सन्मित्र प्रा. डॉ. सुनील देवधर व शाळासोबती प्रदीप मुळे ! एकाच दिवशी दोघांवर कोरोनाचा आघात !! सविस्तर माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
सन्मित्र हरपला...
प्रतिभावान कवी, उत्स्फूर्त विडंबनकार, विद्यार्थिप्रिय प्राध्यापक, तळमळीचा कार्यकर्ता, आदर्श पती, प्रेमळ पिता अशी विविध रूपे एका व्यक्तीत एकवटलेली दिसणे विरळाच म्हणावे लागेल. प्रा.डॉ. सुनील देवधर हे अशांपैकी एक होते. कोरोनाच्या विळख्यात ते अडकले व अवघ्या तीन दिवसात काळाने आमच्या या सन्मित्राला हिरावून नेले. शैक्षणिक क्षेत्रासह सामाजिक कार्यातही त्यांचे मोठे योगदान होते. केवळ उक्तीपेक्षा त्यांच्या कृतीतूनच ते अधिक असायचे व दिसायचे.
नाशिकरोडच्या बिटको महाविद्यालयात प्रा.डॉ. देवधर यांनी ३६ वर्षे अध्यापन केले. ते अकौंटन्सी विभाग प्रमुख म्हणून जानेवारी महिन्यात निवृत्त झाले. महाविद्यालयात त्यांनी एन.सी.सी.च्या एअर विंगचे प्रमुख म्हणूनही काम केले. छात्रसेनेचे उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल त्यांना विद्यापीठाचे तत्कालीन कुलगुरु डॉ. वासुदेव गाडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले होते. हरहुन्नरी स्वभाव असल्याने ते जणु जगन्मित्रच झालेले होते. त्यांनी खूप मोठा मित्रपरिवार जमवला होता.शैक्षणिक क्षेत्राप्रमाणेच सामाजिक उपक्रमांमध्येही ते हिरिरीने सहभागी होत.गोदाघाट स्वच्छता मोहिमेत पत्नी व मुलांसह त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला होता. नाशिकरोडच्या चित्तपावन ब्राह्मण संघाच्या विविध कार्यात केवळ सहभागच नव्हे, तर देवधर दाम्पत्याचा अगदी आयोजनापासून पुढाकार असायचा. कोणताही गाजावाजा न करता ते कार्य यशस्वी करायचे. अंगी नेतृत्वगुण असले तरी सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा त्यांचा स्वभाव होता. शुभांगी वहिनी राष्ट्रसेविका समितीच्या कार्यात योगदान देतात. मुलांवरही तसेच संस्कार आहेत. तब्येतीने ते ठणठणीत होते. त्यांना दुसरा कोणताही आजार किंवा विकार नव्हता. ते दुर्दैवाने कोरोनाचे, एकूणच दुर्व्यवस्थेचे आणि व्यवस्थापनाच्या बेजबाबदारपणाचे बळी ठरले , असेच खेदपूर्वक म्हणावे लागते आहे.
प्रा. सुनील देवधर यांचा जन्म पुणे येथे १९ जानेवारी १९६१ रोजी झाला. चार भाऊ व एक बहीण अशा परिवारातले हे शेंडेफळ. साहजिकच सर्वांचे लाडके असल्याने त्यांचे बालपण लाडाकोडात गेले, मात्र वयाच्या १४ व्या वर्षीच त्यांचे पितृछत्र हरपले. पुढे आई व मोठे भाऊ सतिश,जयंत, प्रदीप यांनी त्यांचे पालनपोषण, शिक्षण केले. एम.कॉम. पर्यंतचे शिक्षण पुण्यात पूर्ण झाल्यावर नोकरीच्या निमित्ताने ते नाशिकला आले. नाशिकरोडच्या बिटको महाविद्यालयात १९८४ साली त्यांना नोकरी मिळाली. नाशिकच त्यांची कर्मभूमी ठरली आणि ते कायमचे नाशिककर झाले. त्यांच्या पत्नी शुभांगी रेल्वेत नोकरीला आहेत. नाशिकरोडलाच हे दाम्पत्य स्थायिक झाले. प्रा. देवधर यांचा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्याबरोबरच वार्षिक स्नेहसंमेलन, सांस्कृतिक कार्यक्रम यातही पुढाकार असायचा. कौशिक गोत्री देवधर - दीक्षित - ढमढेरे कुलबांधवांचे एक मध्यवर्ती मंडळ आहे. या मंडळाचे ते उपाध्यक्ष होते ;
त्याचबरोबर नाशिक शाखेच्या अध्यक्षपदावरही कार्यरत होते. या मंडळाच्या २००९ मध्ये नाशिक येथे झालेल्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या आयोजनात त्यांचा मोलाचा वाटा होता.त्यांच्या सामाजिक कार्यात पत्नी व मुलांची त्यांना कायम साथ असायची. गेल्या महिन्यात त्यांच्या जुळ्या मुलांपैकी डॉ. दीप याचे लग्न झाले. तो फिजिओथेरपिस्ट आहे. दुसरा मुलगा यश स्वतंत्र व्यवसाय करतो. खरंतर सेवानिवृत्तीनंतर त्यांचा हा शांतपणे कुटुंबियांमध्ये रमण्याचा काळ होता; जेमतेम दोन महिनेच त्यांना हा आनंद उपभोगायला मिळाला. त्यांच्या मातेला वयाच्या १०३ व्या वर्षी पुत्रवियोगाचे दुःख सहन करावे लागते आहे. प्रा. सुनील देवधर यांना भावपूर्ण श्रद्धांजली !
-संजय देवधर
*********************************
शाळासोबत्याचाही वियोग !
गेल्या बुधवारी एकापाठोपाठ दोन धक्कादायक मृत्युवार्ता आल्या. सुनील देवधर यांच्या पाठोपाठ आमचा पेठे विद्यालयाचा शाळासोबती प्रदीप मुळे याचेही
हृदयविकाराने वयाच्या ६२ व्या वर्षी निधन झाले. त्याने काही दिवसांपूर्वीच कोरोनावर यशस्वीपणे मात केली होती. तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा तळमळीचा कार्यकर्ता होता. उत्तम संघटकाचे गुण त्याच्याकडे होते. संघ संस्कारांच्या मुशीत त्याच्यातील समाजसेवकाची जडणघडण झाली.आणीबाणीच्या काळात त्याने कारावास भोगला. 'लोकतंत्र सेनानी संघा'च्या नाशिक जिल्हा शाखेचा सहकार्यवाह म्हणून तो कार्यरत होता. युती सरकारच्या काळात सत्याग्रहींंना मानधन मंजूर झाले होते. मात्र आघाडी सरकारने सत्तेवर आल्यानंतर ते बंद केले. या निर्णयाच्या विरोधात प्रदीपने सहकाऱ्यांसमवेत लढा उभारला. कौटुंबिक जबाबदाऱ्या सांभाळत आयुष्यभर त्याने परिस्थितीशी दोन हात केले. इतर राजकीय पक्षांमधील वेगळ्या विचारधारेच्या कार्यकर्त्यांशीही त्याचे कायमच मैत्रीपूर्ण संबंध असायचे. त्याच्या पश्चात पत्नी, तीन मुले असा परिवार आहे. शाळेपासूनच्या सहवासातल्या प्रदीपच्या आठवणी डोळ्यासमोर तरळत आहेत. त्याच्या परिवाराला परमेश्वर दुःख सहन करण्याचे व परिस्थितीवर मात करण्याचे बळ देवो ही प्रार्थना !
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा