रेषांमधला आनंददायी 'मुक्तछंद' ! मार्केट विस्तारले ! सौन्दर्य हरवू नये ! संपूर्ण लेख वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा !!





रेषांमधला आनंददायी 'मुक्तछंद'


   आदिवासी वारली जमात दुर्गम पाड्यांवर पूर्वापार राहते. निसर्गाशी एकरूप होऊन पर्यावरण रक्षण करणारे स्त्रीपुरुष मुक्तपणे जगतात. स्वच्छंदी, स्वतंत्र जीवनाची त्यांना उपजतच आवड आहे. पोटापाण्यासाठी शेती करणे, दिवसभर रानावनात मनसोक्तपणे भटकंती करणे, मासे पकडणे असे मनमोकळे जगायला त्यांना आवडते.सण- उत्सव, विविध देवदेवतांचे पूजाविधी, लग्नसोहळे,सामूहिक नृत्य यात ते मनापासून रममाण होतात. याच स्वच्छंदी जीवनाचे प्रसन्न, आनंदी प्रतिबिंब त्यांच्या वारली चित्रशैलीत स्पष्टपणे उमटलेले दिसते.रेषांमधला हा आनंददायी ' मुक्तछंद ' वारली चित्रांमध्ये सहजपणे अनुभवता येतो.


    आदिवासी वारली जमात ठाणे जिल्ह्यातील पाड्यांपासून गुजरातच्या सीमारेषेपर्यन्त पसरलेली आहे. ठाणे जिल्ह्यात १० वन्य जमाती असून त्यात वारली बहुसंख्येने राहतात. डहाणू, पालघर, जव्हार, मोखाडा, तलासरी, सिल्वासा, दीव - दमण, दादरा - नगरहवेली या भागात तसेच नाशिक जिल्ह्यातील पेठ, सुरगाणा, नंदुरबार जिल्ह्यात व डांग परिसरात वारल्यांची वस्ती आहे. वारली चित्रशैलीला तब्बल ११०० वर्षांची प्रदीर्घ परंपरा असल्याचे इतिहास सांगतो. वारली जमातीविषयी डॉ. विल्सन, डॉ.लँथेम, डी. सेमीन्गटन, भास्कर कुलकर्णी, मधुकर सावे, डॉ. गोविंद गारे, श्रीमती नारगोळकर, श्रीमती परुळेकर व इतर अनेकजणांनी अभ्यासपूर्ण लेखन केले आहे. त्यातून वारल्यांच्या बदलत्या जीवनशैलीचे स्वरूप लक्षात येते. आधुनिक जीवनपध्दतीच्या प्रभावामुळे आदिवासी संस्कृती बदलत चालली आहे. त्याचा विपरीत परिणाम त्यांच्या आदर्श, निसर्गस्नेही जीवनशैलीवर झालेला दिसतो. त्यांच्या विविध कलांमध्येही आधुनिकतेची भेसळ होताना आढळते.असे असले तरी देखील त्यांच्यातील पारंपरिक साधेपणा, स्वाभाविक निरागसता, प्रामाणिकपणा मात्र कायम आहे; म्हणूनच त्यांची चित्रशैलीही साधीसोपी असते.आकारांचे सुलभीकरण करून ते सहजपणे व्यक्त होतात. जीवनातील अनेक अडचणींवर यशस्वीपणे मात करुन कलानिर्मितीचा निखळ आनंद घेतात. त्यांच्या स्वच्छंदी जीवनाचे  प्रतिबिंब अलगदपणे नृत्य, संगीत व चित्रकलेत उमटते.  चित्रांमध्ये तर ते अधिकच प्रकर्षाने जाणवते.मोकळे आकाश, झुळझुळ वाहणारे झरे, हिरवागार निसर्ग, मुक्त पशुपक्षी यांच्याप्रमाणेच वारली संस्कृती प्रसन्न, आनंदी आहे. ते स्वतःला कलाकार मानतच नाहीत. अज्ञात शक्तीने आपल्या माध्यमातून कलानिर्मिती करवून घेतली अशीच त्यांची भावना असते.त्यामुळेच चित्राचे श्रेय स्वतःकडे घेत नाहीतच चित्रावर सही देखील करत नाहीत. 


   चित्रातील प्रत्येक आकृतीमध्ये प्राण असल्याचे ते मानतात. मग ती माणसे असोत की पशुपक्षी ! मधमाशी नष्ट झाली तर मानवजात संपेल, असे शास्त्रज्ञ सांगतात. जीवनचक्रात कीटकांचेही महत्त्व आहे हे ज्ञान त्यांना असून आदिवासी परंपरेनेच हे मर्म ते जाणतात. जैवविविधता टिकली तरच निसर्गसाखळी अबाधीत राहील याचेही भान  त्यांना आहे.म्हणूनच त्यांच्या चित्रांमध्ये क्षुल्लक कीटकांनाही स्थान आहे. मुळातच अबोल असल्याने शब्दांऐवजी रेषा, आकार वापरून चित्रमाध्यमातून ते  व्यक्त होतात. वारली चित्रशैली अभ्यासताना त्यांची आगळीवेगळी संस्कृती, परंपरागत जीवनशैली, अकृत्रिम राहणीमान, सकारात्मक दृष्टिकोन आणि एकूणच त्यांची मानसिकता समजून घेणे अगत्याचे ठरते. कारण वारली चित्रातील विषय, आशय, संदर्भ यांचे नाते त्यांच्या समग्र जीवनाशी निगडित आहे. निसर्ग हेच त्यांचे स्फूर्तिस्थान असून प्रथा - परंपरा, श्रद्धा यातून वारली चित्रे आकार घेतात. वारली चित्रात नेहमीच सकारात्मक विषय हाताळलेले दिसतात. भांडणतंटा, कलह, मारामाऱ्या अपप्रवृत्ती यापासून वारली चित्रशैली कायमच कटाक्षाने दूर राहिलेली आहे.नकारात्मक भावना ते निग्रहाने टाळतात. चित्रातील रेषा नेहमीच खालून वर विकसित होत जाणाऱ्या काढतात. त्यांच्या मते वरुन खाली येणारी रेषा विनाश दाखवते.सुबध्द रचना असलेल्या वारली चित्रशैलीत लोककलेचा संस्कार ठळकपणे जाणवतो.मूलभूत जैविक प्रेरणेने व मोकळ्या निसर्गाच्या सतत असणाऱ्या सान्निध्यातून झालेला आदिवासी कलाविष्कार बघणाऱ्यांना भावतो.जीवनाशी घट्ट नाते असल्याने त्यातील सजीवता प्रकर्षाने जाणवते. म्हणूनच रेषांमधला आनंददायी 'मुक्तछंद' कलाप्रेमी रसिकांना कायमच हवाहवासा वाटतो.

                                         -संजय देवधर

___________________________________

  मार्केट विस्तारले;  सौन्दर्य हरवू नये !

    अलिकडे झालेल्या दळणवळणाच्या सोयींनी आदिवासी पाडे पूर्वीसारखे दुर्गम राहिलेले नाहीत. मोबाईलने सारे विश्व जवळ आणलेय. गुगलमुळे सारे काही जणु मुठीत सामावले आहे. परिणामी नागरी व आदिवासी संस्कृतीतील अंतर कमी होत आहे. शहरी कलासंस्कृती, कलाकार तसेच आदिवासी जमातीच्या कलाशैली यांच्यातला परस्पर संवाद वाढतोय. परिणामतः आदिवासींच्या कलानिर्मितीचा,जीवनाचा निसर्गाशी जो अन्योन्य संबंध होता; तो दिवसेंदिवस  दुरावत चाललाय. कलात्मकतेला शहरी वळणाचा स्पर्श झाल्याने अभिव्यक्तीची मूळ वैशिष्ट्ये काही अंशी 'नागरी' चेहरा धारण करू लागली आहेत! त्यांच्या आविष्काराला उपयोजित कलेचे स्वरूप येतेय. रिमिक्स, फ्युजन, नवीन प्रयोग या नावांखाली वारली चित्रांमध्ये होणारी ही सरमिसळ आस्वादकाला विशुद्ध आनंद देण्यात कमी पडते आहे, असे वाटते. शहरातील हॉटेल्स, मॉल्स, वास्तुसंकुले येथे वारली चित्रांचा सजावटीसाठी मोठ्या प्रमाणावर होताना दिसतोय. थोडक्यात वारली कलेचे 'मार्केट' विस्तारतेय.मात्र अशा विस्ताराने मुळातला  निर्मळ विचार संपू नये; कलेचा सच्चेपणा, मूळ स्वरूप व सौंदर्य टिकले पाहिजे. ती संबंधित साऱ्यांचीच जबाबदारी आहे,असे आवर्जून नमूद करावेसे वाटते


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर-२०२४ च्या उद्घाटन समारंभातून उमटलेला सूर, सुंदर व निसर्गाचे वरदान लाभलेल्या प्रगतीशील नाशिकची सर्वांना पडते भुरळ !