अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे यांची जिल्हापरिषदेला भेट ! जलजीवन मिशनचा घेतला आढावा ! महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविणे हे प्रमुख ध्येय ठेवुन जलजीवन मिशन योजना जिल्हयात राबविण्यात येत आहे- मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड ! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!
नाशिक – राज्याच्या पाणी व स्वच्छता विभागाचे अपर मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे यांनी आज जिल्हा परिषदेला भेट देऊन जलजीवन मिशन अंतर्गत सुरु असलेल्या कामकाजाबाबत आढावा घेतला. तसेच ग्रामपंचायतींमधील ग्रामसेवकांकडील पाणी पुरवठयाच्या नमुना नंबर ९ नुसार नळ कनेक्शनची स्वत: शासन संकेतस्थळावर पडताळणी केली.
स्वच्छ भारत अभियान टप्पा २ अंतर्गत नाशिक पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या मित्रा या प्रशिक्षण केंद्रात केंद्र शासनाच्या पेयजल व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त सचिव अरुण बरोका यांच्या उपस्थितीत आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले हेाते. या बैठकीसाठी आलेल्या डॉ. संजय चहांदे यांनी जिल्हा परिषदेला भेट देऊन जलजीवन मिशन व स्वच्छ भारत अभियान टप्पा-२ अभियानाचा आढावा घेतला. जलजीवन मिशन अंतर्गत राज्यामध्ये घरोघरी नळजोडणी करण्यात येत आहे. या कामाबाबत त्यांनी आढावा घेत ऑनलाईन करण्यात आलेल्या माहितीची ग्रामपंचायतीकडील नमुना नंबर ९ नुसार पडताळणी केली. यावेळी यादृच्छिक पध्दतीने जिल्हयातील १० ग्रामपंचायतींमधील ग्रामसेवकांना जिल्हा परिषदेत बोलावून नमुना नंबर ९ वरील नळकनेक्शन धारकांच्या नोंदी व केंद्र शासनाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन करण्यात आलेल्या नोंदी यांची पडताळणी केली.
यावेळी शाळा व अंगणवाडीमध्ये नळजोडणीचे काम पुर्ण करण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या. ३ ऑगस्ट २०२० च्या पाणी पुरवठा योजनासंबंधीच्या शासन परिपत्रकानुसार अ व ब मधील योजनांच्या कार्यवाहीबाबत १५ लाखापेक्षा जास्त रकमेच्या अंदाजपत्रकांची पडताळणी करुन योजनांची कामे कार्यान्वित करण्याच्या सुचना दिल्या. १५ व्या वित्त आयोगामधील बंधित नीधीबाबत २९ नोव्हेंबर २०२० च्या शासन निर्णयानुसार वैयक्तिक नळ कनेक्शनबाबत ग्रामपंचायतींनी आवश्यक कार्यवाही तातडीने पुर्ण करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड यांनी महिलांच्या डोक्यावरील हंडा उतरविणे हे प्रमुख ध्येय ठेवुन जलजीवन मिशन योजना जिल्हयात राबविण्यात येत असल्याची ग्वाही दिली. यावेळी धुळे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., राज्य पाणी व स्वच्छता मिशनचे प्रकल्प व्यवस्थापन सनियंत्रण गणेश वाडेकर, पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंता सुनंदा नरवाडे यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा