ग्रेस आणि भातुकली ! " चंद्रमाधवीचे प्रदेश " या काव्यसंग्रहातील " भातुकली " ही कविता लेखिका वर्षा थोटे यांनी केलेलं विश्लेषण !! सविस्तर वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
ग्रेस आणि भातुकली
================
" चंद्रमाधवीचे प्रदेश " या काव्यसंग्रहातील " भातुकली " ही कविता. तसं तर भातुकलीचा प्रत्यक्ष उल्लेख नाही अशाही कविता आहेत. भातुकलीच्या खेळात रममाण होणा-या मुलीला जशी खेळभांडी खरी वाटावीत आणि त्याच विश्वात मश्गूल होऊन खेळतांना बाहेरच्या जगाचा पूर्णपणे विसर पडावे तसे काहीसे ही कविता वाचतांना होते.
" अर्धा माझा भास
अर्धसत्य तुझे
त्याच्यासाठी ओझे आभाळाचे"
माझ्या मी पणात मी तरी कुठे पूर्णपणे अस्तित्व राखून आहे. अगदी त्या अर्धनारीनटेश्वरासारखं तुझं माझ्या श्वासात , ह्रद्यात , मनात अगदी नजरेतही अस्तित्व जाणवतं. माझा मी पूर्णपणे सावलीलाही ओळखू येत नाही. तू आणि मी जणू एकाच नाण्याच्या दोन बाजू आहोत की काय असाच तो भास !! . तू आणि मी वेगळे का आहोत बरं !!
" माझ्या तंद्रीविण
तुला दुःख नाही
तसू तसू नाही
जडपण "
माझी ध्यानवस्था तुझ्या स्मरणात लागली की आपसूकच तुला माझी आठवण छळत असावी. मग तुला अगदी गवताच्या पातीवर मावेल एवढंही दुःख जाणवत नसेल. त्या दुःखातून आलेल जडपण तर तू दुर कुठेतरी भिरकावून देत असशील.
"मी चंद्र खुडाया गेलो
शब्दांच्या खोल तळाशी
ग्लानीत भास माझे झाले विदग्ध सत्य
आई तुझ्या मुलांतिल हा एवढाच संत "
मला एवढी तंद्री लागलीय ना दुःखाच्या भातकुलीची की मी त्याच तंद्रीत शब्दांशी खेळत सुटतो. खेळता खेळता कधी तळाशी जाऊन पोहचतो. माझं मलाही कळत नाही आणि मग त्या स्वच्छ तळ्यात मला दिसतंय चंद्राचं प्रतिबिंब. खूप प्रयत्न करतो प्रेमाने त्या चंद्राला मुठीत पकडायचा पण तो काही हाती लागतच नाही म्हटल्यावर चिडून खुडायला ही पाहतो. पण त्या तंद्रीत हे ध्यानातच येत नाही की हा तर भातुकलीचा डाव आहे आणि चंद्रही भातुकलीतलाच आहे. जणू ही एक समाधीवस्थाच आहे. कवी ग्रेसांना वाटत की ही समाधी म्हणजे काही साधी सुधी समाधी नाही. ही कोण्यातरी संतासारखी समाधी आहे आणि माझ्या दुःखाच्या समाधीत मी आनंदी , समाधानी असतो .स्वतःच्या आईला खूप आनंदाने सांगू पाहतात की बघ बाकी तुझा मुलगा कसाही असला तरी या समाधीत मात्र तो विदग्ध ( खूप सहन केलेला ) संत भासतोय.
"मज कळे न स्वप्न कशाने
सत्याहून सुंदर दिसते
या संध्यासमयी सर्वांची
मग घागर का पाझरते "
खरंच तर आहे . अगदी प्रत्येकाला वास्तविकतेपेक्षा स्वप्नातच का रममाण व्हावसं वाटत असेल ? जसं ग्रेसांना या दुःखाच्या भातुकलीतील स्वप्न फार आवडायची म्हणून संध्येशी त्यांच घट्ट असं नातं होतं. या भातुकलीतही ग्रेसांना जगाचेही डोळे सांजेला पाणावलेले दिसतात. ज्यांच्या पदरात अमाप दुःख असतं त्यांच सांजेशी कदाचीत घट्ट नातं असावं असंच जणू प्रिय ग्रेस सांगू पाहताहेत. पण तरिही भातुकलीचा डाव मात्र हसत मुखाने खेळला गेलाय . जात असावा ? नाही का ? प्रिय ग्रेस...
" आत्म्यातला गुप्त काळोखही
स्पस्ट स्फटिकाप्रमाणे इथे वावरे
काव्यास त्याच्या पडे प्रश्न व्याकुळ
बहराविना जीवन का पाझरे "
खरंतरं ही भातुकली मी एकटा खेळतचं नाहीए. तुझं अस्तित्व तुझ्या आत्म्याच्या स्वरूपात माझ्या आतल्या काळोखाला प्रकाशमय करतं आणि त्या स्फटिकासारख्या स्वच्छ प्रकाशात मी माझा भातुकलीचा डाव तुझ्या समवेत खेळतो. खेळता खेळता माझीच शब्द माझ्याशी लंपंडाव खेळतात आणि मग काव्य स्फुरत जातं. मग माझ्या स्फुरलेल्या कवितेलाच प्रश्न पडतो की माझा जन्म झाला तरी कसा ? एकट्याविना का ते शक्य आहे. कुठेतरी बहरलेलं मन एकट्याने का जगू पाहतंय ? पण मी दुःखाशी सलगी करून भातुकली खेळतोय तेही तुझं अस्तित्व आजूबाजूला आहे हे स्मरून. नव्हे ते माझ्यासोबत आहेच. हेच जणू जगाला माहिती आहे. खरंतर हा माझाच माझ्यातील जाणिव - नेणीवेचा प्रवास आहे. जो मला प्रचंड आनंद , दुःख देतो. देत नाही ते रित्येपण. तुझं माझ्या सोबतीला असणं हा जाणिवेचा प्रवाह माझ्या सोबतीला अखंडच असतो. खरंतर हा भातुकलीचा खेळ म्हणजे एकप्रकारे " मृगजळाचे बांधकामच आहे ." पण तरिही मी या स्वप्नभुमीच्या अनुभवविश्वाची नेणिवप्रधानता करतो........
वर्षा पतके थोटे
नागपूर
धन्यवाद सर🙏
उत्तर द्याहटवाधन्यवाद सर🙏
उत्तर द्याहटवासुंदर रसग्रहण वर्षा ताई
उत्तर द्याहटवाधन्यवाद
हटवाभातुकली कवितेचे खूपच छान रसग्रहण केलं आहे.💐💐💐💐💐💐💐
उत्तर द्याहटवा