न्यूज मसाला प्रकाशित वारली चित्रकला अभ्यासक संजय देवधर यांच्या लेखमालेवर विविध मान्यवरांच्या आलेल्या प्रतिक्रिया !! सर्वदूर पोहचलेले, मान्यवरांनी गौरविलेले, नासिकमधून प्रकाशित होणारे साप्ताहिक न्यूज मसाला !!!


आता नवा संकल्प प्रतिभावान 
वारली चित्रकारांच्या परिचयाचा...
         आदिवासी वारली चित्रशैलीविषयी माझी ४ मराठी व २ इंग्रजी पुस्तके २००८ ते २०१६ दरम्यान मी प्रकाशित केली. त्यानंतरही वारली कलेचे अनेक पैलू उलगडत गेले. त्यावर एक लेखमाला लिहावी अशी कल्पना मनात आली. त्याप्रमाणे २०१९ च्या गणेशोत्सवात 'निसर्गपुत्रांचा सुरेख कलाविष्कार' हा पहिला लेख लिहून श्रीगणेशा केला. सुरुवातीला २० -२५ लेख होतील असे वाटले. पण लेखमाला जसजशी पुढे सरकत गेली, तसतसा या विषयाचा मोठा आवाका लक्षात आला. नवनवे विषय समोर येत गेल्याने ५० लेखांचा संकल्प केला. संकल्पसिद्धी होण्यास दोन वर्षे लागली. गेल्या वर्षभरात मला अनेकांनी त्यांच्या प्रतिक्रिया कळवल्या. पुनरावृत्ती टाळून त्यातील काहींंचा समावेश या ५१ व्या लेखात केला आहे. ही लेखमाला संपत आली असतानाच, पुढील संकल्प आहे तो प्रतिभावान वारली कलाकारांच्या परिचयाचा...
***************************************
लेखमालेमुळे तपशील समजले
          मी स्वतः वारली जमातीची असूनही मला माहिती नसलेले वारली कलेचे तपशील देवधर सरांकडून समजले. त्यांच्या लेखमालेत त्यांनी विविध पैलूंवर प्रकाश टाकला आहे. ते जेव्हा तलासरीला आले होते तेव्हा आमची भेट होऊ शकली नाही. पण नंतर त्यांनी फोनवरून माझी मुलाखत घेऊन लेख लिहिला. त्यांनी अगदी नेमकं लिहिलं आहे की, महिलांनी ११०० वर्षे जपलेली ही कला असूनही हल्ली फार कमी स्त्रिया वारली चित्रे रंगवतात. मी सातत्याने वारली चित्रे रंगवते. मला फ्रान्सला चार वेळा जाण्याची संधी मिळाली. सरांनी त्यांच्या लेखात माझी पद्म पुरस्कारासाठी शिफारस केली. त्यासाठी त्यांनी पाठवलेला फॉर्मही मी भरला आहे. देवधर सरांची प्रत्यक्ष भेट व्हावी यासाठी मी त्यांना निमंत्रित केले आहे. वारली कलेवरील प्रेमामुळे ते नक्कीच येतील ही खात्री वाटते.
रीना उंबरसाडा -वळवी
(सावरोली - तलासरी )
**************************************
कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन मिळाला !
            माननीय संजय देवधर सरांची व माझी ओळख वारली चित्रकलेच्या प्रेमामुळेच झाली. मी नाशिकला जाऊन त्यांच्याकडे वारली कला शिकलो. त्यांनी कलेकडे बघण्याचा दृष्टिकोन दिला. मी जरी पूर्वीपासून वारली चित्रे काढत असलो तरी वारली समाजापासून खूप दूर आहे. सरांच्या लेखमालेमुळे वारल्यांची संस्कृती, परंपरा, रीतिरिवाज, जीवनशैली याविषयी माहिती मिळत गेली, बारकावे समजले. येणाऱ्या रविवारी त्यांनी नवीन काय लिहिले आहे याची उत्सुकता कायम राहिली. पोलिस दलातील कामात व्यग्र असताना मला वारली कला विरंगुळा देते. त्यातून नवी ऊर्जा मिळते.
           मीही शाळा,महाविद्यालयांत वारली कलेविषयी कार्यशाळा घेतो. त्यासाठीही या लेखमालेचा मला खूप उपयोग झाला. आम्ही वारली चित्रप्रेमींचा ग्रुप तयार केला आहे. गुरुस्थानी असलेल्या सरांच्या नव्या पुस्तकाची वाट बघत आहोत.
शेखर मारोतराव वांढरे 
(वणी, यवतमाळ)
*************************************
लेखमालेने प्रभावित केले...
              डांग, गुजरात भागात राहून मी वारली चित्रशैली जोपासत आहे. साधारण एक वर्षांपूर्वी पत्रकार संजय देवधर सरांचा त्यांनी भास्कर कुलकर्णी यांच्यावर लिहिलेला 'लोककलांचा तारणहार' हा लेख माझ्या वाचनात आला. त्याने प्रभावित होऊन पुढील लेखांची वाट बघायला लागले. वारली जमातीची निसर्गचक्रावर आधारित जीवनशैली व त्यांचे सण- उत्सव, चालीरीती यावर सरांनी तपशीलवार केलेल्या लेखनाने मोलाचे मार्गदर्शन मिळाले. ते पुढील पिढ्यांना उपयुक्त ठरेल. वारली कलासंस्कृती इंटरनेटच्या जमान्यात मूळ स्वरूपात जोपासणे हे आव्हान आहे. ते पेलण्याची शक्ती व दृष्टी लेखमालेने दिली.
-गौरवी घोडके - दुसाने
(अहवा, डांग )
***************************************
 सखोल संशोधनावर आधारित लेखन
                एका आदिवासी कलेचा ध्यास घेऊन देवधर सरांनी लेखमाला लिहिली व साप्ताहिक न्यूज मसाला ने प्रकाशित केली त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. सखोल अभ्यास व संशोधनावर आधारित या लेखांमधून आम्हाला नवनवे विषय, माहिती, तपशील समजत गेले. त्यांची साध्यासोप्या शब्दात लिहिण्याची हातोटी उल्लेखनीय आहे. त्यामुळे समाजाच्या सर्व स्तरात कला पोहोचेल. या सगळ्या लेखांचा संग्रह पुस्तक स्वरूपात लवकरच प्रकाशित होवो या शुभेच्छा. त्यामुळे कलेची जोपासना व संवर्धन होण्यास मदत होईल.
-हर्षद थविल
(गारमाळ, सुरगाणा)
****************************************
सर्वसामान्यांपासून जाणकारांपर्यंत उपयुक्त                           अथकपणे परिश्रम घेऊन देवधर सरांनी तसेच न्यूज मसाला साप्ताहिकाने प्रकाशित वारली चित्रशैली ५१ लेखांद्वारे सर्वांपर्यंत पोहोचवली. त्यांचे हे अलौकिक कार्य सर्वसामान्यांपासून कलेच्या अभ्यासू जाणकारांपर्यंत सर्वांना उपयुक्त आहे. त्यांनी अनेक पैलू उलगडून विविध विषय तपशीलवार जगासमोर आणले. एव्हढेच नाही तर अनेक वारली कलाप्रेमींना एका मंचावर आणले. मी शेगावच्या संत श्री गजानन महाराजांच्या पोथीवर आधारित २१ वारली चित्रांची मालिका केली. त्याची दखल घेऊन देवधर सरांनी यथोचित प्रसिद्धी दिली. त्यामुळे आमचा परिचय झाला व तो दृढ होत गेला. त्यांच्या आगामी 'समग्र वारली चित्रसृष्टी' ग्रंथासाठी शुभेच्छा!गंधाली  घोंगडे
(अकोला, विदर्भ )
****************************************
कलाप्रेमींना वारली कलेशी जोडले!
            पत्रकार व चित्रकार संजय देवधर सरांची वारली कलेच्या प्रचार प्रसारासाठी अखंड सुरु असलेली धडपड उल्लेखनीय आहे. त्यांच्या प्रयत्नांमुळे आमच्यासारखे असंख्य कलाप्रेमी वारली कलेशी जोडले गेले. त्यांच्या ओघवत्या शैलीतून  आदिवासी वारली कला-संस्कृतीचे विविध पैलू आमच्या समोर आले. या लेखमालेने साऱ्यांना आकृष्ट केले. असे काम सातत्याने करणे सोपे तर नाहीच. कलासाधनेकरिता सातत्य कसे जपावे याचे हे उत्कृष्ट उदाहरण म्हणावे लागेल.देवधर सर हैदराबादलाही आले होते. त्यांनी वारली कलेचे प्रशिक्षण देऊन तसंच अभ्यासपूर्ण सचित्र व्याख्यानातून वारली कलेची व्याप्ती समजावून सांगितली.
शिल्पा कोठारी, तृप्ती मेहता
(हैदराबाद)
****************************************
    वेधक आणि सांगोपांग विवेचन
              आदिवासी वारली चित्रकला हा श्री संजय देवधर यांच्या केवळ रुची व अभ्यासाचा विषय नाही. तो त्यांचा नित्यध्यास आहे. वृत्तपत्रीय कारकिर्दीत त्यांनी दैनिक गांवकरीचा कलाविभाग कुशलतेने सांभाळला. नंतर २५ वर्षे वार्ताहर, ज्येष्ठ उपसंपादक म्हणूनही लक्षणीय काम केले. विविध ललित कलांची त्यांनी वेळोवेळी केलेली आस्वादक समीक्षा लक्षवेधी ठरली. आता ते मुक्तपत्रकार म्हणून कार्यरत      आहेत. वारली चित्रशैलीचा देवधर सातत्याने संशोधनात्मक अभ्यास करीत आहेत. त्यातील वेचक तपशील वेधक व सांगोपांग विवेचनाद्वारे  वाचकांपर्यंत पोहोचवला. त्यांच्या स्वागतशील, नितळ लेखनशैलीतून त्याचा वारंवार प्रत्यय येतो. त्यांच्या  'संकल्प त्रिवेणीला ' पत्रकार, स्नेही या दुहेरी नात्याने मनःपूर्वक शुभेच्छा !
पराग वाड
(नाशिक )
*****************************************
     ही लेखमाला म्हणजे सुवर्णभेट...
             साधारणपणे ७० च्या दशकात आदिवासी वारली चित्रकला उजेडात आली. नंतर ८० च्या दशकात ती देशभरात व काही काळाने जगभरात पोहोचली. त्यात भास्कर कुलकर्णी,पद्मश्री जिव्या मशे व इतर अनेकांचे मोठे योगदान आहे. त्यांच्याप्रमाणेच संजय देवधर यांनी वारली कलेचा इतिहास, सद्य:स्थिती व भवितव्य याविषयी संशोधनात्मक अभ्यास केला. निरंतर ध्यास घेऊन पुस्तके व लेखमाला लिहिली. वारली कला लोकप्रिय ठरल्याला लवकरच ५० वर्षे पूर्ण होतील. अशावेळी देवधरांनी लिहिलेले ५० लेख साप्ताहिक न्यूज मसाला कडून प्रकाशित होणे म्हणजे  कलारसिकांना त्यांनी दिलेली जणु सुवर्णभेटच आहे. ती पुस्तकरुपात सर्वांसमोर यावी यासाठी शुभेच्छा,
   भारती टेंबे
(बेळगाव - पुणे )
**************************************
      वारली चित्रे कायमच आनंद देत राहतील
                     साध्यासुध्या, सुंदर आदिवासी वारली कलेतील गुणवैशिष्ट्ये हेरून श्री.संजय देवधर सरांनी या कलेचा ध्यास घेतला. या कलेच्या भवितव्याचा विचार केला असता त्यांचे नृत्य, गाणी, संस्कृती काळाच्या ओघात मागे पडेल पण चित्रे टिकतील व कायमच आनंद देत राहतील. वारली कलाकारांच्या मूळ कलाकृती संग्रहित होण्याचीही गरज आहे. आधुनिक कलेचे शास्त्रशुध्द शिक्षण घेतलेल्यांनी वारली चित्रे काढण्यापेक्षा दुर्गम पाड्यांवरच्या युवा कलाकारांचा शोध घेऊन त्यांना संधी देणे महत्त्वाचे ठरेल. वारली कलेच्या भ्रष्ट नकला म्हणजे वेगळ्या अर्थाने सांस्कृतिक शोषणच! ते थांबले पाहिजे. देवधर सर तशाच स्वरुपाचे कार्य  अनेक वर्षांपासून करीत आहेत. त्यांच्या लेखमालेने कलाकारांना बळ मिळाले व रसिकांना आनंद लाभला.
