निसर्गाशी मानवाचे असलेले अतूट नाते हेच त्यांच्या चित्रांचे अधिष्ठान व भावविश्व ! सचित्र पर्जन्यसूक्त !! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
पावसाळ्याच्या प्रारंभी जून, जुलै महिन्यात आदिवासी वारली चित्रकार पावसाची, शेतीची, पावसात नाचणाऱ्या मोरांची चित्रे काढतात. झोपडीच्या भिंतीवर अशी चित्रे काढण्यामागे चांगले पीक तयार होऊन अन्नधान्याने समृद्धी यावी, हा प्रामाणिक उद्देश असतो. निसर्गावर त्यांची अपार श्रद्धा आहे. वारली जमात पावसारंभी जणू एका तालासुरात सचित्र पर्जन्यसूक्त गात असते. ढगातून जमिनीवर येणाऱ्या पावसाच्या धारा अन् सरी, आनंदाने थुईथुई नृत्य करणारे मोर, आकाशात पसरलेले इंद्रधनुष्य, शेतातील पेरणी, शेतकऱ्यांची लगबग, गुरेढोरे, शेतीची अवजारे व निसर्गाची विविध रूपे यांचा चित्रांमध्ये समावेश असतो. केवळ पांढऱ्या रंगात रंगविलेल्या इंद्रधनुष्यात सप्तरंगांची उणीव भासत नाही हे विशेष !
आदिवासी वारली जमात शेतीसंस्कृती जपते. त्यांच्या जगभर लोकप्रिय झालेल्या चित्रसंस्कृतीलाही ११०० वर्षांची प्रदीर्घ परंपरा लाभली आहे. त्यामुळेच वारली चित्रशैलीत शेतात काम करणारे स्त्रीपुरुष, झाडेझुडपे, विहिरी, पशुपक्षी, सरपटणारे प्राणी, उंदीर, बेडूक अशा शेतीला उपयुक्त घटकांना महत्त्वाचे स्थान दिले जाते. निसर्गाशी मानवाचे असलेले अतूट नाते हेच त्यांच्या चित्रांचे अधिष्ठान व भावविश्व असते. कृषिजीवनातील अविरत श्रमांचे रंग त्यांच्या चित्रांत सहजपणे दिसून येतात. वारली जमातीच्या जगण्यातला साधेपणा निसर्ग नियमानुसारच असतो. माती व निसर्गाच्या सान्निध्यात रमलेले कृषिवल पावसाच्या चित्रांचा अविभाज्य भाग ठरतात. निसर्गावर आधारित जीवनशैली त्यांनी डोळसपणे अंगिकारली आहे. पर्यावरणाचा ऱ्हास होऊ न देता ते नैसर्गिक संसाधनांची जपणूक करतात. ते त्यांच्या इतकं अंगवळणी पडलेलं असतं, की आपण काही फार वेगळं करतोय अशी त्यांची भावनाच नसते.
' महाराष्ट्राचा व्हिन्सेंट व्हॅनगॉग ' असा ज्यांचा आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव झाला, त्या पद्मश्री जिव्या सोमा मशे यांनी आयुष्यभर शेती, निसर्ग रंगवले. कला हाच त्यांनी जीवनशैली व संस्कृतीचा मूलाधार मानला. संपूर्ण आयुष्य त्यांनी वारली कलेलाच अर्पण केले. वारली चित्रांमध्ये दृश्यात्मकता ठासून भरलेली दिसते. सृष्टीतील चराचराविषयी असलेल्या ओलाव्यामुळे वारली चित्रांना दृश्यमितीचे सजीव परिमाण प्राप्त होते. अशा सर्वार्थाने संवादी असणाऱ्या वारली चित्रांना वेगळ्या शीर्षकाची गरजच भासत नाही. सजीव सृष्टी, सभोवतालचा परिसर, माणसे, पर्यावरण यांच्याविषयी कमालीची आस्था त्यांच्या चित्रांतून व्यक्त होते. वारली कलाकार चित्रात जणुकाही जीवनमूल्येच रेखाटत असतात. म्हणूनच वारली कलेचे विश्व टवटवीत चैतन्याने बहरलेले दिसते. त्याकडे आपुलकीच्या रसिक नजरेने बघितले की आदिवासी समाजाच्या सृष्टिकेंद्री जीवनजाणिवा समजतात. जीवननिष्ठा हीच त्यांच्या कलानिर्मितीची मूळ प्रेरणा आहे, हे देखील लक्षात येते. कला ही केवळ रंग, रूप, आकार, सौंदर्य, स्वर आणि सुगंधापुरतीच मर्यादित नसते. ती अवघे अवकाश कवेत घेऊन माणसाच्या जगण्याचा अविभाज्य भाग बनते. वारली चित्रांमधून पाऊस माणसांना निसर्गाशी जोडतो व अंतर्यामी मायेचा ओलावा असलेला निखळ माणूसही समजतो.
-संजय देवधर
( वरिष्ठ पत्रकार व वारली चित्रशैली तज्ज्ञ )
**********************************
निसर्गवादी जीवनधर्म...
आदिवासी वारली जमात पाऊस हे परमेश्वराने शेतकऱ्यांना पाठवलेले वरदान आहे, असे समजते. ढगातून पडणारा पाऊस त्यांच्या चित्रांमध्ये थेट सलगपणे जमिनीवर येऊन तिला बिलगतो व मोहरून टाकतो. सारी सृष्टीच पावसाच्या आगमनासाठी, नवचैतन्याच्या स्वागताला सज्ज असलेली चित्रात जाणवते. ऋतुचक्रातील पावसाळा त्यांना अधिक प्रिय आहे कारण त्यावरच त्यांचा वर्षभरातील उदरनिर्वाह अवलंबून असतो. निसर्गसाखळीतील प्रत्येक कडी या निसर्गवादी जीवनधर्म असणाऱ्या प्रत्येकासाठी महत्त्वाची आहे. हेच वारली चित्रे सांगतात. मोराला समृद्धीचे प्रतीक मानले जात असल्याने आदिवासी पाड्यांवर सर्वत्र मोरांची चित्रे मोठ्या प्रमाणावर काढलेली दिसतात.वारली जमातीचे विविध नृत्यप्रकार लोकप्रिय आहेत. त्यात एक 'मोरनृत्य' देखील आहे. आदिवासी वारली जमातीच्या चित्र, संगीत, नृत्य या कला मूळ स्वरूपात जोपासणे हे नव्या पिढीसमोरचे आव्हान आहे. ते अनेक युवा कलाकार समर्थपणे जपताना, त्यात कलात्मक भर घालताना दिसतात.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा