संशोधक वृत्तीचा कलासंस्कृती रक्षक मधुकर वाडू संशोधक कलावंत; अभ्यासू साहित्यिक. यशोगाथेचा परीपाठ वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!   (उत्तरार्ध)






संशोधक वृत्तीचा कलासंस्कृती रक्षक

                      (उत्तरार्ध)


         आदिवासी वारली जमातीच्या लग्नचौकात साखळीसारखे आकार रेखाटले जातात. तशाच स्वरुपाचे रेखाटन फ्रान्समधील एका पुरातन गुहेत दगडावर कोरलेले आढळले. या 'मेगालिथिक' संस्कृतीचा अभ्यास करण्यासाठी  महाराष्ट्रातील मनोरजवळच्या कोंढाण येथील मधुकर वाडू फ्रान्सला गेले. तेथील मानव्यविद्येवर संशोधन करणाऱ्या सुप्रसिद्ध 'ब्रिटनी' या संस्थेने त्यांना निमंत्रित केले होते. संशोधक वृत्तीच्या कलासंस्कृती रक्षक मधुकर यांनी आदानप्रदान करून फ्रेंच व वारली कलेतील साम्यस्थळांवर प्रकाश टाकला.

         फ्रान्स दौऱ्यात त्यांना तेथील अनेक विद्यापीठांमध्ये व्याख्याने देण्यासाठी निमंत्रण मिळाले. तेथे मधुकर वाडू यांनी भारतीय

संस्कृतीसह आदिवासी वारली कलासंस्कृती समजावून दिली. तेथील माध्यमिक शाळांमध्ये भेटी देऊन वारली कलेचा प्रसार - प्रचारही केला. तेव्हाचे अनुभव सांगताना मधुकर म्हणतात, "परदेशातील छोट्या विद्यार्थ्यांपासून मोठया अभ्यासकांना भारताविषयी आणि एकूणच भारतीय कला, संस्कृती, जीवनशैली याबद्दल खूप उत्सुकता असते. ते केवळ वरवरची माहिती न घेता संशोधक वृत्तीने तपशीलवार जाणून घेतात. त्यामुळे आपल्यालाही बारकावे माहीत असावे लागतात व ते वारंवार अद्ययावत करावे लागतात. मी परदेशात गेल्याने अधिक प्रगल्भ झालो. ध्यासपूर्वक डोळसपणे संशोधन करायला लागलो. 'मेगालिथिक' संस्कृतीप्रमाणे वारली कलेची अनेक देशात साम्यस्थळे आढळतात. पत्रकार संजय देवधर यांच्या 'वारली चित्रसृष्टी' या पुस्तकातील माहिती व चित्रांमुळे 'ऑस्ट्रेलियन ऍबोर्जनीज्'  म्हणजे तेथील आदिवासी जमातीतील चित्रांचे वारली कलेशी असणारे साम्य कळले. चिनी तानग्राम व वारली कलेतील आकार सारखेच असल्याचे श्री. देवधर यांनी दाखवून दिले. त्याने मी प्रभावित झालो." असे स्पष्ट मत मधुकर नोंदवतात.

        मधुकर यांचे बालपण पक्षी, मासे, खेकडे पकडण्यात गेले. निसर्गात स्वच्छंदीपणे बागडताना त्यातच ते रममाण होत. तेव्हा मित्रांबरोबर दिवसभर जंगलात भटकताना निसर्गाचे केलेले सूक्ष्म निरीक्षण आजही त्यांच्या चित्रांमध्ये दिसते. म्हणूनच त्यांची चित्रे जिवंत व प्रभावी वाटतात. ते म्हणतात, "निसर्ग हाच माझा गुरू असून प्रेरणास्त्रोत आहे. तोच जगण्याची कला शिकवून नवी उमेद देतो. त्यामुळेच आमची जीवनशैली निसर्गस्नेही व पर्यावरणपूरक आहे. मोकळ्या निसर्गात जे ज्ञान मिळते ते आश्रमशाळेच्या चार भिंतीत मिळू शकत नाही. पाठ्यपुस्तकातील भाषा आम्हा आदिवासींना परकी वाटते. मग ते शिक्षण नुसतेच घोकंपट्टी व पोपटपंची ठरते. त्यामुळे मी शालेय शिक्षणात फारसा रमलो नाही. निसर्गाच्या उघड्या शाळेने मला खूप शिकवले, घडवले. त्यामुळे मी जे अनुभवतो तेच माझ्या चित्रांमध्ये उतरते. वारली समाजजीवन, संस्कृती मी चित्रातून व्यक्त करतो. प्रागैतिहासिक काळापासून मानव चित्रे रेखाटायचा. चित्र काढण्याच्या उपजत गुणामुळे मानवाने विविध कलांचा विकास केला. आदिवासी वारली जमात चित्रकलेबरोबरच वाद्यवादन, गायन, नृत्य यातही पारंगत आहे. मानवाची उत्क्रांती माकडापासून झाली. 'मिरीग मांज्या' म्हणजे धरतीवर जन्मलेला आदिमानव. त्याचाच वारसा आदिवासी जमाती आजही जोपासत आहेत. मी देखील त्याचाच अंश आहे. वारली कलेची परंपरा पुढे नेताना निरंतर संशोधन करीत राहीन." असा मधुकर यांचा निर्धार आहे.

                                          -संजय देवधर

( ज्येष्ठ पत्रकार व वारली चित्रशैलीतज्ज्ञ )

********************************

 तारपा वाद्य, नृत्य आणि चित्र !


   वारली कला जगभरात लोकप्रिय होण्यात तारपा हे वाद्य, त्यावर आधारित नृत्य व त्या-त्या प्रसंगाचे बहारदार चित्रण यांचा महत्त्वाचा वाटा आहे. बारशी, दसरा, दिवाळी या सणांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी आदिवासी पाड्यांवर तारपानृत्य केले जाते. 'मिरीग मांज्या'ने एकूण १६ प्रकारच्या वाद्यांची निर्मिती केली. त्या वाद्यांचा मधुकर अभ्यास करीत आहेत.

           या संदर्भात ते म्हणाले, "तारप्याचे अनेक प्रकार आहेत. बिलोडी तारपा हा एक दांडीचा छोटा शिकाऊ प्रकार आहे. तो प्रामुख्याने गुराखी मुले वाजवतात. सवरी तारपा हा वाकड्या आकाराचा असून त्यात मध्ये फुंक घालून वाजवला जातो. घोगा तारपा हा सरळ आकाराचा असून त्याचा कर्णा  छोटा असल्याने त्याला बांडा तारपा असेही म्हणतात. रवली शवरी तारप्याचा कुलदैवतात समावेश असल्याने त्याला देवाजवळ ठेवतात. डांगी तारप्याला दोन बांबूच्या नळ्या असून कर्ण्यासाठी बैलाचे शिंग वापरले जाते. लग्नप्रसंगी देवपूजनात व वास्तुशांत प्रसंगी त्याला मानाचे स्थान मिळते. ढोंग्या सोंगाडी तारप्याची उंची ८ फुटांपर्यंत असते. तो बघतांना हसू येते. मठघोंगाड तारपा मंदिरातील देवपूजा करतांना वापरला जातो. त्याच्या सुरावटीवर कधीही नृत्य केले जात नाही. देवडोबडी तारप्याला लग्नसोहळ्यात अग्रभागी पूजेचा मान मिळतो. त्याला मोरपिसांनी सजवले जाते. काहीवेळा जमातीतील वृद्ध, प्रतिष्ठित व्यक्तीच्या मृत्यूनंतर देखील देवडोबडी तारपा वाजवतात. पावरी तारपा अगदी छोट्या आकाराचा असतो. तारपा हे वाद्य दुधीभोपळा वाळवून, कोरून केले जाते. ते बनविणे व वाजविणे या स्वतंत्र कला आहेत." असे सांगणाऱ्या मधुकर यांनी तारपानृत्याची व इतर विषयांवर अनेक आकर्षक चित्रे रेखाटली आहेत. त्यातून त्यांचे वेगळेपण लक्षात येते.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !