पोलिस एफआयआर दाखल करून घेत नाहीत-मनपा उपायुक्त ! नाशिकरोडच्या वृक्षतोड प्रकरणी केवळ अदखलपात्र गुन्हा नोंद !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
नाशिक (प्रतिनिधी ) दि.१ जुलै रोजी नाशिकरोडच्या जव्हेरी कॉलनीत २५० वर्षांपेक्षा पुरातन पिंपळाचे झाड अवैधरीत्या तोडण्यात आले. मनपा उद्यान विभागाने सायंकाळी उशिरा पंचनामा केला. या बाबतीत दखलपात्र गुन्हा दाखल होण्याची गरज असताना संबंधित केवळ दोन व्यक्तींवर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याबद्दल हॅशटॅग चिपको चळवळीच्या कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला असून उद्यान विभाग व पोलीस यंत्रणा अशीच चालढकल करून गुन्हेगारांना पाठिशी घालणार असेल तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे.
सर्वोच्च व उच्च न्यायालयाने स्पष्ट निर्देश देऊनही नाशिकमध्ये अवैध वृक्षतोडीच्या घटना वारंवार घडत आहेत. संबंधित यंत्रणा मात्र थातुरमातुर कारवाई केल्याचे दाखवतात. उडवाउडवीची उत्तरे देतात. नाशिकरोडमधील प्रख्यात वास्तुविशारद व त्यांच्या सहकाऱ्यांनी दिवसाढवळ्या उंच पत्रे उभारुन २५० वर्षांपेक्षा पुरातन पिंपळाचे झाड समूळ तोडले. याबाबतीत कडक कारवाईची मागणी हॅशटॅग चिपको चळवळीच्या कार्यकर्त्यांनी केली. पण संबंधित व्यक्तींवर दखलपात्र गुन्हा दाखल करण्याऐवजी फक्त अदखलपात्र गुन्ह्याची नोंद पोलिस ठाण्यात करण्यात आली. महाराष्ट्र राज्य नागरी क्षेत्र झाडाचे जतन अधिनियम १९७५ चे प्रकरण ८ कलम २० क अन्वये गुन्हा दाखल होणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात मात्र तसे होत नाही. यासंदर्भात मनपा उद्यान विभागाचे उपायुक्त शिवाजी आमले यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी आम्ही एफआयआर दाखल करण्याचा आग्रह धरला तरी पोलिस दाद देत नाहीत. सहकार्य करीत नाहीत. पोलिसच चौकशी करतील असे उत्तर मिळत असल्याचे त्यांनी सांगितले. वास्तविक मनपा उद्यान विभाग किंवा वृक्ष प्राधिकरण समितीच्या परवानगीशिवाय केलेली वृक्षतोड दखलपात्र गुन्हा ठरविण्यात आला आहे. न्यायालयाचेही तसे स्पष्ट निर्देश आहेत.
उद्यान निरीक्षक एजाज शेख व पठाडे म्हणाले, जेलरोडवर दि.३० जून रोजी गुलमोहराचे झाड तोडण्यात आले. त्याबाबतीतही केवळ अदखलपात्र गुन्ह्याची नोंद झाली आहे.दरम्यान श्री श्री रविशंकर मार्गावर ४ कदंब व २ काटेरी बाभूळ तोडण्यात आले. तेथे दोन आरोपींवर दखलपात्र गुन्हा नोंदविण्यात आला आहे. असे असतांना नाशिकमधील प्रकरणात दोषींवर कडक कारवाई करण्याऐवजी त्यांना मोकळीक दिली जाते. याकडेही हॅशटॅग चिपको चळवळीचे प्रमुख रोहन देशपांडे व सहकाऱ्यांनी आक्षेप घेतला आहे. जर अशाच प्रकारे संबंधित चालढकल करून गुन्हेगारांना संरक्षण देणार असतील तर तीव्र आंदोलन छेडले जाईल व त्याला जबाबदार संबंधित यंत्रणा, अधिकारी असतील असे पर्यावरण तज्ज्ञ अश्विनी भट, ऋषिकेश नाझरे,मनोज साठे, प्रकाश निकुंभ, राजेश पंडित, अजिंक्य गिते व सहकाऱ्यांनी सांगितले. शहरात झाडांची अमानुषपणे कत्तल होत असताना महापालिका काय करतेय ? असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा