मर्मज्ञ चित्रकार ; उपक्रमशील पत्रकार संजयजी देवधर ! मुक्त पत्रकार पराग वाड यांनी संजयजी यांच्या वाढदिवसानिमित्त आपल्या लेखनीतून शब्दबद्ध केलेल्या शुभेच्छा !! न्यूज मसाला परीवाराकडून संजयजी यांना ६३ व्या वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा !! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
अतिशय साक्षेपी दृष्टी लाभलेले प्रतिभावंत चित्रकार, कलासमीक्षक, वारली चित्रशैलीचे अभ्यासक, दैनिकात दीर्घकाळ वार्ताहर तसंच उपसंपादक आणि सेवानिवृत्तीनंतर आता मुक्त पत्रकारिता; एवढे सगळे पैलू एकाच व्यक्तीत एकवटलेले असणं तसं विरळाच ! कार्यालयीन सहकारी आणि मित्र या नात्यानं आमचा घनिष्ठ ऋणानुबंध जुळला. असे माझे हे ज्येष्ठ स्नेही संजय देवधर आज दि.१३ जुलै रोजी ६३व्या वर्षात पदार्पण करीत आहेत.या औचित्यानं मला भावलेल्या त्यांच्या चतुरस्र व्यक्तिमत्त्वाचं हे शब्दचित्र...
एका मध्यमवर्गीय, मात्र विद्याव्रती अशा परिवाराचा वारसा संजय देवधर यांना लाभला. त्यांचे पणजोबा प्राणाचार्य कृष्णशास्त्री देवधर हे प्रख्यात वैद्य होते. त्यांची कीर्ती सर्वदूर पसरलेली होती. नाशिकच्या रविवार पेठेतील त्यांचा वाडा असलेल्या गल्लीला तत्कालीन नगरपालिकेने देवधर गल्ली असे नाव सन्मानपूर्वक दिले होते, आजही ही गल्ली याच नावाने ओळखली जाते. अशा प्रसिद्ध घराण्यात जन्मलेल्या संजय यांना चित्रकलेची उपजत आवड होती. नामांकित पेठे विद्यालयातून माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यावर, चित्रकलेचे शास्त्रशुद्ध शिक्षण घेण्याचे त्यांनी ठरवले. मग नाशिक कलानिकेतन या संस्थेत एक वर्षाचा फाउंडेशन कोर्स पूर्ण केला. नंतर उपयोजित कलेचे उच्चशिक्षण घेण्यासाठी मुंबईतील बांद्रा स्कूल ऑफ आर्ट, तसेच जे.जे. स्कूल ऑफ आर्टमध्ये प्रवेश घेतला. विशेष गुणवत्तेसह डिप्लोमा पूर्ण केल्यानंतर मुंबईत डायमेंशन्स आणि आकार जाहिरात एजन्सी या ठिकाणी त्यांनी नोकरीचा अनुभव घेतला. नाशिकला परतल्यावर दैनिक गांंवकरीमध्ये ते रुजू झाले. तेथील कलाविभागात विविध लेखांची- कथांची शीर्षके, आशयघन चित्रांकन आणि मांडणी यात त्यांनी आपला वेगळा ठसा उमटवला. १९८४ पासून गांंवकरी प्रकाशन समूहाच्या साप्ताहिक गांंवकरी, रसरंग, अमृत या नियतकालिकांची मुखपृष्ठे व पानांची सजावट ते कल्पकतेने करीत असत. दैनिक गांवकरीच्या आस्वाद, मधुरा व इतर साप्ताहिक पुरवण्या अधिक आकर्षक, कलात्मक करण्याचा प्रयत्न त्यांनी सातत्याने केला. संजय यांच्या समवेत काम करण्याची संधी काही वर्षे मला मिळाली. त्यातून मैत्री झाली व त्यांच्या कलाप्रेमी व्यक्तिमत्त्वाचा जवळून परिचयही झाला.
वृत्तपत्राचे काम सांभाळून ते लोकहितवादी मंडळ, कलाक्षेत्र दृश्यकला आस्वाद केंद्र, नाशिक कलानिकेतन व अन्य संस्थांवर पदाधिकारी म्हणूनही काम बघत. तेथे कलाविषयक विविध उपक्रम राबविण्यात त्यांचा पुढाकार होता. एकाच वेळी 'चित्रप्रपंच' आणि 'पत्रप्रपंच' असं दुहेरी व्यवधान ते हसतमुखाने जपत. ज्येष्ठ चित्रकार शिवाजी तुपे, पंडित सोनवणी, आनंद सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय चित्रकार संमेलन, राज्यस्तरीय चित्रप्रदर्शन व कलामेळावे घेण्यात आले. ते खूप गाजले. अगदी विद्यार्थ्यांपासून ते व्यावसायिक कलाकारांपर्यंत संबंधित सर्वांना त्यात सहभागाची संधी मिळाली. अशा आगळ्यावेगळ्या उपक्रमांबरोबरच ते कलासमीक्षेतही रमले. त्यांनी अनेक कलाकारांना आपल्या लेखणीने यथोचित प्रसिद्धी देऊन प्रकाशझोतात आणले. केवळ चित्रकलाच नव्हे तर शिल्पकला, संगीत, नृत्य, गायन, नाट्य अशा विविध ललितकलांचा परामर्श ते घेत राहिले. कलाविषयक प्रात्यक्षिके, व्याख्याने देत असतानाच स्पर्धा-परीक्षक म्हणूनही सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचा सतत सहभाग राहिला आहे. सर्वसामान्य वाचकांना, रसिकांना विविध कलांचा रसाळ परिचय करून देण्याचे व्रत त्यांनी सातत्याने अंगिकारले. पुढे दैनिकात वार्ताहर, उपसंपादक म्हणूनही त्यांची कारकीर्द बहरली.
२००५ साली लोकहितवादी मंडळातर्फे वारली चित्रकलेची एक कार्यशाळा संजय देवधर यांनी आयोजित केली. वारली कलेने मोहित होऊन, यथावकाश या कलेचा अधिक अभ्यास करून संशोधन केले. त्यासाठी ते मोखाडा, जव्हार, तलासरी, डहाणू , सिल्वासा या भागातील अनेक पाड्यांवर अनेकवेळा गेले. वारली चित्रशैलीचे जाणकार डॉ. गोविंद गारे यांच्या संपर्कात आल्यानंतर, त्यांच्या माध्यमातून या आदिम कलेचे पितामह पद्मश्री जिव्या सोमा मशे यांच्याशी त्यांची भेट झाली. देवधरांनी प्रत्यक्ष मशे यांच्याकडूनच ११०० वर्षांची वारली कलापरंपरा, आदिवासी संस्कृती, त्यांची निसर्गावर आधारित असलेली साधीसोपी जीवनशैली याविषयी सविस्तरपणे जाणून घेतले. त्यामुळे वारली चित्रांमधले बारकावे, तपशील हे सारे त्यांना शिकता आले. या प्रवासात अनेक आदिवासी कलाकारांकडूनही कलेचे विविध पैलू उलगडत गेले. नंतर ही कला सर्वांपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांनी कार्यशाळा सुरु केल्या. पुढे नाशिकसह राज्यात व राज्याबाहेरही अनेक ठिकाणी त्यांनी वारली चित्रांच्या कार्यशाळा घेतल्या. अलिकडे 'कोविड'मुळे त्यात खंड पडला असला, तरी ते विद्यार्थ्यांना 'ऑनलाईन' तंत्राने नियमित मार्गदर्शन करतात. हे समृद्ध कलासंचित रसिकांपर्यंत पोहचविण्यासाठी देवधर यांनी २००८ साली प्रारंभी 'वारली चित्रसृष्टी' हे पुस्तक लिहून प्रकाशित केले. पुढील काही वर्षांत या पुस्तकाच्या ४ सचित्र आवृत्त्या कल्पक प्रकाशनाने रसिकांपर्यंत पोहोचवल्या. 'वारली आर्टवर्ल्ड' या त्यांच्या इंग्रजी पुस्तकाच्याही दोन आवृत्त्या निघाल्या; त्या परदेशातही पोहोचल्या. त्यांना उत्तम प्रतिसाद मिळतो आहे.अनेक परदेशी पर्यटकांनी नाशिकला येऊन देवधर यांच्या मार्गदर्शनाखाली वारली कलेचे धडे गिरवले आहेत.
दरम्यान अनेकांच्या मागणीवरुन देवधरांंनी वारली चित्रसहल हा अनोखा उपक्रम सुरु केला. एक दिवसाच्या या सहलीत जव्हार, रामखिंड, पाथर्डी येथील पाड्यांवर आदिवासींची जीवनशैली अनुभवता येते, वारली चित्रांची प्रात्यक्षिके बघता येतात. डहाणूजवळच्या कलमीपाडा येथील पद्मश्री जिव्या सोमा मशे यांचे घर बघता येते. तसेच गंजाड येथे मशे परिवाराने तयार केलेल्या वारली चित्रसंग्रहालयाला भेट दिल्यावर, या आदिम कलेविषयी अधिक सखोल माहितीही मिळते. देवधर यांनी आपले गुरु मशे यांना नाशिकला आणले होते. वैराज कलादालनात त्यांचे चित्रप्रदर्शन व प्रात्यक्षिकही आयोजित केले होते. त्याला नाशिककरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला होता. प्रख्यात वास्तुविशारद अरुण काबरे, सागर काबरे यांचे यासाठी सहकार्य लाभले होते. अनेक वारली युवकांना देवधर नेहमीच विविध संधी व कामे मिळवून देतात. 'मविप्र' समाजाच्या इगतपुरी येथील के.पी.जी. महाविद्यालयात झालेल्या राज्यस्तरीय आदिवासी साहित्य अधिवेशनात त्यांनी 'वारली चित्रकला- काल, आज व उद्या' हा शोधनिबंध सादर केला होता. कलाक्षेत्रातील त्यांचे हे विपुल कार्य आणि सक्रियता इतरांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल. वाढदिवसाच्या निमित्ताने, त्यांच्या भविष्यातील कला-जीवनाच्या प्रवासाला अनेक शुभेच्छा.
- पराग वाड
(लेखक मुक्त पत्रकार आहेत.)
***********************************
विश्वविक्रम आणि विविध पुरस्कार
तीन वर्षांपूर्वी संजय देवधर यांनी वारली चित्रकलेच्या संदर्भात दोन विश्वविक्रम प्रस्थापित केले. ११०० पेक्षा अधिक व्यक्तींना 'ऑन द स्पॉट' वारली चित्रस्पर्धेत सहभागी करून घेण्यात आले. आर.पी. विद्यालयात झालेल्या या उपक्रमात ५ ते ७५ वयोगटांसाठी आठ गटांमध्ये स्पर्धा झाली. विजेत्यांना ५० हजार रुपयांची एकूण ८० पारितोषिके वितरित करण्यात आली. यावेळी सर्वाधिक सहभागाबद्दल 'जिनियस वर्ल्ड रेकॉर्ड' तर चित्रांतून सामाजिक संदेश दिल्यामुळे 'वंडरबुक वर्ल्ड रेकॉर्ड' नोंदवले गेले. वारली कलेतील विविधांगी योगदानाची दखल घेऊन, महाराष्ट्र सरकारतर्फे सन २०१९ मध्ये देवधर यांना राज्यस्तरीय 'आदिवासी सेवक पुरस्कारा'ने सन्मानित करण्यात आले. नागपूर येथे झालेल्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, राज्याच्या आदिवासी विकास विभागाचे मंत्री प्रा.अशोक उईके यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय पत्रकारितेच्या प्रदीर्घ वाटचालीमध्ये अ.व.पठाण पुरस्कार, पत्रकार भूषण, नाशिक भूषण, समाज भूषण यांसह उत्कृष्ट कलासमीक्षक म्हणून विशेष गौरव असे अनेक मानसन्मान देवधर यांना मिळाले आहेत. ते सातत्याने वारली कलेविषयी सचित्र व्याख्यानेही देतात. विशेष म्हणजे आपल्याच कलेचा विसर पडलेल्या पेठ तालुक्यातील काही वारली युवकांना त्यांचीच कला संजय देवधर यांनी शिकवली व तिचे महत्त्व पटवून दिले ! आजवरच्या यशस्वी वाटचालीचे श्रेय ते आपले आईवडील,
पत्नी सौ. सुचित्रा यांना ; तसेच त्यांच्यावर ज्यांनी कलेचे, पत्रकारितेचे संस्कार केले अशा सर्वांना देतात. त्यांची मुलगी सुप्रिया फ्रावशी इंटरनॅशनल स्कूलमध्ये फ्रेंच व इंग्रजी विभागप्रमुख आहे. मुलगा सुयश अमेरिकेत फार्मसी विभागात एम.एस. पूर्ण करून आता पीएच.डी. करीत आहेत.
***********************************
'समग्र वारली चित्रशैली' ग्रंथाचा संकल्प
जानेवारी २०१९ पासून संजय देवधर वारली चित्रशैलीवर सातत्याने लेखन करीत आहेत. ५१ लेखांच्या नियोजनाद्वारे वारली कलेच्या विविध पैलूंवर प्रकाशझोत टाकण्याचे त्यांचे काम सुरु आहे. आता येत्या काही आठवड्यांमध्ये ही लेखमाला पूर्णत्वाला पोहोचेल. त्यातील निवडक लेखांचा 'समग्र वारली चित्रशैली' हा ग्रंथ प्रकाशित करण्याचा देवधर यांचा संकल्प आहे. प्रथम मराठीत आणि त्यानंतर इंग्रजी भाषेत हा ग्रंथ व्हावा, अशी त्यांची संकल्पना आहे. त्यासाठी शासनाने पुढाकार घेतला, तर हा कलात्मक दस्तऐवज अधिक व्यापक स्वरूपात सर्वत्र पोहोचेल. ही लेखनसंपदा विविध परकीय भाषांमध्येही भाषांतरित व्हावी,असे तिचे मूल्य निश्चितच आहे. कारण वारली कलेला जगभरातून मागणी आहे. ती जाणून घेण्याबद्दल प्रचंड उत्सुकताही आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा