. शेतीची व झोपड्या बांधण्याची कला त्याने आत्मसात केली. शिक्षणाचा प्रसार आणि सोयी उपलब्ध झाल्यानंतर आदिवासी वारली मुले आश्रमशाळांंमध्ये शिक्षण घेऊ लागली. मैलोनमैल पायी चालणारा आदिवासी बैलगाडी, छोट्या होड्या व नंतर दळणवळणाच्या सुविधांचा वापर करू लागला. विकासाचा हा  चित्रमय आलेख संपत यांनी दाखवला आहे. दुर्गम आदिवासी पाडे बसगाड्यांंनी जोडले जाऊ लागले. कामधंदा व रोजगारासाठी स्थलांतर करणारे युवक रेल्वेने शहरांकडे जाऊ लागले. आधुनिकतेचे हे टप्पे चित्रांद्वारे सामोरे येतात. त्यामुळेच आदिवासींची जीवनशैली बदलली याकडेही संपत लक्ष वेधतात.

   आदिवासी वारली जमातीचा उदरनिर्वाह शेतीवरच अवलंबून असतो. पावसाचा पहिला थेंब पडण्याचा आनंद संपत चित्रातून व्यक्त करतात. घोंगडी, इरलं पांघरलेले शेतकरी पाऊस झेलत उत्साहाने शेताकडे जातात. पेरणी, आवणीचा पहिला दिवस, पिकांची कापणी, भात मळणी, देवाचे आभार व्यक्त करण्यासाठी भाताची रास करून प्रार्थना करणारे आदिवासी, मृत व्यक्तींचे स्मरण व त्यांच्याविषयी कृतज्ञता, देवाच्या लग्नानंतर विवाह सोहळ्यांना प्रारंभ या पारंपरिक चालीरीतींची चित्रणे क्रमाक्रमाने दिसतात. वारली जमातीतील लोक दैनंदिन जीवनातील वापराच्या वस्तू माती, गवत, बांबू यांचा वापर करून  स्वतःच तयार करतात. पारंपरिक वाद्येही तयार केली जातात. तारपा या लोकप्रिय वाद्यासह ढोल व इतर अनेक वाद्ये संपत यांनी रेखाटली आहेत. कालौघात पारंपरिक लग्नचौक रंगवण्याच्या पद्धतीत बदल झाले आहेत. बदलत्या स्वरूपांचे नमुने त्यांनी दिले आहेत. त्यातून त्यांचे सूक्ष्म निरीक्षण व अभ्यासू वृत्ती दिसून येते. पुस्तकाच्या तिसऱ्या भागात कणसरी देवतेच्या नंदीबैल या वाहनाचे  बहारदार चित्रण दिसते. मिरिंग मांज्या या प्रथम आदिमानवापासून सृष्टी निर्माण झाली अशी आदिवासींची दृढ श्रद्धा आहे. माणसाने निसर्गावर केलेल्या अतिक्रमणाने पृथ्वीचा कसा ऱ्हास होत आहे हे 'जीव' या चित्रात मांडले आहे. महाप्रलय या चित्राद्वारे निसर्ग, पर्यावरण रक्षण, संवर्धनाचा संदेश दिलेला दिसतो. पाड्यावरचे दगडीदेव, चेडा व वीर यांचे विविध प्रकार रेखाटण्यात आले आहेत. या सर्वांतून आदिवासी संस्कृती सामोरी येते. संपत यांना पुढील अभ्यासपूर्ण वाटचालीसाठी शुभेच्छा.

                                         -संजय देवधर
( वरिष्ठ पत्रकार आणि वारली चित्रशैलीतज्ज्ञ )
*********************************

 तारपावादकाचा पुतळा

   जव्हार येथे बान्डा (जेठ्या) रिंजड हा महान तारपावादक होऊन गेला. १९४४ साली दसरा उत्सवातील एका स्पर्धेत अनेक तास तारपा वाजवून तो अजिंक्य ठरला. त्याचे तारपा वादनातील कौशल्य बघून त्याला राजे यशवंतराव मुकणे यांनी सन्मानित केले. पुढे त्याची स्मृती जपण्यासाठी जव्हारच्या अंबिका चौकात त्याचा पुतळा उभारण्यात आला. अशी माहिती पुस्तकात मिळते. वारल्यांना तारपानृत्य अतिशय प्रिय आहे. भाताची लावणी झाल्यानंतर भाद्रपदात नव्या भाताचे पहिले कणीस दिसताच हा नाच पाड्यापाड्यांवर रंगतो. गावदेवाचे लग्न झाल्यावर तारपा वाजवणे बंद केले जाते,असे सांगून त्याचीही चित्रे व छायाचित्रे पुस्तकात समाविष्ट केली आहेत.
********************************

सामाजिक सुधारणा घरापासून व्हावी...

   संपत यांच्या सहा मुली उच्चशिक्षित आहेत. रसिका, सारिका, रुबिना, वनिता, ज्योती, अर्पिता या सगळ्या उत्तम शिक्षण घेऊन स्वतःच्या पायावर सक्षमपणे उभ्या आहेत. पण त्यातली एकही वारली चित्रे रेखाटत नाही. वास्तविक वारली चित्रशैली ही महिलांनी ११०० वर्षे जोपासलेली लोककला आहे. संपत यांनी अनेक विद्यार्थी घडवले मात्र स्वतःच्या मुलींनाच वारली चित्रकलेचे धडे द्यायचे ते विसरले! कोणतीही सामाजिक सुधारणा करतांना ती घरापासून व्हायला हवी. संपत यांच्याशी बोलणे झाले तेव्हा त्यांना मुलींना वारली कलेचे प्रशिक्षण द्यायला सांगितले. मुलगा पंकज बारावी उत्तीर्ण असून त्याला संगणक अभियंता व्हायचे आहे.त्याबरोबरच वडिलांचा वारसाही त्याने पुढे नेला पाहिजे         

   

    

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।