    गणेश सुरेश जोशी
(बार्शी - सोलापूर )
*****************************************
      माझ्या कलासाधनेला बळ मिळाले.
                 खरं तर मी माहिती - तंत्रज्ञान क्षेत्रात कार्यरत आहे. मला कलेची आवड असून देवधर सरांच्या पुस्तकांवरून मी वारली कला शिकले. माझी प्रगती बघून मला त्यांनी त्यांच्या ग्रूपमध्ये सहभागी करून घेतले. आम्हा मुंबई, पुण्यातील कलाप्रेमींना आदिवासी भागात जाऊन माहिती मिळवणे वेळेअभावी शक्य नसते. अशांसाठी देवधर सरांची अभ्यासपूर्ण लेखमाला वरदान ठरली आहे. त्यातील लेखांचा मला खूप फायदा होत असून त्यामुळे माझ्या कलासाधनेला बळ मिळाले आहे. कामातील विविधता व दर्जा वाढला आहे. त्याचे श्रेय मी सरांना व त्यांच्या लेखमालेला देते.
मयूरा दीक्षित - बुधकर
(पुणे )
*****************************************
     कलेची शुद्धता जपणे महत्वाचे...
                    प्रवाही रेषा व सोप्या आकारातून जन्मलेल्या वारली कलेतील साधेपणा, सोपेपणा सर्वांना भावतो. जिव्या सोमा मशे यांनी त्यांचे संपूर्ण आयुष्य या कलेसाठी समर्पित केले.असे अनेक अज्ञात कलाकार योगदान देत आहेत. मात्र अलीकडे वारली कलेच्या नावावर बाजारपेठेत काहीही खपवले जाते. त्यामुळे वारली कलेची शुध्दता जपणे महत्त्वाचे ठरले आहे. संजय देवधर सर त्यासाठी प्रयत्नशील असून वारली कलाकारांना त्यांच्या कलेचा योग्य मोबदला मिळावा यासाठी ते आग्रही असतात. त्यांच्या लेखमालेतील सर्व लेख अभ्यासपूर्ण असून सोप्या शब्दात सचित्र मांडणी केल्याने मनात ठसतात. मी मूळची पेठ तालुक्यातील असल्याने वारली कला आमच्यासाठी मोलाची आहे. 
   अनुराधा गवळी
  (पेठ, पुणे )
***************************************
     मशेंच्या क्रांतिकारक कार्याची महती

                मी रामायणावर आधारित वारली चित्रे रेखाटली. देवधर सरांना ते समजल्यावर त्यांनी संपर्क साधून उत्तम लेख लिहिला. माझे काम सर्वदूर पोहोचले. नंतर त्यांच्या नव्या लेखांची मी उत्सुकतेने वाट बघायला लागले. साप्ताहिक न्यूज मसाला प्रकाशित त्यांचे पद्मश्री जिव्या सोमा मशे यांच्यावर लिहिलेले वारली चित्रशैलीचे पितामह आणि जिवाभावाचे मनोगत हे लेख अतिशय आवडले. त्यातून मशे यांच्या क्रांतिकारक कार्याची महती समजली. सरांचा प्रत्येक लेख वाचतांना त्यांची कलेविषयी असणारी तळमळ, आस्था जाणवते. त्यांच्या कार्यात एका लेखाच्या रूपाने माझाही खारीचा वाटा आहे याचे समाधान आहे.पूं

पूजा झंवर - गगराणी

(मालेगाव )

*****************************************                             संजय देवधर

  जेष्ठ पत्रकार तथा वारली चित्रकला अभ्यासक

 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !