सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन ही काळाची गरज ! देशभरात सर्वात जास्त महाराष्ट्रात कचरा निर्माण होतो-प्रा.दिक्षित ! एचएएलचा सीएसआर निधी काही ग्रामपंचायतींना घनकचरा व्यवस्थापनासाठी मिळणार-डाँ.नरेश गिते !!! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!!
नाशिक – स्वच्छ भारत अभियान राबविताना शौचालयाबरोबरच सांडपाणी घनकचरा व्यवस्थापन ही काळाची गरज असून ग्रामीण भागात स्वच्छतेविषयक काम करताना यापुढे सांडपाणी घनकचरा व्यवस्थापनावर अधिक भर देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने आपल्या ग्राम विकास आराखड्यातील निधीतून यासाठी खर्च करून स्वच्छ व सुंदर गाव तयार करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. नरेश गिते यांनी केले.
जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागाच्या वतीने आज महिरावणी जवळील संदीप फाउंडेशन येथे गोदाकाठावरील ग्रामपंचायती व रूरबन प्रकल्पातील ग्रामपंचायतीमधील सरपंच, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, उप अभियंता यांच्यासाठी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन या विषयावर एकदिवसीय कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. कार्यशाळेस आय.आय.टी. मुंबई येथील प्रा. इंद्र्कांत झा, प्रा. अनिल दीक्षित, प्रा. प्रशांत पाटील आदि उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ गिते यांनी सांडपाण्यामुळे गोदावरी नदी प्रदूषित होत असून ग्रामीण भागातील गोदाकाठावरील सर्व ग्रामपंचायतीमध्ये सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प राबवून नदीचे प्रदूषण कमी करण्यासाठी काम करण्यात येणार असल्याचे सांगितले. यासाठी एच.ए.एल. कारखाना काही गावांसाठी सि.एस.आर. मधून निधी उपलब्ध करून देणार असल्याचेही त्यांनी सांगितले. जिल्ह्यात ग्राम विकास आराखड्यातून चांगले काम करण्यात आले असून ग्रामपंचायतीनी या आराखड्यातील निधी रस्ते, नाले, इमारती यावर खर्च करण्यापेक्षा सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनावर खर्च केल्यास गावाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होणार असल्याचे डॉ. गिते यांनी सांगितले.
आय.आय.टी. मुंबई येथील प्रा. इंद्र्कांत झा यांनी सांडपाणी व्यवस्थापन याबाबत मार्गदर्शन करताना देशातील सांडपाणी प्रक्रियेची माहिती दिले. सांडपाण्यामुळे पर्यावरणाचे मोठे नुकसान होत असून मानवाला जगण्यासाठी पर्यावरण महत्वाचे असल्याचे याबाबत अधिक जागरूकता निर्माण कारणे आवश्यक आहे. यावेळी त्यांनी सांडपाणी व्यवस्थापणासाठी तयार केलेल्या प्रकल्पाची माहिती देवून पर्यावरणपूरक सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प याविषयी माहिती दिली. तसेच आय.आय.टी. मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप फाउंडेशन येथे राबविण्यात आलेल्या प्रकल्पाची माहिती दिली.
प्रा. अनिल दीक्षित यांनी घनकचरा व्यवस्थापन याबाबत विस्तृत माहिती देताना एका आकडेवारीनुसार देशात निर्माण होणाऱ्या कचऱ्यापैकी केवळ १८ टक्के कचऱ्यावरच प्रक्रिया केली जात असल्याचे सांगितले. देशात महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात कचरा निर्माण होतो मात्र शहरांमध्ये केवळ कंपोस्ट आणि डंपिग एवढीच प्रक्रिया केली जाते. कचऱ्यापासून वीज देखील तयार करता येते. सुका आणि ओला कचरा यांचे व्यवस्थापन कसे करावे याबाबत तसेच देशात विविध ठिकाणी राबविण्यात आलेल्या प्रकल्पांची त्यांनी यावेळी माहिती दिली.
करमाळा येथील महात्मा फुले सामाजिक संस्थेचे सचिन झिंझाडे यांनी सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पासाठी आवश्यक असणाऱ्या लोकसहभागाचे महत्व स्पष्ट केले. सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन हा महत्वाचा विषय असूनही याकडे दुर्लक्ष झाले असून यापुढे ग्रामीण भागात यासाठी काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यशाळेचे प्रास्ताविक करताना पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे यांनी स्वच्छ भारत अभियान अंतर्गत गोदाकाठावरील ग्रामपंचायतीसाठी तसेच दाभाडी रूरबन प्रकल्पातील गावांसाठी साठी सांडपाणी व घनकचरा प्रकल्प गरजेचा असून यासाठी काम करण्यात येत आहे. स्वच्छ भारत अभियान अंतर्गत शाश्वत स्वच्छतेमध्ये यापुढे प्रत्येक गावात सांडपाणी व घनकचरा यावर काम करणायत येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी संदीप फाउंडेशन येथे राबविण्यात आलेल्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला भेट देवून त्याची माहिती देण्यात आली. सायंकाळी डॉ नरेश गिते यांनी सर्वांशी संवाद साधत विविध घटकांबाबत चर्चा केली. कार्यशाळेस एच.ए.एल. चे अधिकारी श्री चंदेल. श्री साहू यांच्यासह सर्व गट विकास अधिकारी, उप अभियंता, सरपंच, ग्रामसेवक, गटसमन्वयक, जिल्हा कक्षातील कर्मचारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा