निसर्गपुत्रांचा सुगम कलाविष्कार ! वारली चित्रशैलीतील रामकथा !! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!





निसर्गपुत्रांचा सुगम कलाविष्कार !


   चित्र, संगीत आणि नृत्य या कला आदिवासी लोकजीवनाचे अविभाज्य अंग आहेत. त्यांच्या दैनंदिन वापराच्या साध्या साध्या वस्तूंनाही कलेचा परिसस्पर्श झालेला दिसतो. आवश्यक तितकंच तांत्रिक कौशल्य वापरून निसर्गपुत्रांनी केलेला सुगम कलाविष्कार हा आदिवासी कलेचा प्राण आहे. वारली चित्रे सहजपणे संवाद साधतात म्हणून ती सुगम आहेत. वारल्यांना त्यांच्या कलानिर्मितीची प्रेरणा निसर्गाकडून मिळते. त्यांचे माध्यम निसर्ग व आविष्कारही निसर्गच आहे. निसर्गाकडून घेऊन निसर्गालाच अर्पण करणे हे वारली जमातीचे जीवनसूत्र आहे. परिसराशी सुसंवाद साधणारी निर्मिती हे वैशिष्ट्य त्यांच्या कलेत ठळकपणे जाणवते.


    वारली ही ठाणे, पालघर जिल्ह्यातील प्रमुख आदिवासी जमात आहे. त्यांची एक वेगळी संस्कृती असून तिच्या परिघातच ते आनंदाने जगतात. त्यांचे जीवन खडतर, कष्टमय असले तरीही निसर्गाच्या सान्निध्यात त्यांची कला फुलते. भारतीय नागरी सांस्कृतिक जीवनाच्या समृद्धीला आदिवासी कलांचं अधिष्ठान आहे. वारली जमात दुर्गम पाड्यांवर राहून सहज उपलब्ध होणाऱ्या साहित्यातून उत्स्फूर्तपणे कलानिर्मिती करते. ११०० वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणारी वारली चित्रे केवळ वर्तुळ, त्रिकोण, चौकोन या तीन भौमितिक आकारांवर आधारलेली आहेत. अत्यंत आकर्षक व सहजसोपी वारली चित्रशैली साध्या पद्धतीने छायांकित स्वरुपात आकाराला येते. कुडाच्या भिंतीवर शेण, मातीने सारवून व गेरूचा लेप लावून त्यावर तांदळाच्या पिठाने चित्रे रेखाटली जातात.कारवी वनस्पतीचा वापर करून कूड विणले जाते. त्यावर लालसर तपकिरी रंगाचा नैसर्गिक पोत तयार होतो. तांदळाच्या पिठात मोहाच्या झाडाचा चीक घालून बांबूच्या काडीने किंवा खजरीच्या काट्याने चित्रण केले जाते.वारली चित्रशैलीत लग्नघरी चौक रेखाटण्याला विशेष महत्त्व आहे. एकाच चौकटीत देवचौक व लग्नचौक असतात. त्यालाच 'चवूक लिहिणे' असे म्हणतात.नकारात्मक शक्ती, भावना दूर होऊन वधूवरांना सकारात्मक ऊर्जा, आशीर्वाद मिळावेत ही त्यामागील भावना आहे.यातून आपल्याला निसर्गस्नेही,सुसंवादी अशा सुगम कलानिर्मितीचा प्रत्यय येतो.


