Xxxxxx locked his profile ! स्वत:चे ठेवायचं झाकून अन् दुसऱ्याचे पहायचे वाकून !! सुप्रसिद्ध लेखक नागेश शेवाळकर यांनी थोडक्यात घेतलेला समाचार वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!


कुलूप बंद परिचय!
        सकाळी सकाळी नेहमीच्या सवयीप्रमाणे मी फेसबुक सुरु केले. पाहतो तर काय तब्बल एकवीस मैत्रीच्या विनंत्या येऊन पडल्या होत्या. मनोमन खूप खुश झालो कारण कुणीतरी आपणहून माझ्याशी मैत्री करु पाहत आहे ही अभिमानाची गोष्ट होती. आपण आता विख्यात, प्रसिद्ध असे काही तरी मोठे झालो आहोत या समाधानात मी एका- एका विनंतीदाराचे खाते उघडत गेलो. तसतसा माझा चेहरा पडत गेल्याचे मलाच जाणवले..  कारण एकवीस पैकी वीस जणांनी आपला परिचय कुलूपबंद केला होता. एकविसावी व्यक्ती  अनोळखी महिला होती. तिचा परिचय होता परंतु एका अनोळखी महिला आपल्या पतीची मैत्रीण आहे हे समजताच कुटुंबात संशयकल्लोळ व्हायला नको म्हणून मी ती मैत्री स्वीकारली नाही...
       आजकाल फेसबुकवर एक नवीन कृती दिसून येत आहे...
     अनेक वर्षांनंतर शालेय जीवनातील एखाद्या मित्राची फेसबुकवर 'मैत्रीची विनंती' येते. आपण मोठ्या उत्साहाने ती मैत्री स्वीकारण्यापूर्वी हा आपला मित्र काय करत आहे हे जाणून घेण्यासाठी त्याचे फेसबुक खाते उघडतो किंवा 'मित्राचा मित्र तो आपला मित्र' अशा धाग्यातून एखाद्या मित्राच्या मित्राची मैत्रीची विनंती येते. तो आपल्यासाठी अनोळखी असला तरीही कुणीतरी मला 'ओळखते' या आनंदाने आपण त्याचे खाते उघडतो. त्यावेळी फेसबुकवर एक ओळ येते...
     '... यांनी स्वतःचा परिचय कुलूप बंद केला आहे.' ही ओळ पाहून असे वाईट वाटते ना की बस्स!लगेच मनाची स्थिती 'आपले ठेवावे झाकून, दुसऱ्याचे पहावे वाकून!' अशी होते.
       एखाद्या व्यक्तिने आपल्याला मोठ्या आग्रहाने जेवायला बोलवावे. मोठ्या आनंदाने सजूनधजून जावे, रिकाम्या हाताने जाऊ नये म्हणून फुलांचा गुच्छ, मिठाई किंवा एखादी भेटवस्तू घेऊन जावे आणि त्या व्यक्तिच्या घरी पोहोचताच दाराला भलेमोठे कुलूप दिसताच जशी अवस्था होते तशीच काहीशी अवस्था फेसबुकवर '... यांनी परिचय लॉक केला आहे!' ही ओळ वाचून होते.
      का करीत असतील बरे हे लोक असे? त्यांची अशी कोणती गोष्ट असावी की जी ते कुलुप बंद करून ठेवू इच्छितात? बरे, मग ज्या गोष्टी मित्रांना, जगाला कळू नये अशा वाटतात त्या फेसबुकच्या खात्यावर टाकाव्याच कशासाठी? काय असावी यामागील भूमिका?
       स्वतःचा परिचय लपविणे म्हणजे स्वतःची ओळख लपविण्यासारखे आहे. असे कोणते कार्य असावे की जे लपवावेसे वाटते? काही व्यक्ती विनयाने ओळख लपवतात परंतु ती गोष्ट वेगळी असते. अशा व्यक्ती आपणहून फार कमी लोकांना मैत्रीची विनंती पाठवतात. त्यांचे जे एक वर्तूळ असते त्यात ते सक्रीय असतात. मैत्रीची विनंती पाठवून आपली ओळख न सांगणे म्हणजे समोरच्या व्यक्तिवर अविश्वास दाखविण्यासारखे आहे. मग ज्याच्यावर तुमचा विश्वास नाही अशांशी मैत्री का जोडू पाहत असतील? मैत्री स्वीकारल्यानंतर ओळख देण्यात काही अर्थ नसतो. मैत्री स्वीकारल्यानंतर जर मैत्रीची विनंती करणाराचे कार्य, त्याचा परिचय आवडला नाही तर मग मैत्री अस्वीकृत (ब्लॉक) करण्याचा पर्याय तितका सयुक्तिक वाटत नाही.
      मैत्रीची विनंती पाठवणारांचा एक हेतू नकळत स्पष्ट होतो तो म्हणजे त्यांनी टाकलेल्या
पोस्टवर त्यांच्या मित्रांनी प्रतिक्रिया द्याव्यात किंवा पसंतीचा अंगठा उमटवावा. परंतु यापैकी  काही मित्र इतर मित्रांनी टाकलेल्या पोस्टवर निष्क्रिय राहतात... ना शब्द, ना अंगठा, ना इतर काही! मग कशासाठी मैत्रीचा अट्टाहास? स्वतःची पोळी भाजून घेण्यासाठी? मी ठरवले आहे, कुलूपबंद परिचय असलेल्या कुणीही मैत्रीची विनंती पाठवली तर ती स्वीकारायची नाही. 'तेरी भी चूप, मेरी भी चूप!' असे चालू द्यायचे...
                     ००००
                         नागेश सू. शेवाळकर, पुणे

टिप्पण्या

  1. व्वाह!
    मनःपूर्वक धन्यवाद!!
    आभारी आहे!!!

    उत्तर द्याहटवा
  2. अगदी खरंय...आपलं ठेवावं झाकून...मी पण स्विकारतच नाही अशा रिक्वेस्ट..छान आणि वास्तव लिहिलंत

    उत्तर द्याहटवा
  3. अगदी खरय 👍
    आपले अकाऊंट लॉक करून दुसऱ्यांना रिक्वेस्ट पाठवण्यामागचा उद्देशच समजत नाही.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही

‘गुलाबी’ – मैत्री, स्वप्नं आणि स्वतःचा शोध घेणारी हृदयस्पर्शी कहाणी २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला ! सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे यांची निर्मिती

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।