बदनाम गल्लीवर कोरोनाचे सावट ! सेवाभावी संस्था व सरकारी यंत्रणांचे स्तुत्य कार्य ! निशा डांगे यांनी एका दैनिकाच्या माध्यमातून आलेल्या बातमीवर टाकलेला वास्तव व समाजभान जागवणारा "कटाक्ष", सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!


बदनाम गल्लीवर कोरोनाचे सावट !

       कोरोना नावाच्या भस्मासुराने संपूर्ण जग आपल्या विळख्यात घेतले आहे. प्रत्येक शहरातील, गावातील प्रत्येक गल्ली, गल्लीत कोरोना महामारी पसरली आहे. बऱ्याच शहरात, गावात एक रेड लाईट एरिया असतो. या रेड लाईट एरिया मधील बदनाम गल्लीवरही कोरोनाचे सावट पसरलेले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाऊन आणि सोशल डिस्टनसिंग काळाची गरज ठरली आहे. गेल्या मार्च महिन्यासून आपण लॉकडाऊनचे व सोशल डिस्टनसिंगचे पालन करीत आहोत. कालांतराने आज लॉकडाऊनमध्ये प्रत्येक ठिकाणच्या परिस्थिती नुसार शिथिलता देण्यात येत आहे. सोशल डिस्टनसिंग मात्र कटाक्षाने पाळला जात आहे.

टाळेबंदी आणि बेरोजगारी !

         लॉकडाऊनच्या काळात अनेक व्यवसाय ठप्प झालेत त्यामुळे अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. या लॉकडाऊन व सोशल डिस्टनसिंगमुळे सर्वात जास्त बेरोजगारीचा फटका बसला आहे तो बदनाम गल्लीतील महिलांना. त्यांचा देह विक्रीचा व्यवसाय नि हे सोशल डिस्टनसिंग यांचं गणित कसं काय जुळणार? त्यांच्या या व्यवसायावर त्यांचे कुटुंब अवलंबून असते. देह विक्रीच्या व्यवसायाशी अनेकजण निगडित असतात. लॉकडाऊन व सोशल डिस्टनसिंगमुळे या सर्वजणांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यांचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प पडला आहे. कोरोना व्हायरसच्या भीतीने ग्राहक या एरियात जाण्यास घाबरत आहेत. देह विक्री व्यवसायामुळे सेक्स वर्कर व अज्ञात ग्राहक ह्या दोहोंच्या आरोग्यास धोका आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसच्या संकटाने वेश्या व्यवसाय संकटात आला आहे.

       बदनाम गल्लीवरही कोरोनाचे सावट पसरले आहे. सदैव गजबजलेल्या त्यांच्या एरियात सर्वत्र शुकशुकाट झाला आहे. या गल्लीतील लोकांचे जीवनच मुळात संघर्षमय असते. दररोजच्या मिळकतीतूनच त्यांचे घरभाडे, भोजनाची व्यवस्था, दैनिक गरजा भागवल्या जातात. कधी कधी एक- दोन हजार रुपये तर कधी कधी मिळणाऱ्या शंभर- दोनशे रुपयांवरही त्यांना गुजराण करावी लागते. काही महिला देह विक्री व्यवसायाला जोड व्यवसाय म्हणून शिलाई काम, भरतकाम करतात. आता ती सुद्धा ग्राहकसंख्या कमी झाल्याने त्यांची आर्थिक आवक पूर्णतः बंद झाली आहे.

दुर्लक्षित बदनाम गल्ली !

       या व्यवसायासाठी मोठया मोठया शहरात अनेक राज्यातील महिला आलेल्या असतात. त्यातील काही आपल्या गावी गेल्या असतील तर काहींना गावाकडे जाऊन काय करावे हा प्रश्न पडला असेल? वास्तविक पाहता स्थलांतरित घटकांमध्ये या महिलांचाही समावेश व्हायला हवा. स्थलांतरित घटकांना मिळणाऱ्या सर्व योजनांचे लाभ देह विक्री करण्यासाठी आलेल्या वेगवेगळ्या ठिकाणच्या महिलांनाही मिळायला हवेत. त्यांच्यासाठी सुद्धा सरकारच्या आर्थिक योजनांमध्ये नियोजन असायला हवे. त्या सुद्धा भारताच्या नागरिक आहेत. त्यांनाही माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे कोरोना महामारीच्या या बिकट संकटात त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवण्याची जबाबदारी देशाच्या सरकार यंत्रणेने घ्यायलाच हवी. परंतु त्यांच्याकडे सपशेल दुर्लक्ष झालेले दिसते.

      सरकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेले रेशनकार्ड, मतदान कार्ड, आधारकार्ड, पॅन कार्ड किंवा इतर कागदपत्रांची तरतूद करावी लागते. ती त्यांच्याकडे असेल का? हा महत्वाचा प्रश्न आहे. या व्यवसायातील बहुतांश महिला ह्या स्थलांतरित असतात, कित्येकींची नावे सुद्धा बदलेली असतात. तेव्हा त्यांच्या समस्या जाणून घेऊन  त्यांच्यासाठी सरकारने काही विशेष योजनांची तरतूद करायला हवी. त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी काही विशेष सवलती असायला हव्यात. समाजात त्यांच्याही मुलांना मानाचे स्थान मिळायला हवे. कारण त्या ज्या काही मजबुरीने देह विक्री व्यवसाय करत असतील त्यात त्यांच्या अपत्यांचा काय दोष? त्यांना समाजाचा अव्हेर सहन करावा लागतो. समाज नेहमीच त्यांची उपेक्षा करतो. शासनाच्या सोयी सवलती मिळवण्यात त्यांना अनेक अडचणी येतात. त्यांच्यात पात्रता असतांनाही त्यांना डावलले जाते.

       सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात बाहेरगावी शिकायला असणारी त्यांची मुले त्यांच्याजवळ परतली आहेत. अशा परिस्थितीत जिथे त्यांना स्वतःचे पोट भरणे कठीण झाले आहे तिथे मुलांचाही खर्च वाढला आहे. त्यांच्या राहण्याची व्यवस्था कुठे करणार? शक्यतो मुलांना या वातावरणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केल्या जातो परंतु लॉकडाऊनमुळे मुले याच वातावरणात अडकून पडले आहेत. कित्येक महिलांची गावाकडची कुटुंबं त्यांच्या मिळकतीवरच चालतात. लॉकडाऊनमध्ये जवळ साठवून ठेवलेली जमापुंजी किती दिवस पुरणार? मिळकतीचे साधन न उरल्याने त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचे भवितव्य धोक्यात आले आहे. त्यांच्या मिळकतीत अनेक वाटेकरी असतात. आपल्या मिळकतीतील काही टक्के रक्कम ठराविक लोकांना देऊन त्यांना त्यांचे व्यवहार चालवायचे असतात. त्यामुळे त्यांच्या समस्या निकालात काढणे काळाची गरज ठरली आहे.

       केंद्र सरकारने तृतीयपंथीयांसाठी बऱ्याच योजना राबविल्या आहेत. त्यांना सवलती राखीव जागा सुद्धा दिलेल्या आहेत. परंतु वेश्या व्यवसायातील स्त्रियांच्या समस्यांचे अजूनही निराकरण झालेले नाही. त्यांच्यासाठी विशेष योजना राबविणे अत्यावश्यक आहे.

सेवाभावी संस्था व सरकारी यंत्रणांचे स्तुत्य कार्य !

     काही ठिकाणी सेवभावी संस्थांनी पुढे होऊन बदनाम गल्लीतील लोकांना मदत केली आहे. कोरोनापासून बचाव करण्यासाठी त्यांना मास्क तसेच सॅनिटायझर पुरविण्यात आले आहे. आरोग्याच्या दृष्टीने त्यांना आवश्यक ती माहिती सुद्धा देण्यात आली आहे. त्यांचे समुपदेशन करून त्यांना कोरोनाच्या या काळात सुरक्षित कसे रहावे? तसेच स्वतःच्या आरोग्याची काळजी कशी घ्यावी? याचे ज्ञान देण्यात आले आहे.

       पुणे येथून प्रकाशित होणाऱ्या एका दैनिकातील वृत्तानुसार पुण्यातील बुधवार पेठेतील रेड लाईट एरियात महिलांची गैरसोय होऊ नये म्हणून पोलिसांनी व अनेक सामाजिक संस्थांनी सहकार्य केले. शुक्रवार पेठ पोलीस चौकीच्या सहायक पोलिस निरीक्षक वर्षा तावडे तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी, काही सामाजिक संस्थांनी त्यांना दूध, भाजीपाला तसेच जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा केला. "डॉक्टर आपल्या दारी" या स्तुत्य उपक्रमाअंतर्गत दर आठवड्याला या एरियातील महिलांच्या आरोग्याची तपासणी करण्यात आली.

      असे स्तुत सेवाभावी कार्य सर्वच ठिकाणी व्हायला हवे.

    केवळ पोट भरण्यासाठी यांत्रिकपणे हा व्यवसाय करणाऱ्या महिला त्यांच्याकडे जे ग्राहक येतात त्यांना कोणता आजार आहे किंवा नाही हा विचार करत असतील का? त्यांचे मन, भावना पूर्णपणे मेलेल्या असल्या तरीही कोणीतरी आपुलकीने आपली चौकशी करणारे असावे असे त्यांनाही वाटतेच.

       कोरोना महामारी मुळे सारे जग जागीच खिळून बसले आहे. सध्याच्या काळात परिस्थिती इतकी भयंकर आहे की आप्त, स्वकीय यांच्या अंत्यविधीसाठी जाण्यास देखील कोणीही धजावत नाही. जे आपल्याला सोडून गेले त्यांना आपण त्यांना आपण परत आणू शकत नाही परंतु जे आहेत त्यांच्यासाठी प्रार्थना करू शकतो. सर्वांनी सोशल डिस्टनसिंग पाळून स्वतःला व इतरांना सुरक्षित ठेवायचे आहे. कोरोनाचे सावट केव्हा ओसरेल निश्चित माहीत नाही. अशा परिस्थितीत वेश्या व्यवसायातील दुर्लक्षित महिला घटकांच्या समस्यांवर उपाययोजना व्हायला हवी.

      वेश्या व्यवसाय करणाऱ्या समाजातील दुर्लक्षित, उपेक्षित घटकाच्या उदरनिर्वाह व स्वास्थाची व्यवस्था नक्कीच व्हावी.

लेखिका
निशा संजय डांगे (नायगावकर)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही

स्वीपच्या माध्यामातून १७ नोव्हेंबरला आयोजित ‘वोटाथॉन’ मध्ये नाशिककरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे-विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम

'लोकराजा' दिवाळी विशेषांक २०२४ चे दिमाखात प्रकाशन ! उत्तम साहित्य निर्मिती काळाची गरज- डॉ. अनिरुद्ध धर्माधिकारी, 'लोकराजा'ने जपला संवेदनशील साहित्याचा वसा-आशिमा मित्तल