निसर्गाचं गाणं, लोकसंस्कृतीचं लेणं ! निसर्ग व लोकसंस्कृतीप्रेमींसाठी खास लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!





निसर्गाचं गाणं ; लोकसंस्कृतीचं लेणं !


   दुर्गम भागात वस्ती करून उदरनिर्वाह करणाऱ्या अनेक जमाती भारतात आहेत. त्यांना मूलवासी किंवा आदिवासी म्हणून ओळखले जाते. महाराष्ट्रात ठाणे, नाशिक, नंदुरबार, तसेच विदर्भातील काही भाग आदिवासी बहुल आहे. शेजारच्या डांग भागातही आदिवासी मोठ्या संख्येने राहतात. त्यात प्रामुख्याने वारली, कोकणा, कातकरी, गोंड, कोरकू, भिल्ल या जमातींचा समावेश होतो. त्यांच्या जीवनशैलीवर जसा निसर्गाचा प्रभाव आहे, तसाच तो त्यांची लोकगीते, लोककथांवरही आहे. सूर्यचंद्र, डोंगरदऱ्या, पशुपक्षी, झाडंझुडपं, सभोवतालचा परिसर यांचं वर्णन आणि गुणगान त्यात आढळतं. ते त्यांच्या लोकसंस्कृतीचंच कलारूप आविष्करण आहे. वारली चित्रशैलीत तर ते अधिक नितळपणे प्रतिबिंबित होतं. सध्या वसंत ऋतूत जणू सारी सृष्टीचं गाणं गात असते.

    ११०० वर्षांची प्रदीर्घ परंपरा असणाऱ्या वारली चित्रशैलीला बऱ्याचदा लोककथांंचा  आधार असतो. लोकगीतांमधील लय, ताल व विचार चित्रांमध्ये प्रकट होतो. लोकसंस्कृतीची रसरशीत भावानुभूती त्यातून मिळते.आदिवासी वारली जमातीतील कलाकार, विशेषतः स्त्रिया आपल्या झोपडीच्या भिंती चित्रांनी सजवतात. शेण, माती, गेरू यांनी लिंपलेल्या भिंतीवर तांदळाचे पीठ व बांबूची काडी यांनी चित्रे रेखाटली जातात. तयार झालेली ही रेखाटने म्हणजे उच्च दर्जाच्या कलाकृती आहेत, याची जाणीवही त्यांना नसते.आपल्या दैनंदिन जगण्याचाच तो एक भाग आहे असेच ते समजतात. आपण फार काही वेगळी कलानिर्मिती करीत आहोत हा अभिनिवेशही नसतो. उत्स्फूर्तपणे निर्व्याज भावनेने केलेली अशी चित्रे अभ्यासकांपासून सर्वसामान्य कलारसिकांपर्यंत सर्वांनाच मोहून टाकतात,निखळ आनंद देतात. बौद्धिक प्रक्रियेचा अडसर टाळून चैतन्याविष्कार घडविणे हा सर्वच लोककलांचा स्थायीभाव आहे. कालौघात आदिवासी जीवनात तीन प्रमुख स्थित्यंतरे झाली. पहिला कालखंड प्राथमिक- नैसर्गिक अवस्थेत कंदमुळे, फळे खाऊन उदरनिर्वाह करण्याचा होता. दुसऱ्या अवस्थेत ते शिकार करून पोट भरायला लागले. याचवेळी भिंतीवर चित्रे रेखाटायला लागले. त्यानंतर प्रगत होऊन आजच्या तिसऱ्या अवस्थेतील जीवन जगतांना ते दिसतात.लोकगीते, लोककथा यांमध्येही त्याचा आविष्कार झालेला दिसतो. तोच त्यांच्या नृत्य, संगीत, चित्र यात उमटलेला बघायला मिळतो.

     मूळातच अबोल,निरागस असणारे आदिवासी वारली स्त्रीपुरुष संगीत, नृत्य, चित्र या कलांमध्ये रमतात. चित्रांप्रमाणेच लोकगीते, लोककथा यांचा समृद्ध वारसा त्यांना लाभला आहे. गाणी व कथा यांचा कर्ता अनामिक असला तरी त्या व्यक्तीचा आत्माविष्कार त्यात प्रकट होतो.कालांतराने व्यक्तीची निर्मिती जमातीची ठेव बनते.परंपरेने त्यांची गीते होतात. कथा एका पिढीकडून पुढच्या पिढीला सांगितल्या जातात.यातूनच  त्यांना लोकसंचिताचे मूल्य येते. विविध संकेत, रूढी, परंपरा, लोकधर्म यांचे प्रतिबिंब लोकगीते, लोककथा व पुढे कलानिर्मितीत ठळकपणे पडलेले दिसते. वारली जमातीत विविध प्रकारची पारंपरिक लोकगीते आहेत. नागपंचमी सणाच्या वेळी गायली जाणारी गाणी, गौरीच्या सणाची गाणी, कामड व घोर नाचाची गाणी प्रसिद्ध आहेत. वारल्यांचे तारपा नृत्य लोकप्रिय आहे. या नाचात गाणी गायली जात नाहीत. तारप्याच्या सुरावटीवर स्त्रीपुरुष हातात हात गुंफून नृत्य करतात.तारपा या विशिष्ट प्रकारच्या वाद्यावरुन हे नाव प्रचलित झाले आहे. दुधी भोपळ्यापासून तयार करण्यात येणाऱ्या या वाद्याचा आकार काहीसा नागासारखा असतो. गारुड्याच्या पुंगीसारखे पण खर्जातून सूर उमटतात. तारपा वाजायला लागला की वारली स्त्रीपुरुषांचे पाय थिरकायला लागतात. वारल्यांचा समूह फेर धरून नृत्यपदन्यास करतो. बघताबघता रांगेचा सर्पाच्या वेटोळ्यासारखा गतिमान आकृतिबंध निर्माण होतो. नाचणाऱ्यांंचे व बघणाऱ्यांंचेही देहभान हरपून जाते. तारपा नृत्याचे चित्रण वारली चित्रांमध्ये हमखास दिसते. त्यात सूर, ताल, लयीची अनुभूती मिळते. वारली चित्रशैली जगभरात लोकप्रिय होण्यात तारपा नृत्य व त्याच्या चित्रणाची महत्वाची भूमिका आहे.
                                         - संजय देवधर

___________________________________

चंदर सूर्याला नमीन रं...

    वारली लोकसंस्कृतीत निसर्ग हाच परमेश्वर मानतात. त्यांच्या लोकगीतांमध्ये, कथांमध्ये सृष्टीचेच वर्णन, गुणगान केलेले असते. कोणत्याही धार्मिक विधीला प्रारंभ करतांना किंवा नृत्य करण्यापूर्वी प्रथम चंद्रसूर्याला नमन करण्याची वारली जमातीची प्रथा आहे. नंतर वेगवेगळ्या देवदेवतांना व जमलेल्या साऱ्यांना नमस्कार करुन विधीला, नृत्याला सुरुवात करण्यात येते. 'ते नमनगीत' असं आहे...

         पहिला नमीन नमू कोणाला रं

  चंदर सूर्याला नमीन, चंदर सूर्याला रं

   दुसरा नमीन नमू कोणाला, नमू कोणाला

    धरतरी मातेला नमीन, धरतरी मातेला रं

   तिसरा नमीन नमू कोणाला, नमू कोणाला

  कणसरी मातेला नमीन, कणसरी मातेला रं

    चौथे नमीन नमू कोणाला,नमू कोणाला

   गावतरी मातेला नमीन, गावतरी मातेला रं

    पाचवे नमीन नमू कोणाला, नमू कोणाला

         सभा बैठकीला रं, साऱ्या पाड्याला...

   या एका पारंपरिक लोकगीतातून निसर्गाची विविध रूपे समोर येतात. त्यांचे निसर्गप्रेम, सृष्टीविषयीची श्रद्धा, संस्कृतीविषयी वाटणारा आदरभाव, देवदेवतांच्या विविध प्रतिमांंचे स्वरूप याविषयी त्यांनी केलेले हे गुणगान म्हणजे निसर्गाचं गाणं आहे.वारली नृत्य, संगीत व चित्रशैली ही सारी लोकसंस्कृतीची श्रीमंत लेणी आहेत, हेच यातून अधोरेखित होतं.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !