अंतराचा अक्षरोच्चार म्हणजे कविता – संतोष हुदलीकर सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
अंतराचा अक्षरोच्चार म्हणजे कविता – संतोष हुदलीकर
नाशिक दि. - कवितेमध्ये तांत्रिकता महत्वाची नसते आणि तसा हट्टही नसावा. कारण तंत्रशुद्ध कविताच कविता असतात आणि इतर कविता या कविता नसतात का? असा मुलभूत प्रश्न निर्माण होतो. कवितेमध्ये भावगर्भता असावी, रचनेमध्ये सुलभता असावी. कवीने अथवा लेखकाने सातत्याने लिहित जावे. कवीला हुकमी लिहिता यायलाच हवे याबरोबरच कवितेमध्ये उत्स्फूर्तता असावी, शब्द लालित्य असावे. असे प्रतिपादन कवी संतोष हुदलीकर यांनी केले ते नाशिक कवीच्या काव्यकोजागरी निमित्ताने आयोजित कवी, कविता आणि काव्यसंस्था या विषयावर बोलत होते. यावेळी नाशिक कवीचे कार्यवाह सुभाष सबनीस यांनी कवी आणि काव्यसंस्था याविषयी बोलतांना कवीने एखाद्या कवितेत अडकून पडू नये तसेच नवोदितांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांशी आपली नाळ तुटू देवू नये असे सांगितले. प्रमुख पाहुणे आर्किटेक्ट कवी प्रवीण पगार म्हणाले मी कवी असल्याचा मला अभिमान आहे असाच अभिमान प्रत्येक कवीने आपल्या मनी बाळगला पाहिजे. कार्यक्रमाचे आणि ‘नाशिक कवी’ चे अध्यक्ष इंजी.बाळासाहेब मगर यांनी आपल्याला काही सुचल्यानंतर ते जर लिहून ठेवले नाही तर पुन्हा ती कल्पना त्याचा आशय आठवत नाही. त्यामुळे सुचल्याबरोबर लिहिलेच पाहिजे असे सांगितले. ते पुढे म्हणाले नवोदित कवींना व्यासपीठ मिळवून देण्याचे कार्य गेले एकोणीस वर्षापासून सातत्याने करणारी नाशिक कवी अनेक उपक्रम राबवीत असते. यावेळी कोजागरी निमित्ताने ऑनलाईन काव्यस्पर्धा घेण्यात आल्या त्याचा निकाल जाहीर करण्यात आला. विजेते पुढील प्रमाणे- प्रथम पुरस्कार कवयित्री स्मिता बनकर, द्वितीय संयुक्ता कुलकर्णी, तृतीय जयश्री कुलकर्णी, उत्तेजनार्थ समाधान भामरे, माधुरी शेवाळे आणि शीतल गजरे. या स्पर्धेचे परीक्षण औरंगाबाद येथील जेष्ठ कवयित्री सौ.प्रिया धारूरकर यांनी केले. यावेळी कवी अरुण इंगळे, शिवाजी ठाकरे, अरुण सोनवणे, राधाकृष्ण साळुंखे, अमोल चिने, दत्ता दाणी, सारिका पारखी, स्वानंद पारखी, विशाल टर्ले, सौ भारती देव, सौ मानसी देशमुख, विनय पाटील,किरण मेतकर, शुभम मोरे, राजेंद्र उगले यांनी आपल्या कविता सादर केल्या. सदर कार्यक्रम भावबंधन मंगल कार्यालय, नवीन मखमलाबाद नाका, येथे आयोजित करण्यात आला होता.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरणा गौरवचे सुरेश पवार यांनी केले.
धन्यवाद नरेंद्रजी
उत्तर द्याहटवा🙏
उत्तर द्याहटवा