सावरकरांची अनेक वैशिष्ट्ये अपरिचित  - प्रा. डॉ. गिरीश पिंपळे . सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!


सावरकरांची अनेक वैशिष्ट्ये अपरिचित


 - प्रा. डॉ. गिरीश पिंपळे 

 नाशिक ( प्रतिनिधी )- सावरकरांचे नाव उच्चारले की आपल्याला अंदमानमध्ये त्यांनी सहन केलेल्या छळाची, त्यांच्या कवितांची , त्यांनी समुद्रात मारलेल्या उडीची किंवा माझी जन्मठेप या ग्रंथाची आठवण होते. पण त्यांचे व्यक्तिमत्व इतके मर्यादित नाही. त्यांची अनेक वैशिष्ट्ये समाजापुढे ठळकपणे आलेली नाहीत , ती अपरिचित राहिली आहेत असे प्रतिपादन नाशिक येथील सावरकर अभ्यासक डॉ. गिरीश पिंपळे यांनी नुकतेच केले. 

    सावरकर आत्मार्पण दिनानिमित्त समर्थ भारत मंचाने आयोजित केलेल्या आभासी कार्यक्रमात प्रा. डॉ. गिरीश पिंपळे ‘अपरिचित सावरकर’ या विषयावर  बोलत होते. विशेष म्हणजे समर्थ भारत मंच ही दृष्टीबाधित बांधवांनी स्थापन केलेली राष्ट्रीय पातळीवरची संस्था आहे. आपण राष्ट्राचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून ही संस्था काम करीत आहे. सुरवातीला मंचाचे प्रमुख कार्यकर्ते  संदेश नारायणे यांनी सर्वांचे स्वागत केले. 

पिंपळे यांनी सावरकरांच्या एकूण पाच अपरिचित पैलूंचा आपल्या भाषणात अतिशय प्रभावीपणे वेध घेतला. सावरकर हे द्रष्टे, भाषाशुद्धीचे पुरस्कर्ते, विज्ञानवादी, कर्ते समाजसुधारक आणि आत्मचिंतक नेते होते असे त्यांनी सांगितले आणि या मुद्द्यांच्या अनुषंगाने ओघवत्या शैलीत आपला विषय पुढे नेला. 

    स्वतंत्र भारताचे संरक्षण आणि परराष्ट्र धोरण कसे असले पाहिजे याबाबत सावरकरांंनी अतिशय मोलाचे मार्गदर्शन करून देशाला वेळीच सावध केले होते याची अनेक उदाहरणे पिंपळे यांनी दिली. सावरकरांची जी उपेक्षा झाली त्याची मोठी किंमत देशाने मोजली असल्याचे सांगितले. मराठी भाषेला सावरकरांंनी  अनेक नवीन शद्ब दिले हे ही त्यांनी अनेक दाखले देऊन स्पष्ट केले. एकाबाजूला हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या सावरकरांंनी भ्रामक समजुतींवर तडाखे मारले आणि समाजसुधारणेची चळवळ मोठ्या निर्धाराने चालविली. त्यांचे विचार प्रखर विज्ञानवादी होते आणि ते पटणे आणि पचणे खूप अवघड असल्याचे मत ही त्यांनी मांडले. भाषणाच्या शेवटच्या भागात गिरीश पिंपळे यांनी सावरकरांनी केलेल्या आत्मचिंतनाबाबत उहापोह केला. सावरकरांच्या मृत्युपत्रातला काही भाग त्यांनी वाचून दाखवला आणि त्यांचा विज्ञानवाद अधोरेखित केला. सावरकर हे जिवंत  असताना बुद्धिवादी होते आणि मृत्यू नंतरही बुद्धिवादीच होते असे अर्थपूर्ण उद्गार काढून पिंपळे यांनी भाषणाचा समारोप केला. नंतर प्रश्नोत्तरांचाही कार्यक्रम झाला. 

वक्त्यांचा परिचय बडोदे येथील नामदेव गरुड यांनी करून दिला तर नचिकेत नारायणे यांनी सूत्रसंचालन केले. या आभासी व्याख्यानाचा अनेक सावरकरप्रेमींनी व जिज्ञासूंनी लाभ घेतला.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !