वारली कलाशैलीचा मोहक ' चित्रसंवाद ' पितामह पद्मश्रींचा आशीर्वाद ' वारली चित्रशैलीचा आस्वाद सर्वांनी घ्यावा ' !! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!


न्यूज
मसाला सर्विसेस,
नासिक,  7387333801
********************************

वारली कलाशैलीचा मोहक ' चित्रसंवाद '


    चित्रकार आणि पत्रकार या नात्याने विविध ललित कलांचा परामर्श मला घेता आला. वास्तववादी चित्रणशैलीपासून आजच्या डिजिटल पेंटिंगपर्यंतची अनेक स्थित्यंतरे मी अनुभवली. मात्र चाळीस वर्षांच्या या प्रदीर्घ वाटचालीत, आदिवासी वारली चित्रशैलीने मोहून घेतले. याच कलेवर लक्ष केंद्रित करून संशोधनात्मक अभ्यास केला. वारली कलेचा व्यापक आवाका, त्यातली क्षमता सामोरी आली. प्रयत्नपूर्वक मिळवलेले हे समृद्ध संचित रसिकांपर्यंत पोहोचवावे या उद्देशाने २००८ मध्ये 'वारली चित्रसृष्टी' हे पुस्तक माझ्याच 'कल्पक प्रकाशना'तर्फे प्रकाशित केले. नंतर 'वारली आर्ट वर्ल्ड' हे इंग्रजी भाषेतील पुस्तक प्रसिद्ध झाले. शब्द आणि चित्रांचा सुरेख समन्वय त्यातून साधता आला. आज जागतिक मैत्री दिन आहे. पुस्तकांशी केलेली मैत्री कायमच समृद्ध करते.


    आतापर्यंत माझ्या 'वारली चित्रसृष्टी' या पुस्तकाच्या चार तर 'वारली आर्टवर्ल्ड'च्या दोन आवृत्त्या प्रकाशित झाल्या आहेत. प्रत्येक वेळी केवळ एकसाची पुनर्मुद्रण न करता मी नव्याने लिहीत गेलो. नव्या चित्रांसहित सर्व पुस्तकांची रचना केली. वारली कलाकारांच्या तसेच मी स्वतः रेखाटलेल्या व विद्यार्थ्यांच्या चित्रांचा समावेश या पुस्तकांमध्ये आहे. उत्कृष्ट मांडणी, सुंदर सजावट या बरोबरच आर्ट पेपर वापरल्याने पुस्तके सुबक व देखणी झाली आहेत. सुरुवातीला मी माझ्या प्रस्तावासह अनेक प्रकाशकांशी संपर्क साधला. पण फारसा उत्साहवर्धक प्रतिसाद मिळाला नाही. म्हणून मीच ही पुस्तके प्रकाशित करण्याचे व स्वतःच वितरण करायचे ठरवले. प्रत्येक आवृत्ती ११०० पुस्तकांची केली. माझे मित्र व नामवंत मुद्रक नरेंद्र शाळीग्राम यांचे मनःपूर्वक सहकार्य मिळाले. पहिल्या पुस्तकाचे मुखपृष्ठ प्रसिद्ध सुलेखनकार नंदू गवांदे यांनी केले. नंतर इंग्रजी पुस्तकाचे मुखपृष्ठ माझे मित्र ख्यातनाम चित्रकार सुनील धोपावकर यांच्या कल्पनेतून सजले. पुस्तकांची कलात्मक मांडणी दिनेश पैठणकर यांनी केली. पुस्तक निर्मितीला अनेकांचे सर्वतोपरी साहाय्य मिळाले. सर्व पुस्तकांना मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक शहरांतील पुस्तक विक्रेत्यांचा भरघोस प्रतिसाद लाभला. त्यामुळेच राज्यातील व राज्याबाहेरील कलारसिक वाचकांपर्यंत पुस्तके पोहोचली. ती अनेकांनी आपल्या परदेशातील नातेवाईकांना पाठवली. इंग्रजी पुस्तकांना परदेशी वाचकांचीही विशेष पसंती मिळाली. या पुस्तकांच्या विक्रीतून होणाऱ्या नफ्यातील काही भाग आदिवासी बांधवांच्या मदतीसाठी दिला जातो.


   पहिल्या पुस्तकाला ज्येष्ठ साहित्यिक- कला अभ्यासक नंदन रहाणे यांची प्रस्तावना लाभली. पुढील आवृत्त्यांमध्ये वारली कलेचे पितामह पद्मश्री जिव्या सोमा मशे यांची मी घेतलेली मुलाखत प्रस्तावना स्वरुपात दिली. आपल्या प्रस्तावनेत नंदन रहाणे म्हणतात, "वारली चित्रकला हा महाराष्ट्राचा मौल्यवान कलात्मक ठेवा आहे. रानावनातल्या वारली समाजाने पिढ्यानपिढ्या या चित्रवैभवाचे संगोपन, संवर्धन आणि संरक्षण केले. त्यांनी आपल्या संस्कृतीशी तसंच धर्मविधींशी ही कला जोडल्याने शेकडो वर्षांच्या कालप्रवाहात ती टिकून राहिली. आपल्या अंगभूत सौंदर्याच्या बळावर लोकप्रिय ठरली. बघताक्षणीच मन मोहून टाकणारी वारली चित्रशैली हा निरागस जनमानसाचा निसर्गसंवाद आहे. निसर्गाच्या कुशीत राहणाऱ्या वारली जमातीची जीवनशैली फारशी बदललेली नाही. चराचर सृष्टी, पर्यावरण, दैनंदिन जीवन व धर्मविधी यांची अतूट सांगड त्यांनी साधली आहे. त्यातूनच त्यांची कला बहरत गेली. अशा कलेतील रेषा, आकार, रंग-रूप, रचना यांची गणिती उकल किंवा कोरडी चिकित्सा म्हणजे समीक्षा नव्हे. कलेतील सुगंधाचा म्हणजेच आत्म्याचा शोध घेणे, त्यातील दरवळ अनुभवून तो इतरांपर्यंत पोहोचवणे ही विश्लेषक प्रक्रिया संजय देवधर यांनी अखंड जिज्ञासेतून केली आहे. ओघवत्या शैलीत ते वारली जमातीची, त्यांच्या कलेची कथा-व्यथा मांडतात. सतत चिंतन, मनन व तर्कशुद्ध मांडणी करून देवधरांनी वारली चित्रांचे समकालीन कलेशी नाते जोडले आहे. वारली कलेचे तंत्र सोप्या पद्धतीने समजावून देताना विविध संज्ञांचे अर्थही सांगितले आहेत. हे पाणी दिसते तेवढे उथळ नाही, याची जाणीव पुस्तकातून होते. वारली कलेचा इतर कलांबरोबर तुलनात्मक अभ्यास करून त्यांचा आढावाही देवधर यांनी घेतला आहे. त्यांच्या या कार्याबद्दल वारली जमातीच्या देवदेवता त्यांना उदंड आशीर्वाद देतील हे काय मी सांगायला हवे ?" असा अभिप्राय रहाणे यांनी नोंदवला आहे.                


                                             -संजय देवधर
   ( वरिष्ठ पत्रकार आणि वारली चित्रशैलीतज्ञ )

*********************************
पितामहांचे आशीर्वाद...


   वारली कलेचे पितामह पद्मश्री जिव्या सोमा मशे यांनी मला दिलेल्या मुलाखतीत वारली चित्रकलेचा आस्वाद सर्वांनी घ्यावा, असे सांगितले आहे. मात्र चित्रे रेखाटताना प्रयोगाच्या नावाखाली स्वैर आविष्कार टाळला पाहिजे. वारली कलेच्या मूळ  रेखाटनशैलीला धक्का लागू नये ; तसेच या कलावंतांचे आर्थिक शोषण होऊ नये, असेही त्यांनी आग्रहाने नमूद केले आहे. वारली चित्रे रंगविताना ब्रशचा वापर केला तर चित्र उठावदार न होता सपाट दिसते. परंतु बांबूची काडी किंवा खजरीचा काटा वापरून चित्र रंगवले तर चित्राला एम्बॉस केल्याप्रमाणे उठाव येतो. त्यामुळे वारली चित्र आकर्षक दिसते, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.आपल्याला मिळालेले विविध सन्मान हा मराठी मातीचा, वारली जमातीचा आणि एका संवादी चित्रलिपीचा गौरव असल्याची भावना ते व्यक्त करतात. पत्रकार संजय देवधर हे उत्तम चित्रकारही असल्याने त्यांनी वारली कलेवर मनापासून प्रेम करून ती सर्वत्र पोहोचविण्यासाठी अथकपणे परिश्रम घेतले आहेत असेही ते आवर्जून सांगतात. ही आशीर्वादपर प्रस्तावना मुलाखतीच्या स्वरुपात दिलेली असल्याने पुस्तकांची उंची निश्चितच वाढली आहे. या पुस्तकांमुळे माझा अनेकांशी संपर्क येतो. परदेशातूनही  अनेकजण ई मेलद्वारे आपले मत कळवतात. खूप जण आपल्या प्रतिक्रिया विविध माध्यमांतून नोंदवतात. त्यातून पुढील कामासाठी प्रोत्साहन, प्रेरणा मिळते व नवा हुरूप येतो. ही नवी लेखमाला ग्रंथरुपात प्रस्तावित आहे.आता लवकरच 'समग्र वारली चित्रसृष्टी' वाचकांच्या भेटीला येईल.


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही

स्वीपच्या माध्यामातून १७ नोव्हेंबरला आयोजित ‘वोटाथॉन’ मध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

'लोकराजा' दिवाळी विशेषांक २०२४ चे दिमाखात प्रकाशन ! उत्तम साहित्य निर्मिती काळाची गरज- डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, 'लोकराजा'ने जपला संवेदनशील साहित्याचा वसा-आशिमा मित्तल