    लग्नसोहळ्यापूर्वी वधूवरांच्या घरात सुवासिनी चौक काढतात. पहिली देवरेघ असते. नंतर नवरानवरीच्या नावाने रेघा काढल्या जातात. यावेळी भगत, धवलेरी उपस्थित असतात. ते मार्गदर्शन करून स्वतः चार दिशांच्या सूचक रेषा काढतात. नंतर सर्वजण मिळून देवचौकाचे चित्रण पूर्ण करतात. मध्यभागी पालघट देवी चितारली जाते. बाजूला चंद्र - सूर्य या देवता, सौभाग्याचे लक्षण म्हणून फणी व उत्तरोत्तर विकास व्हावा या उद्देशाने शिडी ही प्रतीके काढली जातात. याशिवाय तुरे, पासोडी, साखळी, डाखे हे डमरूसारखे वाद्य काढतात. देवचौकात घोड्यावर स्वार झालेला पंचमहाभूतांचे प्रतीक असणारा पंचशिऱ्या तसेच नारणदेव, हिरवादेव, हिमायदेवी यांची चित्रे रेखाटली जातात. आजूबाजूच्या जागेत बाशिंग, गजरा, वऱ्हाडी, माकड अशीही चित्रे सर्वजण मिळून काढतात. म्हणून वारली चित्र ही 'समूहाची कलाकृती' ठरते. अनेकदा वारली चित्रांना लोककथांचा आधार असतो.मुगली आणि कोल्हा, उडता वारू, महाप्रलयाची गोष्ट अशा लोककथा समजून घेतल्या तर चित्रातून अर्थ स्पष्ट होतो. छोटी छोटी रेखाटने हे वारली चित्रांचे वैशिष्ट्य आहे. 'क्ष-किरण' पद्धतीचे हे चित्रण म्हणजे जे डोळ्यांना दिसत नाही ; पण अस्तित्वात असते, ते रेखाटले जाते ! ते जगण्याच्या पारदर्शकतेचेच जणु निदर्शक आहे. वारली चित्रातील मानवी आकृत्या नेहमीच कार्यमग्न दिसतात. त्यातून श्रमप्रतिष्ठा अधोरेखित होते. चित्रातील आकार सहजस्फूर्त, अलंकारिक व चैतन्यमय असल्याने निसर्गपुत्रांचा हा सकारात्मक, सुगम कलाविष्कार जगभरातील रसिकांना भावतो.

                                      -संजय देवधर

**********************************
वारली चित्रशैलीतील रामकथा...


    वाल्मीकी ऋषींनी रामायण हे महाकाव्य रचले. रामायण आणि महाभारत हे हिंदुधर्मीयांसाठी अतिशय पवित्र ग्रंथ आहेत. असं म्हटलं जातं की, महाभारत हे जसं घडलं तसं व्यासांनी लिहिलं. मात्र रामायण आधी लिहिलं गेले व नंतर रामजन्म होऊन प्रभु श्रीरामांच्या जीवनात तसे प्रसंग घडले. आदर्श जीवन कसे जगावे याचे मार्गदर्शन रामायण करते. मूळ संस्कृत रामायणाप्रमाणेच तुलसी रामायण आणि इतर सुमारे ३०० रामायणे अन्य भारतीय भाषांमध्ये अस्तित्वात आहेत. मालेगावच्या सौ. पूजा झंवर - गगराणी यांनी रामायणावर आधारित चित्रे वारली पद्धतीने रेखांकित केली आहेत. गेल्या वर्षी गुढीपाडवा - रामनवमीच्या वेळी लॉकडाऊनमुळे बाहेर जाता येत नव्हते. अशावेळी त्यांना ही कल्पना सुचली. त्यांच्या सासूबाईंनी तुलसी रामायणातील दोहे निवडून दिले. त्यानुसार २१ चित्रे पूजा यांनी केली. पांढऱ्या पार्श्वभूमीवर काळ्या रेषेने पाडवा ते रामनवमी अशी ९ दिवसांत ही चित्रे पूर्ण झाली.पुण्याचे माहेर असणाऱ्या पूजा गेल्या १० वर्षांपासून मालेगाव येथे राहतात.विविध कलांमध्ये त्या पारंगत आहेत. त्यांनी अनेक फ्लॅट्स, बंगल्यांच्या भिंतींवर वारली चित्रे रंगवली आहेत. आता लवकरच त्या गडद रंगाच्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या रंगात ' वारली चित्ररामायण ' रंगवणार आहेत.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !