होळी- होलूबायला सिनगार केला कयाचा गं....... अग्निपूजन परंपरेची चित्रमय अभिव्यक्ती ! सविस्तर लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!





न्यूज मसाला सर्विसेस, 7387333801
***********************************

अग्निपूजन परंपरेची चित्रमय अभिव्यक्ती !


  आदिवासी वारली जमात निसर्गस्नेही आणि पर्यावरणरक्षक आहे. परंपराप्रिय वारली स्त्रीपुरुष सण - उत्सवात मनापासून रमतात. त्यांच्यासाठी होळीचा सण दिवाळीपेक्षाही मोठा आहे. माघ पौर्णिमेपासून त्यांच्या होलिकोत्सवाला प्रारंभ होतो. फाल्गुन पौर्णिमेला संपूर्ण पाड्याची एक सामूहिक होळी साजरी केली जाते. पंचमीपर्यन्त चालणाऱ्या या शिमग्यात धुळवडही उत्साहात होते. यावेळी एकमेकांना नैसर्गिक रंगानी रंगवतात. चेष्टामस्करीसाठी अगदी स्त्रीवेषापासून ते पोलिसापर्यंत विविध सोंगे वठवली जातात. याच अग्निपूजन परंपरेच्या अभिव्यक्तीचे सुंदर चित्रण वारली कलेतही दिसते.


     वारली पाड्यांवर माघ पौर्णिमेला होलिकोत्सव सुरु होतो. महिनाभर दररोज संध्याकाळी लहानशी होळी पेटवतात. यावेळी हवेत गारवाही असतो. फाल्गुन पौर्णिमेच्या सायंकाळी सार्वत्रिक मोठी होळी पेटवली जाते. दुपारीच जंगलातून चिंबी म्हणजे हिरवा बांबू आणून पाड्याच्या मध्यवर्ती ठिकाणी जमिनीत रोवतात. काही भागात शिरीष वृक्षाचा सोटा वापरण्याची प्रथा आहे. होळीची जागा शेणाने सारवून त्यावर सुवासिनी तांदळाच्या पिठाने सुरेख चौक रेखाटतात. लहानसा खड्डा करून त्यात थोडे तांदूळ, एखादे नाणे घालून त्यावर बांबू रोवला जातो. त्याला शेंदूर, कुंकवाचा टिळा लावतात. सौभाग्यलेणे म्हणून काळ्या मण्यांचा सर व बांगड्या बांधतात. बांबूच्या वरच्या टोकाला कोंबडा, खोबऱ्याची वाटी,पापड्या ( तांदळाच्या पातळ भाकऱ्या ) अडकवतात.बांबूच्या भोवताली लाकूडफाटा रचतात. त्याशेजारी गवताची छोटी होळी केलेली असते. त्यातील विस्तव घेऊन मोठी होळी पेटवण्याचा मान गावप्रमुखाला असतो. होळी पेटवल्यावर वारली स्त्रिया होळीची गाणी गातात. त्यात पशुपक्षी, झाडे - झुडुपे, जमीन, जल, जंगल यांचे वर्णन असते. या गाण्यांमधून सृष्टी तसंच परिसराविषयी आदरभाव व्यक्त होतो.


   तरुण अविवाहित मुले- मुली एकत्र येऊन होळीभोवती नृत्याचा फेर धरतात. यावेळी मनासारखा जीवनसाथी निवडण्याची संधी त्यांना मिळते. अर्थात त्याची सुरुवात होळीपूर्वी भरणाऱ्या भोंगऱ्या बाजारातच झालेली असते. १५ -२० दिवस भरणाऱ्या या बाजारात आदिवासी जीवनसंस्कृती जवळून बघायला मिळते. काही ठिकाणी याला मुरकुंड्या बाजार असेही म्हटले जाते. होळी गीताचे बोल साधेसोपे असतात.त्यात पारंपरिक चालीरितींचे वर्णन असते.


   "होलूबायला सिनगार केला कयाचा ग...


होलूबायला सिनगार केला नारलाचा...


होलूबायला सिनगार केला शेंदराचा.. 


होलूबायला सिनगार केला  कुंकवाचा...


होलूबायला सिनगार केला तांदळाचा..


होलूबायला सिनगार केला पापड्यांचा..."


 अशा गाण्यांवर ताल धरून रात्ररात्र नृत्यात आनंदाचे, उत्साहाचे रंग भरले जातात. पौर्णिमेच्या रात्री चंद्राच्या साक्षीने होळीच्या प्रकाशात परिसर उजळून निघतो. पौर्णिमेचे टिपूर चांदणे आणि होळीच्या लवलवत्या ज्वाळा यांच्या साथीने नृत्यातील लय वाढत जाते. मुख्य होळीच्या आदल्या दिवशी लहान मुलांची छोटी होळी केली जाते. तिला कुक्कड होळी म्हणतात. होळीला नैवेद्य दाखविण्यासाठी चामट्या, तांदळाच्या पिठाचे लाडू करून ते अर्पण करण्याची प्रथा आहे.वारल्यांच्या होलिकोत्सवाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यात स्त्रियांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. होळीला मनोभावे नमस्कार करून दुष्ट प्रवृत्तींंचा,अमंगलाचा नाश होवो तसेच भरपूर पाऊसपाणी पडू दे, धनधान्य भरपूर पिकून बरकत येऊ दे, गुरावासरांचा सांभाळ कर, नैसर्गिक संकटांपासून सगळ्या जीवांचे रक्षण कर अशी प्रार्थना अग्निमातेला  केली जाते.


    'वारल्यांंची होळी, इडा पीडा जाळी'अशी एक म्हण आहे. होळीसाठी फाग म्हणजे देणगी मागण्याचीही पध्दत आहे. होळी पेटल्यावर शेरोडे, इळींग अशा वनस्पतींच्या फांद्या तापवून आपटतात. त्यातून फटाक्यांसारखा आवाज येतो. होळीनृत्यासाठी ढोलाला विधिपूर्वक नवीन चामडे चढवलेले असते. यावेळी 'मांदल' या नावाचा नाच केला जातो. तारपा या वाद्याऐवजी ढोल, टिमकी, पिपाणी ही वाद्ये वाजविण्याची परंपरा आहे.अलीकडे ३-४ पाडे मिळून एकत्र होळी केली जाते. वृक्षतोड न करता वाळलेली लाकडे वापरतात. प्रत्येकजण होळीच्या राखेचा अंगारा भक्तिभावाने लावतो. होळीतील बांबूची एखादी तरी काडी आणून झोपडीतील भाताच्या कणगीला टोचून ठेवतात. त्यामुळे भात कमी पडत नाही अशी त्यांची श्रद्धा आहे.पंचमीपर्यंत चालणाऱ्या शिमग्यात धुळवड साजरी होते. होळीतील राख तसेच पळसाची फुले, काही वनस्पती व पानांपासून तयार केलेला रंग खेळतात. निसर्गपूजकांचा हा होलिकोत्सव म्हणजे अग्निपूजन परंपरेचा आविष्कार आहे.वारली चित्रशैलीमध्ये होळी, शिमगा, धुळवड, रंगपंचमी या विषयावर रंगवलेली अनेक चित्रे दिसतात.ते त्यांच्या उत्सवप्रिय मानसिकतेचे प्रतिबिंबच म्हटले पाहिजे.

                                    -संजय देवधर.             ***********************************

वणवा रोखणारे 'सचित्र' प्रबोधन...


  होलिकोत्सवात एकीकडे अग्निपूजन होत असताना, दुसरीकडे मात्र अग्नितांडवाने  वनसंपदेची होणारी राखरांगोळी मनाला चटका लावते. आदिवासी भागात जंगलांमध्ये वारंवार भडकणारे हे वणवे नैसर्गिक आपत्ती ; की स्वार्थासाठी जाणूनबुजून केलेली जाळपोळ हा संशोधनाचा विषय आहे ! पालघर जिल्ह्यातील गोराड गावचे रहिवासी व दहिसरच्या शाळेत कलाशिक्षक असणारे चित्रकार महेश काचरे यांनी वणव्यांंच्या जखमांवर वारली चित्रांद्वारे मलमपट्टी करण्याचा अनोखा प्रयत्न केला आहे. त्यातून आगी रोखण्यासाठी वनविभाग, स्थानिक नागरिक यांनी सातत्याने प्रयत्न करण्याची गरज असल्याची जनजागृती त्यांनी केलेली दिसते. केवळ चित्रे काढून ते थांबले नाहीत, तर आपला भाऊ भावेश याच्या समवेत जंगलातील आगी विझविण्यासाठी त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. त्याचे व्हिडिओ तसेच या संदर्भातील वारली चित्रे समाजमाध्यमांवर व्हायरल झाल्याने अनेकजण त्यांच्याशी जोडले गेले व निसर्गमित्र बनले. महेश काचरे म्हणतात की, प्रत्येक सजीव निसर्गावर अवलंबून असतो. निसर्ग कोणताही भेदभाव करीत नाही. म्हणून प्रत्येकाने पर्यावरण रक्षणासाठी निसर्गमित्र व्हावे व आपल्या परीने योगदान द्यावे.यापूर्वी कोरोनाच्या संदर्भातही त्यांनी वारली चित्रांमधून त्रिसूत्री पाळण्याचा संदेश दिला होता.


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !