हर्षद थविल याने बी.ई. (मेकॅनिकल) होऊनही स्वेच्छेने व डोळसपणे घरची शेतीच करण्याचा निर्णय घेतला ! 'सामूहिक वृत्ती' ची वारली कलाकृती !! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!






' सामूहिक वृत्ती 'ची वारली कलाकृती !


   आदिवासी वारली चित्रशैली ही जरी 'स्व-तंत्र' असली ; तरी आपल्या प्रकटीकरणात एक कलावस्तू म्हणून ती 'सामूहिक स्वयं-शिस्त' देखिल कटाक्षाने पाळत असल्याचे जाणवते.वारली कला निसर्गाविषयी स्नेह, पर्यावरणाबाबत प्रेम आणि दैनंदिन जीवनात आत्मसन्मान बाळगायला शिकवते. वारली कलाकार चित्रांचे श्रेय स्वतःकडे घेत नाहीत. अज्ञात दैवी शक्तीने हे रेखाटन आपल्याकडून घडवून आणले, अशी त्यांची श्रद्धा असते. त्यामुळेच 'मी- माझं' या धारणेच्या पलिकडची एक  ' समूहवाचक ' अशी कलाकृती निर्माण होते. म्हणून वारली चित्रशैली ही सामूहिक वृत्तीची निदर्शक आहे, असेच म्हणावे लागते.नुकताच वसुंधरा दिन झाला, त्यानिमित्ताने ...


    ११०० वर्षांची प्रदीर्घ परंपरा आदिवासी वारली चित्रकलेला लाभली आहे. गडद पार्श्वभूमीवर फक्त पांढरा रंग, मूलाकारांचा वापर, दैनंदिन जीवनातील प्रसंग, ठराविक चित्रविषय अशा मर्यादा या कलेला आहेत. त्या कोणी लादलेल्या नसल्या तरी स्वेच्छेने स्वीकारलेल्या या मर्यादांवर मात करून वारली चित्रवैभव निर्माण होतं. चित्र काय व कसं काढायचं हे त्यांना जसं सुचतं, तसंच चित्र काढताना कुठे थांबायचं याचंही भान त्यांना उपजत असतं. हा विवेक कलाकाराकडे नसेल तर चांगल्या चित्राचा बेरंग होऊ शकतो. त्यासाठी संयम आवश्यक असतो. प्रत्येक क्षण आनंदात कसा जगावा हे वारली कला शिकवते. चित्र काढताना आपोआपच मौनसाधना होते. आत्मसंवाद,आत्मचिंतन व आत्मपरीक्षण सुरु राहाते. श्वासावर नियंत्रण येऊन कलाकृतीत लयबद्धता निर्माण होते. निसर्गात जशी लय असते तशीच ती शरीर, मन व आत्मा यांच्यातही असतेच. लयदार वारली चित्र बघणाऱ्याला निसर्गाच्या अधिक जवळ नेते. रूढ अर्थाने काही भाष्य न करताही पर्यावरणरक्षण, संतुलन शिकवते. मूकपणे वसुंधरा रक्षणाचे महत्त्व पटवते. कलेत मन रमले की, भावनात्मक व शारीरिक ताणतणाव दूर होऊन तरल आत्मिक आनंद मिळतो. मन भरकटत नाही. लाभलेली चैतन्यऊर्जा उत्साह वाढवते. चित्र काढताना सहजपणे ध्यानधारणा होऊन सरावाने समाधी अवस्था देखील अनुभवता येते.वारली चित्रकला 'नित्यनूतनत्वा'च्या  संकल्पनेवर आधारलेली आहे. ती सतत नाविन्याची अनुभूती देते.  अभिजात भारतीय सौंदर्यशास्त्राच्या  अंगाने वारली चित्रशैलीचा अभ्यास केला तर षडांग सूत्राचे आयोजन त्यात केल्याचे स्पष्ट जाणवते. 


    रूपभेद म्हणजे आकारांची रचना ! केवळ मूलाकारांच्या सुयोग्य मांडणीतून वारली चित्र आकाराला येते. अवघड आकारांचे सहजतेने सुलभीकरण केले जाते. रूपातील भेद कमीतकमी रेषांतून व्यक्त होतात. प्रमाण या दुसऱ्या नियमानुसार निसर्गातील विविध घटकांचे प्रमाणबद्ध आकार रेखाटण्यात वारली कलाकार वाकबगार आहेत. तालमानानुसार असलेला त्यांचा सजीवांचा तसेच मानवी शरीरशास्त्र व शरीररचनेचा अभ्यास थक्क करतो. सौंदर्यशास्त्राच्या निकषानुसार ज्या चित्रात उत्तम भावदर्शन असते ते चित्र उत्कृष्ट  मानले जाते. या कसोटीवरही वारली चित्रे उतरतात. वारली चित्रकार आकृतींच्या नेमक्या हालचाली सूचित करुन समर्थपणे भाव प्रकट करतात. मानवी आकृतीच्या चेहऱ्यावर कोणतेही तपशील नसून सुद्धा आनंद, उत्साह, भय, क्रोध, चिंता, उत्सुकता असे कितीतरी भाव सहजतेने उमटतात. लावण्ययोजना म्हणजे सौंदर्य निर्मिती. त्यासाठी वारली चित्रशैलीत वर्तुळाकार वापरलेला दिसतो. अनादिकालापासून सूर्य,चंद्र यांचा वर्तुळाकार मानवाला मोहवीत आला आहे. लावण्यासाठी लयबद्ध रेषेद्वारे आकारांची पुनरावृत्ती होते. अनुभवांवर आधारलेले संकेत व प्रतिमांचे आयोजन कौशल्याने केले जाते. षडांगातील पाचवे अंग म्हणजे  ' सादृश्य '. ते अर्थातच कलाकाराचे निरीक्षण, स्मरणशक्ती, सूक्ष्म अवलोकन व निसर्गाच्या सान्निध्यात  मनावर उमटणाऱ्या तरंगांवर अवलंबून असते. षडांगातील शेवटचे व सहावे अंग म्हणजे वर्णिकाभंग. वर्णिका म्हणजे रंगछटा . वारली कलेत गडद पार्श्वभूमीवर केवळ पांढऱ्या रंगछटेचा वापर करतात. ही मर्यादा त्यांनी स्वखुशीने स्वीकारली असली तरी रंगांचा अभाव जाणवत नाही. वारली चित्रकलेने कलाजाणिवांमध्ये मोलाची भर घातली आहे. अनेक अज्ञात कलाकारांनी ही कला सर्वदूर पोहोचविण्यासाठी आयुष्य वेचले, अनेकजण योगदान देत आहेत.कलेद्वारे वसुंधरेची आराधना करीत आहेत.

                                              -संजय देवधर
*********************************
नातं कलेशी ; इमान मातीशी...


    हर्षद थविल या युवा कलाकाराने वारली चित्रकलेशी नातं जोडलं आहे. निसर्गावर  मनापासून प्रेम करीत व मातीशी इमान राखत तो सेंद्रिय शेतीत रमला आहे. आदिवासी कोकणा जमातीचा हर्षद बालपणी निसर्गाच्या सहवासातच वाढला.त्याने महाविद्यालयीन व 


उच्चशिक्षण  नाशिक तसेच कोल्हापूर येथे घेतले. बी.ई. (मेकॅनिकल) होऊनही त्याने स्वेच्छेने व डोळसपणे घरची शेतीच करण्याचा निर्णय घेतला. सुरगाण्याजवळ गारमाळ येथे राहून चार एकर शेतीत तो अभिनव प्रयोग करतो. औषधी वनस्पती, फुलझाडे, रानभाज्या पिकवतांना त्याने कॉफी, कोको, स्ट्रॉबेरी यांची योजकतेने लागवड केली. त्याबरोबरच ड्रॅगन फ्रुट, स्टार फ्रुट, आवाकाडू, लिची, थायलंड चेरी, सफेद जांभूळ अशी फळफळावळ तो यशस्वीपणे घेतो. यातून वेळ काढून त्याने कृत्रिम धबधबा, तलावनिर्मिती केली आहे. मिळणाऱ्या फावल्या वेळी हर्षद वारली चित्रे रंगविण्यात रममाण होतो. त्याच्या चित्रांमध्ये पेरणीपासून सुगीपर्यंतची शेतीची दृश्ये प्रामुख्याने दिसतात.माझ्या संपर्कात आल्यावर मी आयोजित केलेल्या विविध उपक्रमांतही तो सहभागी झाला. विद्रोही साहित्य संमेलनात त्याच्या चित्रांचे प्रदर्शन झाले होते. कोल्हापूरला असतांना त्याने अनेक बंगल्यांच्या, घरांच्या भिंती वारली चित्रांनी सुशोभित केल्या. शेती आणि चित्रकला परस्परपूरक आहेत, त्यातून आनंद, समाधान व सकारात्मक ऊर्जा मिळते असे मत तो मांडतो.हर्षदच्या आगामी कलात्मक वाटचालीसाठी शुभेच्छा !


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !