वारली चित्रशैलीच्या लेखमालेचा मागोवा
(भाग पहिला)
आदिवासी वारली चित्रशैलीचा अभ्यास, संशोधन करून मी ४ मराठी व २ इंग्रजी पुस्तके प्रकाशित केली. एखाद्या कलेचा अभ्यास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे पुढच्या काळात मला जे जे नवनवे गवसले त्याची सचित्र लेखमाला लिहावी अशी कल्पना मनात आली. ती अनेकांनी उचलून धरली. दैनिक हिंदुस्थान, साप्ताहिक न्यूज मसाला तसेच इतरही काही नियतकालिकांमध्ये गेली दोन वर्षे ही लेखमाला सुरू आहे. त्यामुळेच मला अनेक वाचकांपर्यंत पोहोचता आले.प्रत्येक लेखासोबत एक लक्षवेधी चौकट दिल्याने वाचनीयता वाढली. पुढील महिन्यात ५१ नव्या लेखांचा माझा संकल्प पूर्ण होईल. या लेखमालेतील महत्त्वाच्या लेखांचा आवाका मोठा असल्याने, तीन भागांत आढावा घेतांना आनंद होत आहे.वारली चित्रशैलीत देवचौक, तारपानृत्याचे चित्रण व मोर यांना महत्वाचे स्थान आहे.
या लेखमालेतील लेखांची शीर्षके जरी बघितली तरी विषय- आशयाची विविधता लक्षात येईल. निसर्गपुत्रांचा सुगम कलाविष्कार, चैतन्यशील वारली चित्रे, धवलेरीची कला,
स्त्रीशक्तीची अभिव्यक्ती, सामूहिक वृत्तीची कलाकृती, वारली कलेचा शोध घेणारा भास्कर कुलकर्णी हा कलंदर अवलिया लोकचित्रशैलींंचा तारणहार ठरला.झोपडीतली ही कला जगाच्या कॅनव्हासवर पोहोचविण्यासाठी पद्मश्री जिव्या सोमा मशे यांचे मोठे योगदान आहे. त्यांच्यावर आदिम कलेचे पितामह आणि ' जिवा 'भावाचे मनोगत असे दोन लेख लिहून त्यांच्या स्मृतींना मानवंदना दिली. भिंत नव्हे कॅनव्हास, देवचौक व लगनचौक हे वारली कलेचे मूळ प्रेरणास्रोत आहेत. देखण्या तारपानृत्याचे बहारदार चित्रण, मयूरा रे आणि नाच रे मोरा या लेखात आदिवासी मोर हे समृद्धीचे प्रतिक कसे मानतात हे सांगितलेय. याशिवाय साधीसोपी जीवनशैली, पर्यावरणपूरक - निसर्गस्नेही कलासंस्कृती, चैतन्यशील कला, उत्स्फूर्त कलाविष्कार, सांकेतिक चित्रलिपी, रेषांमधील आनंददायी मुक्तछंद, आनंदयात्री, वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पशुपक्षी आमचे सखेसोबती, सुखसमृद्धीची भित्तिचित्रे, भातसंस्कृतीची कला, चित्रांकन सुगीच्या हंगामाचे, सृजनोत्सवी चित्रसृष्टी, डोंगराएवढी श्रद्धा, अग्निपूजन परंपरेची चित्रमय अभिव्यक्ती, निसर्गाचं गाणं - लोकसंस्कृतीचं लेणं, शाश्वत लोककलेचा व्यापक परीघ, आदिवासी अस्मितेचे कलात्मक प्रतीक, चित्रविषय खुलविणारी किनार, वारली कलेचा मोहक संवाद, जगायला जातो, समकालीन जनजागृती व लोकप्रबोधन, सचित्र पर्जन्यसूक्त, रंग माझा वेगळा, आदिवासी संशोधन व संग्रहालय, वारली चित्रांना आधुनिकतेचा स्पर्श, झोपडीतली कला जगाच्या कॅनव्हासवर, वारली चित्रसहल, अकरा शतकांचे प्रतिनिधित्व, वारली चित्रवती व्हावी 'पद्म'वती, वारली कलेवर विश्वविक्रमी मोहोर, ट्रेंडिंग कलेला ब्रँडिंगची गरज, मी वारली चित्रशैली बोलतेय, वारली चित्रशैली - काल, आज, उद्या असे विविध विषय हाताळले. कॅलिडोस्कोपमध्ये प्रत्येकवेळी जशी वेगवेगळी डिझाईन्स दिसतात तसे वारली चित्रातील विविध पैलूंनी मला मोहित केले. मला जे गवसले, सापडले ते माझ्या शब्दात मांडण्याचा प्रयत्न केला. महिन्यातून सरासरी २ लेख प्रकाशित झाल्याने ५१ लेखांची संकल्पपूर्ती करण्यास २ वर्षे लागत आहेत.
वारली कला हा निसर्गपुत्रांचा कलाविष्कार आहे. चित्र,नृत्य आणि संगीत या कला आदिवासी लोकजीवनाचे अविभाज्य अंग आहेत. निसर्गातून घेऊन निसर्गालाच अर्पण करणे हे या निसर्गपुत्रांचे जीवनसूत्र आहे. त्यांचे माध्यम व आविष्कारही निसर्गच असतो. परिसराशी सुसंवाद साधत पर्यावरण रक्षणाचा संदेश ते चित्रांद्वारे नकळतपणे देतात. चैतन्यशील वारली चित्रशैली या लेखात आदिवासी कलांसाठी स्वतंत्र विद्यापीठ उभे राहाण्याची आवश्यकता मी मांडली. दहाव्या शतकापासून अस्तित्वात असणारी आदिवासी वारली चित्रशैली जगभरात लोकप्रिय ठरली आहे. जगाच्या नकाशावर विराजमान झाली आहे. त्याचे श्रेय पद्मश्री जिव्या सोमा मशे यांना जाते.त्यांनी या कलेत प्राविण्य मिळवून आपला ठसा उमटवला. मुळात वारली चित्रे परंपरेनुसार सुवासिनी चितारीत. मशे यांनी पुरुष कलाकारांसाठी वाट मोकळी करून देत अक्षरशः क्रांती घडवून आणली. हल्ली वारली महिलांपेक्षा पुरुषच मोठ्या प्रमाणावर वारली चित्रे रंगविताना दिसतात असे माझे निरीक्षणही मी नोंदविले आहे. वारली जमातीत स्त्री पुरोहिता म्हणजे धवलेरी. ती सुवासिनी किंवा विधवाही असू शकते. तिला लग्नकार्यात महत्त्वाचे स्थान असून लग्न लावण्याचा तिलाच अधिकार असतो. यावरून वारली जमातीचे विचार किती पुरोगामी आहेत हे दिसून येते.
ही ११०० वर्षांची परंपरा जोपासण्यात धवलेरींंचा मोठा वाटा असल्याने वारली कलेला धवलेरीची कला म्हणूनही ओळखले जाते. तसेच ही कला स्त्रीशक्तीची अभिव्यक्ती आहे. स्त्रीसुलभ भावना त्यातून प्रकट होतात. वारली कलेत स्वयंशिस्ती बरोबरच सामूहिक वृत्तीही असल्याने ते एकप्रकारे समूहचित्रण असते. भास्कर कुलकर्णी या कलंदर अवलियाने सत्तरच्या दशकात वारली कला प्रथम प्रकाशात आणली. तो लोकचित्रशैलींंचा तारणहार ठरला. बिहारमधली मधुबनी आणि महाराष्ट्रातील वारली कला त्यांच्याच अथक प्रयत्नांनी सर्वदूर पोहोचली व लोकप्रिय झाली.त्यांच्या कार्याचा आढावा मी दोन लेखांमध्ये घेतला.
झोपडीच्या चार भिंतीतली कला जगाच्या कॅनव्हासवर पोहोचविण्यात मशे परिवाराचे मोठे योगदान आहे. त्यांनी या आदिम कलेला व वारली जमातीला प्रतिष्ठा मिळवून दिली. हे लक्षात घेऊन मशे यांच्या नावाने आदिवासी कला संचालनालय निर्माण करावे, असेही मी शासनाला सुचवले आहे. साहित्य नाही म्हणून कोणतीच लोककला अडून राहात नाही. सहज उपलब्ध साहित्यातून त्यांची बहारदार कलानिर्मिती सुरूच असते. आदिवासी वारली जमातीने आपल्या झोपडीच्या भिंतीचा कॅनव्हास केला. तांदळाच्या पिठाचा रंग व बांबूच्या काडीचा ब्रश त्यांना पुरेसा असतो. काही ठिपके, रेषा तसेच त्रिकोण, वर्तुळ व चौकोन या मूलभूत आकारांचा वापर करून साधीसोपी वारली चित्रे आकार घेतात. भिंत नव्हे कॅनव्हास या लेखात आदिवासी पाड्यांवर कलात्मक झोपड्यांची उभारणी कशी होते, त्यात विविधता कशी असते व चित्रांमध्ये त्यांचे सुरेख दर्शन कसे घडते, याचे वर्णन केले आहे. विवाह सोहळ्यात वधूवरांच्या झोपडीतील भिंतीवर देवचौक व लगनचौक लिहिला जातो. धवलेरी, भगत व सुवासिनींना तो लिहिण्याचा मान असतो. हा चौक वारली चित्रशैलीचा मूळ प्रेरणास्त्रोत मानला जातो. चित्र, नृत्य, गाणी, संगीत यांनी वारली जमातीचे जीवन
कलासमृद्ध केले आहे. वारली चित्रकला जगभरात लोकप्रिय होण्यामागे देखण्या तारपा नृत्याचा व त्याच्या केल्या जाणाऱ्या चित्रणाचा मोठा वाटा आहे. वर्तुळाकारात होणाऱ्या तारपा नृत्याचा प्रारंभ दहा- वीस स्त्री-पुरुष करतात. बघता बघता त्यात अनेकजण सामील होतात. रात्ररात्र सुरु राहाणाऱ्या नृत्याचे प्रमाण कालपरत्वे कमी झाले असले तरी महत्त्व संपलेले नाही. तारपा नृत्य अधिक देखणे की त्याचे चित्रण हा प्रश्न रसिकांना पडतो. मोराला आदिवासी वारली संस्कृतीत समृद्धीचे प्रतीक मानतात. जर शेतात, परिसरात मोर नाचला तर भरपूर पाऊस पडून जोमदार पीक येईल,सुखसमृद्धी मिळून भरभराट होईल अशी त्यांची श्रद्धा असते. म्हणून मोराला वारली चित्रशैलीत मानाचे स्थान लाभलेले दिसते.(दुसरा भाग पुढील अंकात)
- संजय देवधर
( वरिष्ठ पत्रकार, वारली चित्रशैलीतज्ञ )
खूप सुंदर
उत्तर द्याहटवा