' लोकराजा 'चे दिमाखात आगमन होत आहे ! संपादकीय सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !! सर्वांना दिपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा ! - संपादक.
दि. २८ आक्टोबर २०२१ चे संपादकीय,,,,,
' लोकराजा 'चे दिमाखात होणार आगमन !
दिवाळी अंकांच्या बाजारात चैतन्य निर्माण झाले आहे. त्यातच न्यूज मसाला साप्ताहिकाचा ' लोकराजा ' दिवाळी अंक उद्या दिमाखात दाखल होत आहे. १० वर्षांची परंपरा कायम ठेवत 'लोकराजा' दिवाळी विशेषांक नेहमीच वाचक, साहित्यिक, वर्गणीदार यांच्यात लोकप्रिय ठरला आहे. अनेक पुरस्कार प्राप्त झाल्याने जबाबदारीत वाढ करून घेतली. आंतरराष्ट्रीय दिवाळी अंक संघटनेकडूनही गौरविण्यात आले मात्र अडचणींना तोंड देतांना ' लोकराजा 'ने दर्जात कधीही तडजोड केली नाही व करीत नाही. जाहिरातींचा ओघ कमी झाला त्यामुळे आर्थिक ओढाताण सहन करावी लागते पण सर्वांचा विश्वास संपादन केला असल्याने यंदाही ' लोकराजा ' तुमच्या आनंदात भर घालण्यासाठी दिवाळीचा साहित्यिक फराळ घेऊन येत आहे. हे सांगताना निश्चितच समाधान वाटते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेली दीड वर्षे सर्वानाच खूप अडचणींना सामोरे जावे लागले. त्यातून वृत्तपत्रे, साप्ताहिके, मासिके व प्रकाशन संस्थादेखील सुटल्या नाहीत. गतवर्षीच्या कठोर टाळेबंदीत प्रकाशन व्यवसाय अनेक संकटात सापडला. काही वृत्तपत्रे, साप्ताहिके बंद पडली. वृत्तपत्रांची पृष्ठसंख्या कमी करावी लागली. अनेकांनी रविवारच्या पुरवण्या बंद किंवा कमी केल्या. माध्यमकर्मींच्या नोकऱ्या गेलेल्या, बिकट परीस्थिती ने ग्रासल्याने गेल्यावर्षी अनेक दिवाळी अंक प्रकाशित होऊ शकले नाहीत. पण दिवाळी अंक आणि साहित्यिक फराळ हे महाराष्ट्रात समीकरण झाले आहे. हे लक्षात घेऊन ' लोकराजा 'ने हिंमत न हारता गेल्यावर्षी देखिल वाचकांची निराशा केली नाही. आर्थिक नुकसान सोसून दिवाळी अंक वाचकांपर्यंत पोहोचवला. वाचकांनीही त्याचे स्वागत केले व भरभरून प्रतिसाद दिला. त्यामुळे यंदाही दिवाळी अंकांच्या बाबतीत असलेली मरगळ दूर सारून ' लोकराजा 'चे आगमन होतच आहे. साप्ताहिक न्यूज मसालाच्या "लोकराजा" दिवाळी विशेषांकाच्या मुखपृष्ठावर आजी-माजी संसद सदस्य (खासदार) यांचे छायाचित्र प्रकाशित करण्यात येते. परंपरेप्रमाणे यावर्षी खा. उदयनराजे भोसले यांचे मुखपृष्ठ व त्यांच्या व्यक्तिमत्वाचा वेध घेणारा प्रा. तरूजा भोसले-वळसंगकर यांचा विशेष लेख हे खास आकर्षण आहे. याशिवाय उत्तम कथा, कविता, वैचारिक लेख व अन्य साहित्य यांचा दरवर्षीप्रमाणे समावेश आहेच. तो तुमचा आनंद द्विगुणीत करेल.
गेल्यावर्षी अडीचशे ते तीनशे रुपये किंमतीचे सुमारे १५० अंक बाजारपेठेत आले होते. यंदा मात्र काहीसे वेगळे चित्र आहे. अनेक निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. १०० कोटींपेक्षा जास्त प्रमाणावर लसीकरण झाल्याने मोकळे वातावरण तयार होत आहे. उद्योग- व्यवसाय गती घेत आहेत. तरीही यंदा खूप कमी संख्येने दिवाळी अंक वाचकांच्या भेटीला येतील. जाहिरातींचे प्रमाण कमीच आहे. शासनाच्या जाहिराती सुद्धा कमी दिसतील. वाचनालये पुरेशा ताकदीने कार्यरत झालेली नाहीत. शैक्षणिक क्षेत्र अजूनही चाचपडते आहे. तरीही दिवाळी अंकाची शतकी परंपरा त्याच जोमात सुरू ठेवण्याच्या जिद्दीने ठराविकच प्रकाशक कार्यरत आहेत. टपालाच्या माध्यमातून अंक पाठवताना किंमतीची मर्यादा पाळावी लागते. कागद, छपाई यांचे दर व खर्च वाढला आहे. काही दिवाळी अंकांना दैनिकांचे पाठबळ असते. मोठी यंत्रणा राबत असते. जाहिराती मिळवण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ असते. मात्र ' लोकराजा ' कडे यांपैकी काही नसले तरी वाचनसंस्कृती रुजविण्याची ताकद, मराठी भाषेचा समृद्ध वारसा जपण्याचा प्रयत्न व वैचारिक जाणिवा पोहोचविण्याचा दृष्टिकोन तसेच प्रेम करणारे पाठीराखे आहेत हे महत्वाचे. आमचा नियमित वाचक हेच आमचे बळ आहे. त्यांच्या भेटीसाठी येतांना आम्हालाही समाधान वाटते. सर्व वाचक, जाहिरातदार, लेखक, कवी, न्यूज मसाला व लोकराजा वर प्रेम करणारे प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, मोजके राजकीय, सामाजिक कार्यकर्ते, मित्र परिवार, आप्तेष्टांना दिपावली च्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !
संपादक-
साप्ताहिक न्यूज मसाला,
संपादक - लोकराजा दिवाळी विशेषांक
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा