माझी साप्ताहिकीः विचारांची पर्वणी! प्रभाकर येरोळकर यांचा मरणोत्तर लेखसंग्रह " साप्ताहिकी " कुटुंबिय व चपराक प्रकाशनाकडून १४ आॅगस्ट ला प्रकाशित होत आहे ! तुम्हारे याद के, जख्म भरने लगते है, आप को पढ़ने के बहाने तुम्हे, याद करने लगते है। नागेश शेवाळकर यांनी लिहीलेले वाचनीय दोन शब्द !!


माझी साप्ताहिकीः विचारांची पर्वणी!

        'सर्वोत्कृष्ट नि सर्वोत्तम' हे कुण्या संस्थेचे ब्रीदवाक्य नव्हे तसेच तो कुणाचा प्रण नाही तर तो ध्यास आहे, पुण्यातील एका नामांकित साहित्य प्रकाशन संस्थेचा! घनश्याम पाटील ह्या तरुणाने 'किशोर' वयात 'चपराक' प्रकाशनाची निर्मिती केली. निर्मितीपासूनच पाटील एक गोष्ट सातत्याने करीत आहेत ती म्हणजे 'सर्वोत्कृष्ट नि सर्वोत्तम' साहित्य निर्मितीची! लेखक मग तो जुना असो, प्रतिष्ठित असो की नव्याने लिहिणारा असो. ज्या लेखकाजवळ उत्कृष्ट साहित्य आहे हे समजायला अवकाश घनश्याम पाटील हे त्या लेखकाचा शोध घेतात आणि ते साहित्य वाचक दरबारी अत्यंत आकर्षक स्वरुपात सादर करतात.
       बाह्यरंग हे कोणत्याही पुस्तकाचे महत्त्वाचे अंग असते. पुस्तक हातात घेतल्यानंतर मुखपृष्ठ असेल, कागद असेल, अक्षरांचा आकार असेल, साहित्याची मांडणी असेल ह्या बाबी वाचकांना आकृष्ट करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावतात. चपराक प्रकाशन, पुणे यांची पुस्तके पाहिली म्हणजे बाह्यरंग किती महत्त्वपूर्ण ठरतात याची कल्पना येते. या कोणत्याही बाबतीत तडजोड करायची नाही ही महत्त्वाकांक्षा उराशी बाळगून चपराक प्रकाशनाची यशस्वी, लक्षवेधी घोडदौड सुरु आहे. कोणत्याही पुस्तकाचा अंतरंग म्हणजे त्यात छापलेले साहित्य! बाह्यरंगावर जशी प्रकाशकाची छाप असते तसाच अंतरंग अर्थात साहित्य हे लेखकाचे सर्वस्व असते. जिथे अंतरंग आणि बाह्यरंग यांची नाळ जुळते ती साहित्यकृती अत्यंत आकर्षक, वाचनीय अशी होते. याच मालिकेतील एक अत्यंत आकर्षक दस्तऐवज म्हणजे व्यवसायाने वकील असलेले आणि आपल्या लेखणीने महाराष्ट्रात सर्वदूर ख्यातीप्राप्त असलेले लातूर येथील वकील प्रभाकर येरोळकर यांचा विचारांची पर्वणी असलेला, एक अवीट शिदोरी असलेला लेखसंग्रह म्हणजे, 'माझी साप्ताहिकी'!
       विविध विषयांवर चार पुस्तके आणि हजारांहून अधिक लेख नावावर असलेले प्रभाकर येरोळकर यांचा हा संग्रह म्हणजे त्यांचा अभ्यास, त्यांची स्मरणशक्ती आणि योग्य ठिकाणी ते सारे व्यक्त करण्याची हातोटी वाखाणण्याजोगी आहे. या संग्रहाचे एक वैशिष्ट्य म्हणजे येरोळकर यांची लेखणी केवळ राजकीय लेख प्रसवत नाही तर या लेखणीला वैविध्यपूर्ण विषयांची आवड आहे. अभ्यासपूर्ण अशा विवेचनाला रसाळता, मधाळता लेवून त्यांच्या लेखनीची प्रभा सर्वदूर प्रकाशमान होत गेली आहे. 'जो जे वांछिल तो ते लाहो...' याप्रमाणे विविध विषयांवर, अनेकविध व्यक्तींवर लिहिलेले लेख आपल्याला वाचायला मिळतात. महाभारत असेल, राममंदिर असेल, राजकारण असेल, साहित्य असेल, आर्थिक बाब असेल, कायदा असेल, लेखक असतील, विनोद असेल, भ्रष्टाचार असेल किंवा निवडणूक असेल लेखक म्हणून येरोळकरांना कोणताही विषय अस्पृश्य नाही कारण लेखकाच्या लेखणीला 'फायर' या चित्रपटासह बँडिट क्वीन, कामसूत्र आणि गजगामिनी, बॉबी, मेरा नाम जोकर, आवारा असे विषय आणि त्यासंदर्भातील नोंदी लेखकास वर्ज्य नाहीत म्हणूनच लेखकाची लेखणी सातत्याने कोणत्या ना कोणत्या विषयाला प्रसवत असे. असे असले तरीही कोणताही विषय अवाचनीय किंवा अप्रस्तुत वाटत नाही. 'दिसामाजी जे काही लिहीन ते अभ्यासपूर्ण असेल' अशा ध्येयाने लेखकाने लिहिले असल्याचे लक्षात येते.
        वैयक्तिक कुणावर लेख लिहायचा म्हटले की, लेखणीला एक प्रकारचे झरे फुटतात, नायकाचे गुण-दोष करताना लेखणी वाहवत जाण्याची शक्यता असते कारण एखाद्या व्यक्तीच्या बाबतीत पूर्वग्रह लेखणीला अंकित करण्याचा प्रयत्न करतात परंतु प्रभाकर येरोळकर यांची लेखणी हा संयम कटाक्षाने, कठोरपणे पाळते. कुणाचाही विरोधासाठी विरोध नाही, कुणाची निंदानालस्ती नाही, कुणावरही व्यर्थ टीका केलेली आढळून येत नाही. साध्या, सरळ, रसाळ भाषेत केलेले वर्णन वाचकांना भुरळ पाडते. त्यांच्या लेखाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांचे वाचन अफाट तर आहेच परंतु केलेल्या वाचनावर चिंतन नि मनन करुनच लेखणी हातात घेतली असल्याचे जाणवते. त्यांनी अनेक महनीय व्यक्तींचे विचार सोदाहरण अधोरेखित केले आहेत. पी. सी. अलेक्झांडर, आचार्य अत्रे, बाबूराव अर्नाळकर, कर्नल रंजित, जेम्स बाँड, खुशवंतसिंह, शेक्सपिअर, ना.सी.फडके, मार्क ट्वेन, कुसुमाग्रज, बाळासाहेब ठाकरे, वसंत बापट, मिरासदार, नाना पालखीवाला, पु. ल. देशपांडे, सुनीता देशपांडे, व्यंकटेश माडगूळकर, ज्ञानेश्वर नाडकर्णी, य.दि.फडके, बर्ट्रांड रसेल, डॉ. कलाम, मनोहर जोशी, अरुण साधू, बिल क्लिंटन, हिलरी क्लिंटन, बराक ओबामा, शाहू मोडक प्रमोद नवलकर, लता मंगेशकर, आशा भोसले, तसलिमा इत्यादी अनेक ज्ञानी, विचारवंत यांच्या विचारांचा, त्यांच्या संदर्भात घडलेले मजेदार अनुभव  किंवा त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांचा संदर्भ लेखकाने चपखलपणे दिला आहे जो अप्रस्तुत मुळीच वाटत नाही तर लेखकाच्या सखोल ज्ञानाची अनुभूती देतो.
         प्रभाकर येरोळकर यांचे लेखन प्रचंड आहे. वर्तमानपत्र असतील, मासिके असतील, दिवाळी अंक असतील सर्वत्र त्यांचे लेखन प्रकाशित झाले असून ते वाचकप्रिय ठरले आहे परंतु ते फार मोठ्या पुरस्कारापासून वंचित राहिले असल्याची जाणीव त्यांच्या वाचकांना अस्वस्थ करते. आपल्याकडे लेखकाला दोन अनुभव हमखास येतात. त्यापैकी पहिला म्हणजे एखाद्या लेखकाचे पुस्तक प्रकाशित होते आहे किंवा झाले आहे असे समजताच 'मला पुस्तक हवे आहे, पाठवून दे.' असे निरोप येतात पण फार कमी लोक पुस्तकाची किंमत विचारुन ते विकत घेतात. हे शल्य लेखक येरोळकर यांनाही होते म्हणून ते एकेठिकाणी म्हणतात, 'माझे नवे पुस्तक आले की, मी ते सर्वांना सक्तीने विकतच देणार! पैसा कमावणे हा त्यामागचा विचार नसून यांना चांगलं साहित्य विकत घेऊन वाचायची सवय लागली पाहिजे. भलेही त्यांनी मला बघून रस्ता बदलला तरी चालेल पण हे प्रयोग करायलाच हवेत.' वाचन संस्कृती वाढायला पाहिजे आणि त्यासाठी पुस्तक विकत घेतली पाहिजेत ह्यासाठी एक चांगला मार्ग लेखकाने सुचविला आहे. लेखकाला येणारा दुसरा अनुभव म्हणजे पुरस्कार स्वरुप! लेखकाला एखादा पुरस्कार मिळाला हे समजले की, त्या पुरस्काराचे स्वरुप हमखास विचारले जाते त्यातही रक्कम किती आहे असा प्रश्न ठरलेलाच. परंतु काही शाब्दिक पुरस्कारही लाखमोलाचे असतात. याबाबतीत लेखक प्रभाकर येरोळकर हे प्रचंड श्रीमंत होते कारण त्यांच्या साहित्याची वाहवा करणारे, शाबासकी देणारे अनेक दिग्गज आहेत. नामोल्लेख करायचा तर लातूर येथून प्रकाशित होणाऱ्या दै. एकमत या वर्तमानपत्रात लेखक नियमितपणे स्तंभलेखन करीत होते. एकदा तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख म्हणाले, 'मी स्वतः तुमच्या लेखनाचा नियमित वाचक आहे.' केवढी मोठी ही कौतुकाची थाप आहे.
      पी. व्ही.नरसिंहराव यांनी लिहिलेल्या 'द इनसायडर' ह्या आत्मचरित्रावर येरोळकर यांनी एक लेख लिहिला होता. तो लेख वाचून स्वतः नरसिंहराव यांनी पत्र लिहून लेखकाचे आभार मानले होते यापेक्षा अन्य कोणता मोठा पुरस्कार असू शकेल.
      दैनिक मराठवाडा एकेकाळी मराठवाड्यातील एक अग्रगण्य असे वर्तमानपत्र! श्री अनंत भालेराव यांच्यासारखा ज्ञानी, तपस्वी, अभ्यासू संपादक लाभलेल्या वर्तमानपत्रासाठी लेखक येरोळकर यांनी 'आर्थिक विषमता आणि न्यायदान' हा लेख पाठवून दिला. भालेराव यांनी तो लेख संपादकीय पानावर छापताना वरच्या बाजूला छापला आणि स्वतःचा लेख त्याखाली छापला. यापेक्षा वेगळी अशी दाद म्हणा शाबासकी अन्य कोणती असूच शकत नाही.
       प्रभाकर येरोळकर हे व्यवसायाने वकील होते. साहजिकच जनसामान्यांशी आणि त्यांच्या प्रश्नांशी त्यांचा अत्यंत जवळून संबंध येत असे. हे प्रश्न त्यांची लेखणी तळमळीने मांडत असे. न्यायालयाच्या संदर्भात येरोळकर यांचे अभ्यासपूर्ण असे काही लेख प्रकाशित झाले आहेत. न्यायक्षेत्रातील घडामोडींवर त्यांनी प्रकाश टाकला आहे. एकेठिकाणी ते लिहितात,
'न्यायालयाचे पावित्र्य टिकवायचे असेल तर एकूणच आपल्या जाणीवाच बदलल्या पाहिजे. मूल्यांची घसरण (राजकीय, सामाजिक, आर्थिक, न्यायविषयक, सांस्कृतिक सगळ्याच) थांबविली पाहिजेत.
      आजच्या लेखकांना मार्गदर्शन करताना लेखक येरोळकर थेट ना. सी. फडके यांचे विचार उद्धृत करतात, 'मराठी साहित्याला मोठी उज्ज्वल परंपरा आहे. अनेक तत्त्वचिंतकांनी, लेखकांनी, कवींनी, नाटककारांनी मराठी साहित्य समृद्ध करण्याचं कार्य केलेलं आहे. त्या परंपरेचा वारसा घेऊनच साहित्यनिर्मितीचे कार्य मी केलेलं आहे. माझ्या आधी होऊन गेलेल्या थोर थोर सारस्वतांच्या खांद्यावर उभा असल्याने कदाचित अंशतः मीही उंच दिसत असेल.' कदाचित येरोळकरही यांच्या मनात अशीच भावना असावी.
      येरोळकर यांनी इतरांचे जे विविध उतारे, विचार लेखांमध्ये घेतले आहेत त्यावरुन त्यांच्या वैविध्यपूर्ण वाचनाची कल्पना वाचकांना येऊ शकते परंतु त्याचबरोबरीने ते विचारही वाचनीय असल्यामुळे द.मा.मिरासदार यांनी एका प्रश्नाला दिलेले उत्तर प्रभाकररावांनी लेखात सहर्ष घेतले आहे ते मांडण्याचा मोह आवरत नाही...
मिरासदार म्हणतात,'विनोद म्हणजे दुसरं-तिसरं काही नसून विसंगती आणि अपेक्षाभंग यातून निर्माण होणारे हास्य, अशी तर्कशुद्ध व्याख्या सांगत असतानाच द.मा. असेही म्हणाले की विनोदाचा आणि हसण्याचा संबंध असतोच असे नाही.'
        एकंदरीत प्रभाकर येरोळकर यांचा 'माझी साप्ताहिकी' हा लेखसंग्रह छापून चपराक प्रकाशनाने वाचकांना विचारांची पर्वणी, शिदोरी दिली आहे. मनाला चटका लावणारी गोष्ट म्हणजे लेखक प्रभाकर येरोळकर हे हे जग सोडून गेल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या विचारांची शिदोरी वाचकांपर्यंत पोहोचविण्याचा जो अतुलनीय प्रयत्न केला आहे आणि घनश्याम पाटील यांच्यासारख्या जिज्ञासू प्रकाशनाने त्या प्रयत्नांना मूर्त स्वरूप दिले ते कौतुकास्पद आहे, अनुकरणीय आहे. यानिमित्ताने येरोळकर यांच्यासारख्या अक्षरपूजकाला मानाचा मुजरा! त्यांच्या एका लेखातील दोन ओळीत थोडासा बदल करुन...
तुम्हारे याद के, जख्म भरने लगते है,
आप को पढ़ने के बहाने तुम्हे, याद करने लगते है।
                                 ००००
माझी साप्ताहिकी : लेखसंग्रह
लेखक :   प्रभाकर येरोळकर
प्रकाशक :  घनश्याम पाटील,
             चपराक प्रकाशक, पुणे.
मुखपृष्ठ :    संतोष घोंगडे.
पृष्ठसंख्या :     २२४
किंमत :          ३००₹
आस्वादक :  नागेश सू.शेवाळकर, पुणे.

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

गृह स्वप्नपूर्ती चा योग म्हणजे नासिक शहराचा द्वैवार्षिक उत्सव शेल्टर २०२४ चे उद्या उद्घाटन !