जीवननिष्ठा आणि निसर्गावरील श्रद्धा हीच वारली कलेची प्रेरणा आहे ! आदिवासी कलेसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन व्हावे ! जिवा भावाचे मनोगताचा उत्तरार्ध वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
चैतन्यशील वारली चित्रशैली...
दहाव्या शतकापासून अस्तित्वात असणारी आदिवासी वारली चित्रशैली आता सर्वत्र लोकप्रिय ठरली आहे. जगाच्या कॅनव्हासवर सन्मानाने विराजमान झाली आहे. अर्थातच याचे श्रेय पद्मश्री जिव्या सोमा मशे यांनाच जाते. मुळात वारली चित्रे स्त्रियाच चितारीत. जिव्या यांनी या कलेत प्रावीण्य मिळवून आपला ठसा उमटवला. पुरुष कलाकारांसाठी वाट मोकळी करून देऊन एक प्रकारची क्रांती केली. हल्ली वारली महिलांपेक्षा पुरुषच मोठ्या प्रमाणावर चित्रे रंगविताना दिसतात. मशे यांनी मागील आठवड्यात 'जिवा' भावाचे मनोगत व्यक्त केले होते, त्याचा हा उत्तरार्ध.
माझा उल्लेख अनेकजण 'वारली चित्रकलेचा जनक' असा करतात, मात्र मी असे श्रेय घेणे अयोग्य आहे.तब्बल ११ शतके ही कला असंख्य अज्ञात महिलांनी,कलाकारांनी ही जिवंत ठेवली. त्या समृद्ध परंपरेचा मी एक प्रतिनिधी आहे, असे म्हणणे या संदर्भात उचित ठरेल; त्याचा मला सार्थ अभिमानही आहे. 'वारली' असे जरी या कलेला आमच्या आदिवासी जमातीचे समूहवाचक नाव असले तरी ती मनुष्य देहासारखी नश्वर नाही; याचे कारण ती अतिशय चैतन्यशील आहे.जीवनसन्मुख आहे रसरशीत जीवनानुभव मांडण्याचे सामर्थ्य तिच्यात आहे. मी लग्नप्रसंगी देवचौक लिहिले. पारंपरिक, सामाजिक, सांस्कृतिक चित्रे कल्पकतेने रेखाटली. शेती, नांगरणी, पेरणी, भातलावणी, विहीर, कोंबड्या, जनावरे, पीक आल्यावरची कापणी, आदिवासींच्या चालीरिती, सण - समारंभ, लग्नसोहळे, तारपा वाद्यवादक व वैशिष्ट्यपूर्ण नृत्य, आमचे पाडे- वस्ती, देवदेवता, कोळ्यांची जाळी, मुंग्यांची वारुळे व रांग अशी चित्रे सातत्याने रंगवली. वारली जमातीच्या पारंपरिक कथा- कहाण्यांंना चित्ररूप दिले. वारली चित्रशैलीचे तंत्र, शुद्धता व मर्यादा सांभाळून अनेक प्रयोग केले. जसजसे माझे जग व दृष्टिकोन विस्तारले तसतसा नव्याचा समावेश मी चित्रांमध्ये केला. वेगवेगळी वाहने, आगगाडी, उंच इमारती, विमान यांची चित्रे माझ्या पद्धतीने रेखाटली. वारली बांधव कर्जाच्या किंवा व्यसनांच्या जाळ्यात अडकले की त्यांची सुटका होत नाही, हे मी कोळ्याच्या जाळ्याच्या प्रतिकातून दाखवले. डाव्या हाताने चित्र रेखाटताना गरजेपुरती अक्षरओळख झाली. सही करायला शिकलो. १० देशांमध्ये फिरलो पण मु. सोमनाथ (कलमीपाडा), घर क्रमांक १०२१, पो. गंजाड, ता. डहाणू, जि. पालघर येथेच माझी पूर्ण हयात गेली. आयुष्यभर मी कलाधर्म जपला आणि शेवटच्या श्वासापर्यंत वारली चित्रलिपीतून जगाशी संवाद साधत राहिलो.
जीवननिष्ठा आणि निसर्गावरील श्रद्धा हीच वारली कलेची प्रेरणा आहे. मी कायमच निसर्गाला गुरु मानले. शेतीतून मिळणाऱ्या वेळात मी चित्रसाधना केली. तरुण वयात माझे लग्न पवनीबाईशी झाले. ती धवलेरी आहे. म्हणजे तिला रितीनुसार लग्नविधी करण्याचा अधिकार आहे. ती बांबूच्या टोपल्या, चटया सुरेख विणते. वारली चित्रे रेखाटताना ७ दशके तिने मला कायमच साथ दिली. माझी मुले सदाशिव, बाळू माझ्याजवळ वारली कला शिकलेच. पण सरकारी पातळीवर गुरू- शिष्य योजनेत मी अनेक वारली युवकांना प्रशिक्षण दिले. बाळू दुमाडा, राजेश व अनिल वांगड, रत्ना धुलसाडा, कृष्णा पासारी, राजेश मोर, माणकी वायेडा, नथु सुतार असे कितीतरी कलाकार वारली कलेत पारंगत झाले आहेत. अनेकजण माझ्या पावलावर पाऊल ठेवून परदेशात पोहोचले. संपत ठाणकर याने वारली कलापरंपरा, संस्कृती याविषयी पुस्तके लिहिली आहेत. मधुकर वाडू याने त्याची चित्रे विविध देशांमध्ये निर्यात केली. त्याचे इंग्रजी व जर्मन भाषेतले 'अंडर द रेनबो ' हे पुस्तक प्रसिद्ध आहे. के. प्रकाश आणि यशोधरा दालमिया यांची इंग्रजी पुस्तके सुपरिचित आहेत. डॉ. गोविंद गारे यांच्यासमवेत पत्रकार संजय देवधर माझ्याकडे आले. पुन्हा पुन्हा येऊन वारली कला शिकले. वारली चित्रशैलीचा प्रसार व प्रचार करण्यासाठी ते अथक परिश्रम घेत आहेत. त्यांची वारली चित्रसृष्टी आणि वारली आर्ट वर्ल्ड यांसह ६ पुस्तके लोकप्रिय आहेत. चंद्र - सूर्य तसेच धरतरी माता, कणसरी देवी, नारणदेव यांचे आशीर्वाद पाठीशी कायम राहतील. जीवनाचं साधंसोपं तत्त्वज्ञान वारली कला मांडते. वारली चित्र म्हणजे चित्तातून उमटलेले चैतन्याचे कलात्मक रूप ! असा हा चैतन्याविष्कार सदैव चित्रकार आणि रसिकांना आनंद देत राहो.
-संजय देवधर
*********************************
आदिवासी कलेसाठी स्वतंत्र विद्यापीठ स्थापन व्हावे !
माझ्या चित्रांमध्ये विषयांची विविधता आहे. त्यात लय, गतिमानता जाणवते तसंच धून आणि वेगवेगळे नाद जाणवतात, असं जाणकार म्हणतात.माझी वारली चित्रे जगभरातील रसिकांच्या संग्रही आहेत. पुण्याच्या आदिवासी संग्रहालयात माझी चित्रे पाहावयास मिळतात. सापुताऱ्याच्या म्युझियम मधील माझ्या चित्रांची झालेली दुर्दशा पाहून मात्र मला खूप दुःख होते. काही पुस्तकांच्या मुखपृष्ठावर माझी चित्रे विराजमान झाली आहेत. शरद भोईर यांच्या
'वारली जीवनकला' या पुस्तकाचे मुखपृष्ठ माझ्या चित्राने सजले आहे. रिचर्ड लॉंग या जागतिक दर्जाच्या ब्रिटिश चित्रकारासमवेत माझ्या चित्रांचे प्रदर्शन इटलीतील मिलान शहरात भरविण्यात आले. असे अनेक प्रयोग आम्ही केले. माझ्यासारखे अनेक जिव्या वारली कलेत निर्माण होवोत हीच अपेक्षा. वारली कला जनमानसात पोहोचली. त्याला लवकरच ५० वर्षे होतील. या निमित्ताने आदिवासी कलेचे स्वतंत्र विद्यापीठ उभे राहावे; त्यामुळे संशोधन, प्रशिक्षण यांना अधिक गती येईल असे वाटते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा