अकरा शतकांच्या परंपरेचे समृध्द, सर्जक प्रतिनिधित्व ! रिनाचे योगदान बघता तिची शिफारस पुढील वर्षीच्या पद्मश्री पुरस्कारासाठी होणे उचित ठरेल ! सविस्तर वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा !!
समृध्द, सर्जक प्रतिनिधित्व !
आदिवासी वारली जमातीच्या लोकजीवनाचे, संस्कृतीचे व धार्मिक चालीरीतींचे प्रतिबिंब त्यांच्या चित्रशैलीत उमटलेले दिसते.११०० वर्षांची ही परंपरा मुख्यत्वे महिलांनीच जोपासली, वृद्धिंगत केली. सुमारे ५० वर्षांपूर्वी दुर्गम पाड्यांवरचे हे कलावैभव शहरी रसिकांसमोर आले. एकेकाळी महिलांची मक्तेदारी असणाऱ्या या कलेत सध्या पुरुषी वर्चस्व निर्माण झालेले जाणवते. आता मोजक्याच महिला वारली चित्रे रंगवताना दिसतात. हा सांस्कृतिक वारसा हिरीरीने पुढे नेणारी रीना उंबरसाडा - वळवी ही अकरा शतकांच्या परंपरेचे समृद्ध, सर्जक प्रतिनिधित्व करते. तब्बल चार वेळा ती फ्रान्सला जाऊन आली आहे. जागतिक महिला दिनानिमित्त तिचा हा अनोखा कलाप्रवास...
छोट्या रीनाची आई जमनीबाई लग्नप्रसंगी वधूवरांच्या झोपडीच्या भिंतीवर लगनचौक लिहायची. हे रेखाटन उत्सुकतेने बघणारी रीना या कलेचा उपजत वारसा लाभल्यामुळे त्यात रमायची. शाळेत असताना हौसेने शुभेच्छापत्रांवर वारली चित्रे रेखाटायची. त्याचे कौतुक व्हायचे. पुढे दहावी उत्तीर्ण झाल्यावर व्यवसायाने वकील असणाऱ्या असूंता पारधी यांनी रीनाला पुण्याला आणले. वसतिगृहात राहून तिने वाडिया कॉलेजमध्ये बारावीपर्यंत शिक्षण घेतले. या दरम्यान व पुढे नंतरही पुण्यातील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्थेत तिच्या चित्रांची प्रदर्शने झाली. त्यांना रसिकांचा भरघोस प्रतिसाद मिळाला. त्यामुळे रीनाचा आत्मविश्वास वाढला आणि तिने वारली कलेतच करिअर करायचे निश्चित केले. शिक्षण घेऊन घरी परतल्यावर तलासरी, खापरोली परिसरात काम सुरू केले. याच सुमारास तिला सुरभी चॅनलच्या स्टुडिओची वारली चित्रांनी सजावट करण्याचे काम मिळाले. ते बघून चेन्नईच्या जस्मिन व सहकाऱ्यांनीही रीनाशी संपर्क साधला. त्यांच्या सहकार्याने रीना सलग तीन वेळा चेन्नईला गेली. तेथे तिची चित्रप्रदर्शने झाली. कार्यशाळा घेऊन तिने अनेकांना वारली चित्रशैली शिकवली. नंतर बंगळुरूला ती सातत्याने १० वर्षे जात राहिली.यातून ती स्वतः घडत गेली, अधिकाधिक पारंगत झाली.
कालांतराने तिचे लग्न वानसिंग वळवी यांच्याशी झाले. त्यांनी तिच्यातील कलावतीला सतत प्रोत्साहन दिले. तिची कला अधिकच बहरत गेली. पती व मुलांच्या आग्रहाने आता पाटीलपाड्यात पक्के घर बांधलेले असले तरी रीनाला कुडाची झोपडीच प्यारी आहे. पती वानसिंग जवळच्याच के. जे. सोमय्या विद्यालयात अधीक्षक आहेत. रीना स्वतः तिची ३ एकर शेती कसते. भात, कडधान्ये पिकवते. चिकू, आंबा,फणस,पपई ही फळझाडे व आयुर्वेदिक औषधी वनस्पती तिने लावल्या आहेत. मुलगी रोहिणी वसईच्या वर्तक महाविद्यालयात बी.एससी.च्या दुसऱ्या वर्षात शिकते आहे. तिलाही आईकडून वारली चित्रकलेचा वारसा मिळाला आहे. मुलगा आश्विन मेकॅनिकल इंजिनिअर झाला आहे. शिवाय त्याने प्रॉडक्ट डिझाइनिंगचा डिप्लोमा केला असून सध्या नोकरीच्या शोधात आहे. रीनाची भारतात पुण्या-मुंबईसह चेन्नई, बंगळुरू,कोलकाता येथे चित्रप्रदर्शने झाली आहेत. दिल्लीच्या क्राफ्ट म्युझियममध्ये तसेच प्रगती मैदानावर झालेल्या तिच्या प्रदर्शनातील चित्रे देशी - परदेशी पर्यटकांनी खरेदी केली,हे सांगताना तिच्या चेहरा अभिमानाने फुलून येतो.
दररोज सुमारे ३ तास शेतात कामे व ५ तास वारली चित्रनिर्मिती यात ती रममाण होते. या व्यग्र दिनक्रमातून वेळ काढून ती बचत गटांच्या महिलांना तसेच इच्छुक मुली, युवतींना वारली कलेचे प्रशिक्षण देते.आपल्या जमातीची कला विस्मरणात न जाऊ देता ती महिलांकडून जोपासली गेली पाहिजे, ही तिची तळमळ आहे. धुंदलवाडी येथील के. जे. सोमय्या शाळेच्या भव्य भिंती रीनाच्या वारली चित्रांनी सजल्या आहेत. त्यासाठी तिला पतीबरोबरच शाळेचे मुख्याध्यापक बाबासाहेब पवार यांचे प्रोत्साहन लाभले. याशिवाय तलासरी जवळची झरी येथील आदिवासी आश्रमशाळा, उपलाट येथील ज्ञानमाता विद्यालय, गुजरातमध्ये धरमपूरचे सेंट झेवियर्स स्कूल यांसह नाशिक जवळच्या देवळाली कॅम्प येथील शाळेत तिने वारली चित्रे रंगवली आहेत. अर्थातच ती सर्व विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या प्रमुख आकर्षणाचे केंद्र झाली आहेत. अनेक विद्यार्थ्यांना देखील रीना वारली चित्रकलेचे विनामूल्य धडे देते. आपली समृद्ध कलापरंपरा टिकवण्यासाठी घराजवळच एक वारली सांस्कृतिक केंद्र निर्माण करण्याचे तिचे स्वप्न आहे. तेथे वारली चित्रांबरोबरच पारंपरिक वस्तू,स्वयंपाकाची भांडीकुंडी, विस्मृतीत जाऊ पाहणारे जाते, उखळ - मुसळ व इतर साधनांचे जतन करण्याचा तिचा मानस आहे. तिचे वारली चित्रणातील कौशल्य बघण्यासाठी अनेक रसिक लांबलांबून पत्ता शोधत तिच्यापर्यंत पोहोचतात. कला- परंपरेची ही सर्जनशील प्रतिनिधी कलेचा हा वारसा नेटाने पुढे नेते आहे.
-संजय देवधर
___________________________________
चार वेळा फ्रान्स दौरा...
फक्त बारावी उत्तीर्ण असलेल्या रीनाला तिच्या वारली चित्रशैलीतील योगदानामुळे तब्बल चार वेळेला फ्रान्स दौऱ्यात सहभागी होण्याची संधी मिळाली. प्रथम २०१५ साली वारली चित्रकार शांताराम तुंबडा व अनिल वांगड यांच्यासमवेत ती फ्रान्समधल्या लिऑन शहरात गेली. तेथील टोनी ग्रानीएर अर्बन म्युझियमच्या सहा मजली भव्य भिंतीवर तुंबडा यांनी १९९३ साली वारली चित्रे रंगवली आहेत.रीना म्हणते की, त्या इमारतीसमोर उभी राहिले तेव्हा मी भारतीय व महाराष्ट्रातील वारली जमातीची प्रतिनिधी आहे या अभिमानाने ऊर भरून आला. दुसऱ्या वर्षी २०१६ मध्ये रीनाबरोबर बिहारच्या मधुबनी व भोपाळच्या गोंड चित्रशैलीतील कलाकार होत्या. तिसऱ्यांदा २०१८ साली गंजाड येथील माणकी वायडा ही वारली चित्रकर्ती आणि राजेश मोर हे वारली कलाकार बरोबर होते. २०१९ मध्ये चौथ्या वर्षी भोपाळच्या गोंड व भिल्ल चित्रशैलीत काम करणाऱ्या दोन महिला तिच्या समवेत होत्या. गेल्या वर्षी कोरोनामुळे ठरलेला दौरा रद्द करावा लागला.चारही वेळेस इतर कलाकार बदलले पण रीना कायम होती. रीनाचे आजोबा म्हणजे आईचे वडील देऊ भावर हे भगत होते. वारली जमातीत त्यांना मानाचे स्थान दिले जायचे. तिचा मामाही भगताचे कार्य करतो. त्याच्याकडे वारली जमातीच्या सामाजिक, सांस्कृतिक माहितीचा,पारंपरिक लोककथांचा मोठा ठेवा आहे. आपल्याला त्यांच्याकडूनच प्रेरणा मिळाली, असे ती अभिमानाने सांगते. रीना भिंतीवर वारली चित्रे रंगवितेच त्याचबरोबर कागद, मांजरपाट, कॅनव्हास, प्लायवूड अशा निरनिराळ्या पृष्ठभागांंवरही ती सहजतेने वैशिष्ट्यपूर्ण चित्रे रेखाटते.आशय - विषयांची विविधताही तिच्या चित्रांमध्ये दिसते. मागील एका लेखात मी खंत व्यक्त केली होती की, एकाही आदिवासी वारली स्त्रीच्या नावावर मानाचा पद्म पुरस्कार नाही. रिनाचे योगदान बघता तिची शिफारस पुढील वर्षीच्या पद्मश्री पुरस्कारासाठी होणे उचित ठरेल.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा