हिरकमहोत्सवी वर्षात पदार्पण केलेल्या पुण्यातील आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाचे जनक ! व्यासंगी लेखक, जिज्ञासू संशोधक, विचारवंत व उत्तम प्रशासक असलेले डॉ. गोविंद गारे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व !




आदिवासी संशोधनाचे

हिरकमहोत्सवी पदार्पण !


    आदिवासींच्या कला त्यांच्या जीवनशैलीशी निगडित आहेत. चित्र, नृत्य, संगीत यांनी त्यांचे जीवन समृद्ध केलेले आहे. त्यांच्या जगण्यातले कलात्मक अंतरंग पुण्यातील आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयात उलडगलेले दिसते. महाराष्ट्रातील आदिम संस्कृतीच्या सखोल अभ्यासासाठी दि.३ मे १९६२ रोजी राज्य शासनाने आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेची ( टीआरटीआय ) स्थापना केली. पुढे १९६५ साली या संस्थेतर्फेच हे संग्रहालय दिमाखात उभे राहिले. आदिम संस्कृतीचा आकर्षक चेहरा येथे बघायला मिळतो. यंदा ही संस्था हिरकमहोत्सवी वर्षात पदार्पण करीत आहे.सध्या श्रीमती पवनीत कौर आयुक्तपदाचा कार्यभार सांभाळत आहेत. या संग्रहालयाच्या कलात्मक वाटचालीचा प्रवास महाराष्ट्र राज्य एकसष्टी निमित्ताने...


      महाराष्ट्रात एकूण ४७ आदिवासी जमाती सुखाने नांदतात. त्यातील वारली,महादेव कोळी, कोलाम, कातकरी, ठाकर,भिल्ल, गोंड, माडिया, पावरा अशा जमातींचा अवघा संसार पुण्यातील या संग्रहालयात सजला आहे. त्यांची पारंपरिक आगळीवेगळी वैशिष्ट्यपूर्ण संस्कृती, आकर्षक घरेदारे, दररोजच्या वापरण्यात येणारी मातीची व धातूंची भांडीकुंडी, शिकारीची हत्यारे, शेतीची अवजारे, वाद्यांचे विविध प्रकार, वेगवेगळ्या नृत्य प्रसंगी वापरण्यात येणारे कागदाचे मुखवटे, स्त्री पुरुषांचे कलात्मक दागदागिने, रंगीबेरंगी वेशभूषा, निसर्गाची प्रतिके असणाऱ्या देवदेवतांच्या प्रतिमा, स्मारकस्तंभ अशा विविधततेचे दर्शन येथे घडते. सुमारे २ हजारांपेक्षा जास्त वस्तूंची आकर्षक मांडणी येथे करण्यात आली आहे. आदिवासी बांधवांची आगळीवेगळी संस्कृती, त्यांचा इतिहास, सण - उत्सव, चालीरीती, धार्मिक प्रथा, परंपरा यांचा उलगडा बघणाऱ्याला त्यातून होतो.संग्रहालयात प्रवेश केल्यावर अगदी सुरुवातीलाच आदिवासी वारली, कोलाम, माडिया जमातींच्या झोपड्या प्रतिकृती स्वरुपात सामोऱ्या येतात. कुडाच्या भिंतीवर शेणामातीने सारवून त्यावर सुंदर वारली चित्रे रेखाटलेली आहेत. या वारली चित्रशैलीला तब्बल ११०० वर्षांची प्रदीर्घ परंपरा आहे. आदिवासी पाड्यांच्या दुनियेचे दालन प्रेक्षकांच्या कुतूहलाचे दार उघडते. जिज्ञासूंना अधिक जाणून घेण्याची, अभ्यासाची प्रेरणा देते. घरगुती वापराच्या साध्यासाध्या वस्तू लक्ष वेधून घेतात. त्यांनाही कलात्मकतेचा स्पर्श झालेला दिसतो.


    दुर्गम भागात राहून निसर्गात रममाण झालेल्या आदिवासींच्या जीवनावर परिसराचा, सभोवतालच्या पर्यावरणाचा मोठाच प्रभाव पडलेला आढळून येतो. नैसर्गिक संसाधनांचा जाणीवपूर्वक मर्यादित वापर करतांना ते निसर्गसाखळीतील एक कडी बनून जातात. कोणत्याही अभिनिवेशाशिवाय पर्यावरणाचे रक्षण, संवर्धन करतात. आदिवासींच्या झोपड्या, दैनंदिन व्यवहारातील वस्तू  परिसरातील दगड, माती, लाकूड, बांबू, कारवी नावाची वनस्पती यापासून तेच तयार करतात. बांबूंचा फार मोठा वापर टोपल्या, मासे पकडण्यासाठी जाळ्या ( मलई) पावसापासून संरक्षण करणारी इरली, भाताची साठवणूक करण्यासाठी मोठ्या आकाराच्या कणग्या तयार करण्यासाठी होतो. फावल्या वेळात त्यांचे हात सतत अशा वस्तू तयार करण्यात गुंतलेले असतात. धनुष्यबाण हे शिकारीचे हत्यार व बांबूपासून तयार केलेले बाणांचे विविध प्रकार या संग्रहालयात आहेत. वाळवलेल्या दुधीभोपळ्याची भांडी तर दिसतातच पण त्यापासून केलेले तारपा हे सुरेल वाद्य बघणाऱ्यांंची उत्सुकता वाढवते. निसर्गाच्या सानिध्यात  रहाणाऱ्यांच्या सृजनशील हातांचा स्पर्श त्यांनी तयार केलेल्या कलाकृतींना असतो. त्यात उपयोगीतेबरोबरच कलात्मकतेचा प्रत्यय येतो.त्यांच्या दागिन्यांचे वैविध्य थक्क करते. चांदी, तांबे, पितळ, कथिल अशा धातूंपासून अलंकार बनतात. शिंपले, रंगीत खडे,कवड्या, जुनी नाणी, पक्ष्यांची रंगीबेरंगी पिसे यांचाही सुंदर वापर त्यात खुबीने केला जातो. कागदाचा लगदा, शेण, माती, नैसर्गिक रंग यांचा वापर करून केलेल्या मुखवट्यांमागे इतिहास लपला आहे. बोहाडा नृत्यात असे मुखवटे धारण करून कथाप्रसंग जिवंत केले जातात. अलीकडे ही परंपरा अस्तंगत होत चालली आहे. निसर्ग श्रद्धेतूनच आदिवासी देवदेवता निर्माण झाल्या. त्यांचेही संग्रहालयात दर्शन घडते. एकूणच कला, परंपरा व संस्कृतीची पाऊले येथे जागोजागी उमटली आहेत. त्याचा लाभ पुढच्या पिढ्यांनी घ्यायला हवा. त्यासाठी एकदा तरी या संग्रहालयाला २८, क्वीन्स गार्डनजवळ, पुणे येथे भेट द्यायला हवी.


                                              संजय देवधर
***********************************
स्मरण संग्रहालयाच्या जनकाचे ...


        व्यासंगी लेखक, जिज्ञासू संशोधक, विचारवंत व उत्तम प्रशासक असलेले डॉ. गोविंद गारे हे अष्टपैलू व्यक्तिमत्त्व ! आदिवासी हा त्यांचा औत्सुक्याचा, चिंतनाचा विषय. भारतीय प्रशासन सेवेतील या सनदी अधिकाऱ्याने आदिवासींच्या जीवनावर अभ्यासपूर्ण व व्यापक लेखन केले. पुण्यातील आदिवासी सांस्कृतिक संग्रहालयाचे जनक म्हणूनही त्यांची ओळख आहे. विशेषतः त्यातील कलादालन व वारली पाड्याचे प्रदर्शन त्यांनी वास्तववादी पद्धतीने साकारले आहे. त्यासाठी त्यांना सहकारी रमेश रगतवान यांची खूप मदत झाली. पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालयात शिकत असतांनाच गारे यांनी विविध वृत्तपत्रे, मासिके यामध्ये लेखन सुरु केले. डॉ. वि.म.दांडेकर व संजय गाडगीळ यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी आदिवासी समाजावर पीएचडी पूर्ण केली. पुढे ५० पेक्षा जास्त पुस्तके डॉ. गोविंद गारे यांनी लिहिली. ती कॉन्टिनेंटल व श्रीविद्या प्रकाशनाने प्रकाशित केली. त्यांची वारली चित्रसंस्कृती व वारली चित्रकला ही पुस्तके लोकप्रिय आहेत. त्यासाठी त्यांना आदिवासी संग्रहालयातर्फे अर्थसहाय्य देखिल करण्यात आले होते. ब्रिटिश कौन्सिलची फेलोशिप मिळवून त्यांनी परदेश प्रवासही केला. डॉ. गारे यांचे बोट धरूनच मी २००५ साली प्रथमच जिव्या सोमा मशे यांच्या कलमीपाड्यावर गेलो. त्यामुळेच मला संशोधन कार्याची प्रेरणा देण्यात त्यांचा मोठा वाटा आहे. दि.२४ एप्रिल २००६ रोजी त्यांचे निधन झाले. नुकताच त्यांचा स्मृतिदिन झाला. त्यांचे संशोधन, साहित्य यापुढेही अभ्यासकांना मार्गदर्शन करीत राहील. 


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

मध्य नाशिक विधानसभा मतदारसंघात आ. प्रा.फरांदे यांचा विजय निश्चित‌-भाजपा नाशिक महानगर अध्यक्ष प्रशांत जाधव यांची ग्वाही

‘गुलाबी’ – मैत्री, स्वप्नं आणि स्वतःचा शोध घेणारी हृदयस्पर्शी कहाणी २२ नोव्हेंबर २०२४ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला ! सोनाली शिवणीकर, शीतल शानभाग, अभ्यंग कुवळेकर आणि स्वप्नील भामरे यांची निर्मिती

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।