दीघ्या तुझा पोलीसांवर भरवसा हाय काय ? न्यूज मसालाच्या रसिकांसाठी खास दीनानाथजी यांजकडून, उत्तरासाठी खालील लिंकवर क्लिक करा अथवा १८ आक्टोंबरला येतोच आहे !!!
दीनानाथजी यांजकडून [ मनोरंजन प्रतिनिधी ]
‘मी शिवाजी पार्क’ मध्ये‘भरवसा हाय काय…’ गाण्याची धमाल
पूर्वीच्या काळी जशी नॉन फिल्मी कॅसेट्स किंवा रेकार्ड्समध्ये गाजलेली काही गाणी सिनेमातही ऐकायला मिळायची. आजही ती परंपरा सुरू आहे. केवळ माध्यमं बददली आहेत. आजच्या काळात यूट्युबवर गाजलेली काही गाणी सिनेमांच्या माध्यमांतून घराघरात लोकप्रिय होत आहेत. दिग्दर्शक महेश वामन मांजरेकर यांच्या‘मी शिवाजी पार्क’ या सिनेमातही असंच एक गाजलेलं गाणं ऐकायला मिळणार आहे. सोशल मीडियासह सर्वच ठिकाणी लोकप्रिय झालेल्या ‘सोनू तुझा माझ्यावर भरवसा नाय काय’ या गाजलेल्या गाण्याचं विडंबन ‘मी शिवाजी पार्क’ या चित्रपटात पहायला मिळणार आहे. ‘गौरी पिक्चर्स प्रोडक्शन’ व ‘महेश मांजरेकर मूव्हीज’चा ‘मी शिवाजी पार्क’ हा चित्रपट येत्या १८ ऑक्टोबरला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय.
‘सोनू तुझा माझ्यावर भरवसा नाय काय’या गाण्याचं महानगर पालिकेच्या कारभारावर भाष्य करणारं विडंबनही खूप गाजलं. प्रसिद्ध गीतकार श्रीरंग गोडबोले यांनी आता या गाण्याचं आणखी एक विडंबन केलं आहे. ‘मी शिवाजी पार्क’ या चित्रपटासाठी श्रीरंग गोडबोले यांनी ‘दीघ्या तुझा पोलिसांवर भरवसा ‘हाय काय’ हे गीत लिहिलं आहे. या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणाऱ्या अशोक सराफ, विक्रम गोखले, शिवाजी साटम, सतिश आळेकर आणि विद्याधर जोशी यांच्यासह महेश मांजरेकर यांनी हे गीत गायलं आहे. गायक-संगीतकार अजित परबने या गीताला स्वरसाज चढवला आहे.
‘मी शिवाजी पार्क’ हा सिनेमा वर्तमानकाळात घडणाऱ्या वास्तव घटनेवर प्रकाश टाकणारा असल्याने अशा प्रकारच विडंबनात्मक काव्य करण्याची कल्पना सुचली आणि‘भरवसा हाय काय…’ हे गाणं या चित्रपटात आल्याचं मांजरेकर सांगतात. या चित्रपटात पाच ज्येष्ठ नागरिकांची गोष्ट आहे. या प्रत्येक अभिनेत्याच्या आवाजाची वेगळी ओळख आहे. प्रोफेशनल गायकांच्या आवाजात हे गाणं जर रेकार्ड केलं असतं, तर यांच्या आवाजाची जादू गाण्यात उतरवता आली नसती. यासाठी हे गाणं चित्रपटातील कलाकारांसोबतच ध्वनीमुद्रित करण्यात आल्याचंही मांजरेकर म्हणाले. अशोक सराफ, महेश मांजरेकर यांसारख्या कलाकारांनी पार्श्वगायन करण्याची ही पहिलीच वेळ नसली तरी इतर कलाकारांच्या आवाजात एखादं गाणं ऐकणं ही मात्र प्रेक्षकांसाठी नावीन्यपूर्ण गोष्ट ठरणार आहे. हाच या गाण्याचा मुख्य युएसपी आहे.
या सिनेमाची निर्मिती दिलीपदादा साहेबराव यादव व सिद्धार्थ केवलचंद जैन यांची असून मंगेश रामचंद्र जगताप, शंकर रामेश्वर मिटकरी, भरत छगनलाल राठोड, मिलिंद सीताराम वस्ते या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. या चित्रपटाची कथा-पटकथा, दिग्दर्शन महेश मांजरेकर यांचे आहे. तर संवाद अभिराम भडकमकर यांनी लिहिले आहेत. छायांकन करण रावत यांचे असून संकलन सर्वेश परब यांनी केले आहे.
१८ ऑक्टोबरला ‘मी शिवाजी पार्क’ सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा