अनंतरूपी वारली चित्रकला ! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!


अनंतरूपी वारली चित्रकला !


   आदिवासी वारली चित्रकला अनंत रूपांतून बघायला मिळते. काही ठिपके, सरळ, आडव्या, तिरप्या व लयदार रेषा आणि त्रिकोण, वर्तुळ, चौकोन या मूलभूत आकारांचा वारली चित्रे रेखाटण्यासाठी वापर केला जातो. तांदळाच्या पिठाचा पांढराशुभ्र रंग गडद पार्श्वभूमीवर उठून दिसतो. अतिशय अल्प सामग्री वापरूनही सुंदर दिसणारी वारली चित्रांमधली आशय-विषयांची विविधता थक्क करते.अनंत अज्ञात वारली कलाकारांनी ११ शतके योगदान देऊन हे आदिम कलेचे दालन समृद्ध केले आहे. आज अनंत चतुर्दशी आहे, त्या निमित्त हा धांडोळा...


   डोंगरदऱ्यांमध्ये, रानावनात दुर्गम पाड्यांवर निसर्गाच्या सान्निध्यात आदिवासी वारली जमात राहाते. निसर्गाच्या बरोबरीने आपल्या परंपरा जोपासणारे निरागस वारली स्त्रीपुरुष झोपडीची भिंत चित्रांनी सजवून आनंद व्यक्त करतात. एका प्रकारे ते आदर्श डिझाइनर आहेत! अबोल आदिवासी वारली कलावंत आपल्या अनोख्या व साध्यासोप्या चित्रशैलीद्वारे आकारांमधून बोलतात, मनापासून व्यक्त होतात. त्यांच्या डोळ्यांना जसं दिसतं, जाणवतं तसं ते रेखाटतात. आकाशात विहार करताना पक्ष्यांना जशी सृष्टी दिसते तशाच प्रकारचे हे वैशिष्ट्यपूर्ण चित्रण असते. अत्यंत निरागस भावनेने प्रामाणिकपणे काढलेली ही चित्रे सर्वसामान्य माणसाला भावतात. कोणालाही सहज समजतात व आनंद देतात. हल्ली चुन्याने किंवा पांढऱ्या रंगाने रंगवलेली चित्रेही बऱ्याचदा आढळतात. रेषांशी लीलया खेळत प्रतिमांचे केलेले हे रेखाटन बघणाऱ्याला गुंगवून ठेवते. माणसे, प्राणी, पक्षी, झाडे, वृक्षवेली, झोपड्या, डोंगर, त्यातून वाहणारे झरे यांचे रेखाटन करताना वारली चित्रकारांनी केलेल्या सूक्ष्म निरीक्षणाचा प्रत्यय येतो.


   अनेक वारली चित्रे बघितली तर त्यात आदिवासी वारल्यांची सरळसोपी वृत्ती प्रकर्षाने जाणवते. निसर्ग, पर्यावरण यांची जपणूक करत त्यांच्या संगतीने जगतांना त्यांनी आपली सौंदर्यदृष्टी देखील जपली आहे. निसर्गाचे उपकार मानून, त्याची हानी होऊ न देणारी जीवनशैली त्यांनी अंगिकारली आहे. त्यामुळेच चित्रांसाठी विषय शोधायला त्यांना कुठे जावे लागत नाही किंवा कल्पनाशक्तीला फार ताण द्यावा लागत नाही. तरीही वारली चित्रांमध्ये अगणित विषय बघायला मिळतात. केवळ पांढऱ्या रंगछटेचा इतका प्रभावी वापर मला वाटते जगाच्या पाठीवर फक्त वारली चित्रांमध्येच होत असावा; तरीही त्यातली विविधता आणि रूपाकार थक्क करतात. कलाकारांच्या हृदयातून निघून बोटांमधून झिरपून साकारलेली ही चित्रे सहज संवाद साधतात. अवघड आकारांचे सुलभीकरण ही तर वारली चित्रशैलीची खासियत !
(अशा या कलेत आपली नाममुद्रा उमटवून योगदान देणाऱ्या प्रतिभावान वारली कलाकारांचा परिचय पुढील अंकापासून.)

                                             -संजय देवधर

           ( ज्येष्ठ पत्रकार व वारली चित्रशैलीतज्ञ )

***********************************
वारली चित्रशैलीची ठळक २१ गुणवैशिष्ट्ये !


● महिलांनी ११०० वर्षे जपलेली लोककला.

● ठिपके, रेषा व मूलभूत आकारांचा वापर.

● तांदळाच्या पिठाचा पांढरा रंग.

● किमान साहित्यातून कमाल कलानिर्मिती.

● आकारांचे सुलभीकरण.

● आकारांची पुनरावृत्ती व आकर्षक किनार

● एकाच वेळी विविध क्षितिज पातळ्यांवर             बहारदार रेखाटन.

● सकारात्मक विषय - आशय.

● उत्स्फूर्तपणे केलेला बोलका आविष्कार.

● लवचिकता असल्याने मुक्त चित्रांकन.

● मोकळी जागा न सोडता केलेली रचना.

● क्ष -किरण पध्दतीचे चित्रण.

● सूक्ष्म निरीक्षण. 

● वास्तव व कल्पनेचा सुंदर मिलाफ.

● एकाच वेळी समोरून व वरून दिसणाऱ्या         दृश्यांचा समन्वय.

●  प्रतिमा व प्रतीकांचा सुरेख वापर.

● कोणालाही चित्रे सहज समजतात.

● चित्र 'काढण्या'ऐवजी 'लिहिले' जाते.

● कलेचे सर्वमान्य रूढ नियम ओलांडून काम.

● कलेविषयी सश्रद्ध भावना.

● झटपट शिकून आत्मसात करता येते.

● जागतिक कॅनव्हासवर लोकप्रियता.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !