महिलांनी जोपासली वारली चित्रशैली ...! दीर्घ लेखमालेचा सचित्र आढावा ( भाग दुसरा). सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
आजही ८० टक्के आदिवासी निसर्गाच्या सान्निध्यात राहतात. त्यांच्या जगण्याच्या मूलभूत बाबी जंगलाशी निगडित आहेत. म्हणून निसर्गातील विविध प्रतिके त्यांची कुलदैवते असून त्यांविषयी त्यांच्या मनात नितांत आदरभाव, श्रद्धा आहे. त्यातून आपोआपच जैवविविधता जपली जाते. शहरातील माणूस जीवनाचा शाश्वत आनंद शोधतो आहे. स्वाभाविक प्रवृत्तीचा हा शोध आपल्याला आदिम संस्कृतीची जीवनमूल्ये, जीवनशैली यांच्याकडे डोळसपणे बघायला शिकवतो. महिलांनी अकरा शतके जोपासलेली वारली चित्रशैली अभ्यासताना त्यांची परंपरा, लोकसंस्कृती यांची होणारी ओळख अंतर्मुख करते. मी या दीर्घ लेखमालेतील पन्नास लेखांमध्ये त्यातील विविध पैलूंचा आढावा घेण्याचा प्रयत्न केला. अकराशे वर्षे ही समूहकला टिकून राहिली, याचे कारण ती दैनंदिन जीवनशैलीशी जोडली गेलेली आहे. रीतिरिवाज, सण - उत्सव, परंपरा यांच्याशी या कलेचे घट्ट नाते निर्माण झाल्याने ती अखंड ताजी,🎂 टवटवीत राहिली आहे. परिवर्तन झाले तरी मूळ गाभ्याला धक्का लागणार नाही, याचीही दक्षता या कलावंतांनी घेतली. पुढच्या पिढ्यांनी या वारशाची जपणूक करीत, आपल्या परीने वारली कलेत डोळसपणे मोलाची भर घातली.आज मात्र सर्वत्र महिलांपेक्षा पुरुष कलाकारच चित्रनिर्मिती करण्यात आघाडीवर असल्याचे चित्र सर्वत्र दिसते.
आदिवासी वारली चित्रशैली ही महिलांची कलानिर्मिती आहे. भारतातल्या बहुतेक सगळ्या लोककला महिलांनी आपले जीवन, घर, परिसर सुंदर सुशोभित करण्यासाठी निर्माण केल्या, फुलवल्या, वाढवल्या व पुढील पिढीच्या हाती सोपवल्या. पुरातन काळापासून वारली महिला आपल्या झोपडीच्या भिंती शेणाने सारवून त्यावर तांदळाच्या पिठाने चित्रे रेखाटून गृहसजावट करीत आहेत. पर्यावरणाचा समतोल साधत, निसर्गाच्या लयतत्त्वाशी इमान राखणारी वारली चित्रकला म्हणजे महिलांनी केलेली पंचतत्त्वांची पूजा आहे. पर्यावरण रक्षण, संवर्धन हा त्यांच्या साध्यासुध्या व अत्यंत कमी गरजा असणाऱ्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. दुर्गम भागात निसर्ग सान्निध्यात रममाण झालेल्या वारली जमातीला कशाचाच हव्यास नसतो. वारली चित्रशैलीत झाडे, वेली, पशुपक्षी आणि माणसाचे दैनंदिन जीवन यांना महत्त्वाचे स्थान आहे. निसर्गसाखळी व जैवविविधता यांची ते हानी होऊ देत नाहीत. लोककलांमध्ये नियोजनबद्ध असं काही नसतं. तो उत्स्फूर्त कलाविष्कार असल्याने रसरशीत, जिवंत वाटतो. वारली कलाकारांनी रेखाटलेली प्रत्येक रेषा ठाशीव व अंतिम असते. म्हणूनच त्यातील उत्स्फूर्तता लक्षवेधी व मनमोहक ठरते. वारली जमातीतील निसर्गपुत्रांचा कलाविष्कार ही सांकेतिक चित्रलिपी आहे. जगातल्या अनेक भाषांची मूळ लिपी चित्रांनीच तयार होते. वारली चित्रांत निरागस आदिम संस्कृतीचे प्रतिबिंब पडले आहे. या रेखाटनातील काहीशा गूढ संकेतांचे अर्थ समजून घेणे अवघड असले तरी अशक्य नक्कीच नाही!
आदिवासी वारली जमातीतील स्त्रीपुरुष निसर्गाशी एकरूप झालेले असल्याने पर्यावरण रक्षण, संवर्धन आपोआपच घडते. ही एक साहजिक प्रक्रिया आहे. आपण काही वेगळे, मुद्दाम करतोय असे त्यांना वाटतच नाही. स्वच्छंदी, स्वतंत्र जीवनाची त्यांना उपजत आवड असते. सण- उत्सव, विविध देवदेवतांचे पूजाविधी, सामूहिक नृत्य, लग्नसोहळे यात ते मनापासून रममाण होतात. त्यांच्या मनमोकळ्या जीवनाचे प्रसन्न पडसाद सहजपणे चित्रांमध्ये उमटतात. रेषा- आकारांतील हा आनंददायी मुक्तछंद रसिकांना सहजपणे अनुभवता येतो. आदिवासी बांधवांच्या खडतर आयुष्यात सणांमुळे आनंदाचे थोडेबहुत क्षण येतात. वारली कलाकारांनी याच सकारात्मक ऊर्जेला सुंदर चित्ररुप दिले आहे. नकारात्मक विचारांना त्यात थारा नाही. निसर्ग, पर्यावरण, सभोवतालचा परिसर आणि मानवी जीवनाविषयी शुभचिंतन त्यात दिसते. चित्रांतून प्रकटणारे समाधान पाहणाऱ्यांनाही संतुष्ट करते. वारली जमातीतील स्त्रीपुरुष नृत्य, संगीत व चित्रांद्वारे आपला आनंद मुक्तपणे व्यक्त करतात. प्रतिकूल परिस्थितीतही जीवनाचा भरभरून आनंद कसा घ्यावा याचा वस्तुपाठ त्यांच्या जीवनशैलीतून मिळतो. म्हणूनच वारली कलाकार खरे आनंदयात्री आहेत. प्रत्येक क्षण आनंदात जगण्याचे तंत्र वारली चित्रे अबोलपणे शिकवतात. त्यांच्या चित्रातील निसर्ग विविध मोहक रूपे घेऊन येतो. एकूणच समष्टीविषयी कृतज्ञता त्यातून व्यक्त होते. ही सर्जनशील चित्रसृष्टी थक्क करते.
आदिवासींचे जीवन व्यवहार निसर्गचक्रावर आधारित असतात. 'वारलं' म्हणजे जमिनीचा तुकडा. त्यावर उदरनिर्वाह करतात म्हणून त्यांना 'वारली' हे नांव मिळाले. भात हे त्यांचे प्रमुख पीक व उत्पन्नाचे साधन. भातशेतीत रमणाऱ्या वारल्यांंच्या चित्रांमध्ये देखील तोच विषय मुक्तहस्ताने रंगवलेला दिसतो. त्यासाठी रंग म्हणूनही तांदळाच्या पिठाचा वापर केला जातो. वारली चित्रशैलीचा उल्लेख 'भात-संस्कृतीची कला' म्हणूनही होतो, तो गौरवास्पदच म्हटला पाहिजे. या कलाशैलीत सुगीच्या हंगामाचे चित्रांकन अतिशय बहारदार केले जाते. सुगीचे प्रसंग, घटनांना सुरेख चित्ररुप मिळते. संत तुकाराम महाराजांनी 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे...' असा अभंग लिहिला आहे. त्याचा प्रत्यय वारली चित्रे देतात. निसर्गस्नेही वारली निसर्गाचा मर्यादित स्वरूपात आणि गरजेपुरताच उपभोग घेतात. झाडे, झुडपे, वृक्षवेली यांना वारली चित्रांमध्ये लक्षणीय स्थान आहे. ते झाडाचे चित्र मुळापासून काढतात. भूमीकडून आकाशाकडे जाणारी रेषा विकास तर वरुन खाली येणारी रेषा अधोगती, विनाश दर्शवते अशी वारल्यांंची भावना आहे. पांढऱ्या शुभ्र रंगात हिरवागार निसर्ग रंगतो. किमान साधनांचा वापर करून कमाल परिणाम साधण्याचा मूलमंत्र त्यांनी अंगी बाणवला आहे. एखादे तरी झाड असल्याशिवाय वारली चित्राला पूर्णत्व येत नाही. वारली कलेच्या केंद्रस्थानी माणूसच असतो. त्याबरोबरच ते आपल्या सभोवतालच्या पशुपक्ष्यांनाही विसरत नाहीत. वाघाला त्यांनी चक्क देव मानले असून, 'वाघ्यादेवा'ची ते मनोभावे पूजा करतात. निसर्ग साखळीतील लहानमोठे कीटक, मुंग्या,सरपटणारे प्राणी,फुलपाखरे यांनाही ते चित्रात सामावून घेतात. निसर्गात रममाण होणाऱ्या आदिवासींचे पशुपक्षी हेच सखेसोबती असल्याचे चित्रांमधून प्रतिबिंबित होते.
(तिसरा भाग पुढील अंकात.)
- संजय देवधर
( वरिष्ठ पत्रकार आणि वारली चित्रशैलीतज्ञ )
आदिवासी साहित्याचा अभ्यास करतांना हे समजलं की वारली ही कला आदिवासी यांची आहे..पण या लेखातून सविस्तर माहिती मिळते आहे. जिथे अभाव असतो तिथे जे आपल्या जवळ आहे त्याचाच वेगवेगळ्या पद्धतीने कसा उपयोग करू शकतो. हा विचार म्हणजे वारली कला आहे. जे जसं आहे तसं स्विकारलं की त्याहीपरिस्थितीत कल्पकता किती विकसीत होते. ते म्हणजे वारली कला. अशा अनेक कलांच संवर्धन आवश्यकच आहे....
उत्तर द्याहटवा