तिच्यातली 'ती' जुन्या रूढी परंपरा म्हणजे ! कीड समाजाला लागलेली !! पारतंत्र्याच्या ओझ्याखाली ! स्त्री मात्र राहिलीय दबलेली !! 'ती' म्हणजे जगातली बाई. लेखिका भारती सावंत यांचा पूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
तिच्यातली 'ती'
जुन्या रूढी परंपरा म्हणजे
कीड समाजाला लागलेली
पारतंत्र्याच्या ओझ्याखाली
स्त्री मात्र राहिलीय दबलेली
'ती' म्हणजे जगातली बाई. समाजाकडून गृहीत धरलेले असे पात्र. सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत यंत्राप्रमाणे अव्याहत काम करणारी आणि सर्वांच्या तोंडावरचा आनंद पाहून सुखी-समाधानी राहणारी स्त्री! जगाच्या कानाकोपऱ्यात आपणास आढळेल. अगदी ठार अडाणी असलेल्यां पासून ते लाखो रुपये कमावणारी स्त्री ही बाईच असते. तिची किंमत घरातच केली जात नाही, तर समाजाकडून काय अपेक्षा करायच्या !आज-काल सर्वांना साक्षर, चांगल्या पगाराची नोकरी करणारी, तरीही सुगरण आणि घरदार सांभाळणारी मुलगी हवी असते. मग अशी लाखाचे पॅकेज कमावणारी मुलगी नवऱ्याकडूनही तशीच अपेक्षा न करेल तरच नवल! म्हणजे गृहकृत्यदक्ष मुलीचा तिच्यासाठी शेरा हवा. मुलांना का नको? संसार दोघांचा ना! मग खस्ता बाईनेच का काढायच्या? घरातील काम, धुणी भांडी,ओट्यावरची आवराआवर करायची. ऑफिसमधून येताना भाजी तिनेच आणून सगळी झोपल्यानंतर तिनेच निवडत बसायचं.मग तिने तिचे जीवन कधी जगायचे?
आठवड्यातले सहा दिवस ऊर फुटेस्तोवर पळायचे आणि रविवार सुट्टीचा वार म्हणून पुरुष वर्गाने मस्त लोळायचे, उशिरा उठायचे, गरम चहा नाश्ता खाऊन वर्तमानपत्र वाचायचे, दूरदर्शन पाहायचा, मधूनच मोबाईलवर चॅटिंग आणि कॉल वर राहायचे. मग तिने
आराम कधी करायचा? एकच दिवस सुट्टीचा म्हणून.... दळणं करायची, भाज्या निवडणे, साफसफाई, मुलांचे आजार, सासू-सासर्यांना सांभाळणे, त्यांचे औषध-पाणी, घरातील रिपेअरची कामे करून घ्यायची. ती ही एवढी शिकलेली... मग वर्तमानपत्र तिने कधी वाचायचे? दूरदर्शन मोबाईल तिच्यासाठी नाही का? शिवाय मुले झाली तर त्यांची कामे करायची, जागरणे करून मुलांना जपायचे, ऑफिससाठी पळायचे, मूल आजारी असेल तर तिनेच ऑफिसमधून रजा घ्यायची, मुलाला डॉक्टरकडे न्यायचं, औषध पाणी द्यायचं, घरात वृद्ध सासू-सासरे असतील तर त्यांचीही सेवा करायची. मग तिला सुट्टी कधी मिळणार? शिवाय तिने आजारीही पडायचे नाही. तिचे आजारी पडणे म्हणजे साऱ्या घरादाराला टेन्शन! कारण घरातील चार लोकांचे काम ती एकटीच करत असते. मग ती आजारी पडली तर ती कामे कोणी करायची? यंत्राप्रमाणे तिने चालूच रहायचे! आजारसुद्धा झटकून टाकायचा. कारण ती स्त्री आहे.देवाने तिला शोषित होण्यासाठी,समर्पण करण्यासाठी जन्माला घातलेय. स्त्रीला उपजतच समंजसवृत्ती दिली आहे हे मान्य! परंतु जास्त ताकद थोडीच दिलीय! मग तिलाही अंगात त्राण असायला हवेत ना! तिच्या अंतर्भागात मन नावाचे इंद्रिय आहे. त्याचा विचार कोणी करायचा? ते कोमेजून गेले तर कोणी फुलवायचे ? बाह्यांग आजारी असलेले स्पर्शाने, डोळ्याने समजते. पण मनाचे काय! त्याचे थकणे, विझणे कसे आणि कोण समजणार? मग त्यावर कोणी फुंकर घालायची? की त्याला तसेच कोमेजून द्यायचे?
आधीच हळव्या मनाची संवेदनशील असणारी स्त्री मग मोडून पडते. कधीतरी ती बंड पुकारते. मग ती घटस्फोट घेते किंवा आत्महत्या करते. कारण तिच्या मनाचा विचार करणारी माणसे समोर नसतील तर तिला राबवून घेण्याचा त्यांना काय अधिकार! त्यांनी तिला एवढे गृहीत धरले की तिचे अस्तित्वच नष्ट व्हावे! तिच्या भावनांचा विचार होऊ नये! स्त्री म्हणजे पैसे कमावणारे मशीन नव्हे किंवा तुमच्या आज्ञा मानुन सर्व कामे करून तुम्हाला सर्व वस्तू हातात आणून देणारी कठपुतळी बाहूली नव्हे! तिच्याही काही आशा अपेक्षा आहेत. तिचीही स्वप्ने आहेत. त्यांचा चुराडा करण्याचा इतरांना काय अधिकार !बालपणापासून प्रचंड मेहनत करून तिने अभ्यास केला. ती शाळा कॉलेजमध्ये शिकली ते आपले स्वप्न साकार करण्यासाठी! मग तिच्या स्वप्नांची तिने का बरे तिलांजली द्यावी! आपल्या स्वप्नांना मुरड घालून तिने हांजी हांजी करून तुमच्या पुढेमागे करावे ही कसली अपेक्षा? मुलगी किंवा बाई म्हणून तिच्यात काय कमी आहे? आजही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून ती शिकते, कामे करते, बरोबरीने पैसे,
नावलौकिक आणि सन्मान कमवते. मग तिच्या प्रज्ञेचा, बुद्धिमत्तेचा कस लावण्याऐवजी तिची किंमत कस्पटासमान का व्हावी? तिने लाचारीने तुमच्यासमोर का झुकावे? तिच्या मनाची घालमेल तिने कुठे व्यक्त करावी? पुरुषांच्या दबावाखाली पिचलेली ती किती काळ हा अन्याय सहन करेल? तिचे शरीर, मनही पेटून उठेल! मग तुम्ही तिला असंस्कृतपणाच्या पारड्यात बसवायला मोकळेच! तिची जगण्याची भूमिका समजून न घेता तिच्या खांद्यावर कामाचे आणि जबाबदारीचे ओझे ठेवाल तर तुम्हाला तिच्याकडून सहकार्य मिळण्याची आशाही सोडाल! ती तुमचा तिरस्कार करेल.
ती स्त्री आहे म्हणून तिने गगनभरारी घ्यायची नाही का? हाच पुरुष वर्ग बाहेरच्या स्त्रीचे, तिच्या कर्तृत्वाचे मोठे गोडवे गातो. तिच्या कार्याचा उदो उदो करतो. परंतु घरातील बाईने तशी प्रगती करायची म्हटली तर तिच्या मागण्यांचे, आशाआकांक्षांचे पंख छाटून टाकतो. ही कसली दुटप्पी वृत्ती! समाजासमोरचा हा नकली बुरखा घालून वावरणारा चेहरा नि त्यामागील वास्तव स्त्रिया बाहेर काढू शकणार नाहीत का? त्यांचा आतल्या आत कोंडमारा करणार का? तिने आपल्या भावनांना मुरड घालून सारे आयुष्य तुमच्या चरणाची धूळ पुसत राहायचे का? मग तिच्या बुद्धिमत्तेचे काय! आणि तिच्या जीवनाचे सार काय! मोलकरीण म्हणून जगायचे असेल तर शाळा शिकून तरी काय उपयोग! आजही मुलगी पाहायला जाताना तिचे लाखो रुपयांचे पॅकेज ऐकून आतून आनंदाच्या उकळ्या फुटत असतात. तरीही तिला विचारले जाते, घरातील स्वयंपाक, धुणी-भांडी करता येतात का? जी मुलगी हिमतीने एवढी शिकली, हुशारीच्या बळावर लाखोंचे पॅकेज कमवते. ती हाताखाली मोलकरीण ठेवू शकत नाही का? मग कमी शिकलेली आणि नोकरी न करणारी मुलगी सून म्हणून घरात आणा मग मिळेल तुम्हाला हातात सर्व गोष्टी. तिच्या पगाराची का मग अपेक्षा करता? मुलीकडून सर्व गुणवत्ता असण्याची अपेक्षा. मग तुमचा मुलगा एवढे काय तीर मारतो? की तो पुरूष आहे म्हणून त्याच्या सार्या अवगुणावर पडदा टाकायचा? आणि ही मुलगी म्हणून तिने सर्व अपेक्षांची पुर्ती करायची? हा कसला न्याय? हा तर स्त्री जातीवर धडधडीत अन्याय!
पूर्वीच्या काळी बाईने 'चूल आणि मुल' संभाळत बसायचे. पुरुषांच्या हुकमी वृत्तीचा स्वीकार करायचा असाच शिरस्ता होता. ना त्यांना फिरण्याचे स्वातंत्र्य! ना मोकळीक! फावल्या वेळेत माजघरात बसायचे आणि ज्यादाची कामे उरकायची! म्हणजे सारा जन्म घरची कामे करण्यातच खर्ची पडायची! पडद्याच्या आतच राहून सर्व सेवा पुरवायच्या. वर तोंड करून बोलायचे नाही. पुरुषी अहंकार दुखेल असे वागायचे नाही. परंतु इंग्रजांच्या अधिपत्याखाली काही समाज सुधारकांनी स्वतः साक्षर होऊन बायकांच्या या जाचक प्रथांविरुद्ध लढा देण्याचा चंग बांधला. ज्योतिबा फुले, शाहू महाराज, राजाराम मोहनराय, ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी समाजातील दोष दूर करण्यासाठी स्त्री साक्षर होणे किती आवश्यक आहे आणि त्यासाठी समाजातील जाचक रूढी बंधन, प्रथा यांच्या विरोधात लढा द्यायला सुरुवात केली. मुलींनी शिकावे म्हणून सावित्रीबाई फुलेंनी पण स्त्रियांना साक्षर बनविण्याचा विडा उचलला होता. त्यासाठी समाजाकडून होणारा त्रास,जात त्यांनी स्वत: सहन केला होता.इतकेच नाही तर दगड गोटे आणि शेणाचा माराही त्यांनी सहन केला होता. तरीही त्यांनी स्त्रियांना साक्षर बनवण्याचा वसा पूर्ण करून दाखवला. अशा परिस्थितीत साक्षर झालेली स्त्री आज कुणाच्या बंधनात राहणे किती योग्य आहे? आणि तिला का बंधनात ठेवावे? तिच्या भावनांचाही विचार व्हायलाच हवा.
आज बऱ्याच अंशाने स्त्री स्वतंत्र होऊ पहात आहे. शंभर टक्के नसली तरी सत्तर टक्के स्त्रियांना स्वातंत्र्याचे वारे चाखायला मिळत आहे. त्या गगनभरारी घेण्याचे स्वप्न साकारत आहेत. पुरुषी अहंकाराला झुगारून आपली प्रगती साधत आहेत. तरीही आज बऱ्याच घरातून स्त्रीच स्त्रीची शत्रू असल्याचे निदर्शनास आले आहे. घरातील मुलगी स्वतंत्र झाली तर ती आपले ऐकणार नाही. घराबाहेर पडली तर तिचे पाऊल घरात टिकणार नाही. मग ती घरातील कामे करणार नाही अशी वृत्ती फोफावत असल्याने पहिल्या पिढीची ही स्त्री नव्या पिढीच्या स्त्रीच्या पायात बंधनाच्या शृंखला घालीत आहे. जुन्या प्रथांना कुरवाळले जात आहे. त्यामुळे स्त्रीचे पुढे पडणारे प्रगतीचे पाऊल मागे खेचण्यासाठी स्त्रीच जबाबदार आहे.घरातील स्त्री बाहेर पडली तर समाज काय म्हणेल? तिचे वागणे समाज मान्य होईल का? ती उच्छृंखल वागेल. नवीन फॅशनमुळे ताब्यात राहणार नाही. घरातील कामे आपणास करावी लागतील. देवादिकांच्या कार्यात सहकार्य करणार नाही. अशी भीती मनात धरून तिला उंबरठ्याबाहेर जाऊ दिले जात नाही. त्यामुळे मुलींची कुचंबणा होते. एकीकडून प्रगतीचा मार्ग दिसत असताना पुन्हा मागच्या मळलेल्या वाटेवरून जावे लागत आहे.यामुळे तिची घालमेल होते आणि इथेच वादाचा मुद्दा तयार होतो. आई- मुलगी, सासू-सुनांच्या नात्यातली दरी वाढत जाते आणि प्रेम, जिव्हाळा संपुष्टात येतो. काही जुन्या-जाणत्या स्त्रियां "आम्ही असे वागलो " आता याच पद्धतीने नव्या पिढीनेही वागावे अशी अपेक्षा करतात. परंतु नव्या पिढीला यातून बाहेर पडायचे असते. "स्काय इज द लिमिट". प्रगतीची शिखरे त्यांना खुणावत असताना पुन्हा मागच्यासारखे बंधनात राहायचे नसते. त्यामुळे मतभेद निर्माण होतात. जुन्या काळच्या स्त्रियांना त्यात त्यांचा उद्धटपणा जाणवतो आणि "आमच्या वेळी असे नव्हते हो असले वागणे" अशी पिरपिर सुरू होते. दोन पिढ्यांच्या मतांतरामुळे घरात आणि बाहेर धुसफूस चालू होते. त्याचे विपरीत परिणाम घर आणि कुटुंबाला भोगावे लागतात. आई योग्य की पत्नी या कचाट्यात सापडलेला मुलगा हा गुंता सोडवू शकत नाही आणि व्यसनात गुरफटतो किंवा जास्त वेळ घराबाहेर काढू लागतो. त्याचे पर्यवसान म्हणून त्या कुटुंबाची वाताहात होते आणि पश्चातापात जळत एकेक दिवस काढावे लागतात. त्यामुळे जुन्या पिढीने एक पाऊल पुढे आणि नव्या पिढीने एक पाऊल मागे घेतले तर समाजबांधणी निरोगी होईल आणि प्रगतीचे पंख लावलेला हा समाज गगनभरारी घेईल. ज्याप्रमाणे प्रेमाने जग जिंकता येते तर मग माणसांची काय कथा! परंतु द्वेषाने द्वेष करत राहिले तर बॉम्बस्फोट होणारच ! त्यामुळे समजुतदारपणाने, प्रेमाने चार गोष्टी समजून सांगितल्या तर चार पिढ्या ही सुरळीतपणे एकत्र नांदू शकतील आणि सर्वत्र प्रगतीचे वारे वाहू लागेल. नवीन राष्ट्राच्या विकासाचा आलेखही उंचावेल हेच खरे.
सौ. भारती सावंत
मुंबई.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा