२०२२ पर्यंत सर्वांना घर देण्याचा संकल्प- पंतप्रधान नरेंद्र मोदी. सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!

देशात चार वर्षात सव्वा कोटी घरांची निर्मिती

2022 पर्यंत सर्वांना घर देण्याचा संकल्प

:पंतप्रधान नरेंद्र मोदी

शिर्डी, दि. 19:- देशातील बेघरांना सन 2022 पर्यंत सर्वांसाठी घर देण्याचा संकल्प सरकारने केला असून गेल्या 4 वर्षात सव्वा कोटी घरांची मुलभूत सोईसुविधांसह निर्मिती करण्यात आली असल्याचे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

            शिर्डी येथे साई समाधी शताब्दी सोहळ्याचा समारोप, संस्थानच्या विविध प्रकल्पाचे भूमिपूजन आणि राज्यातील अडीच लाख घरकुलांच्या लाभार्थींना घरकुलाच्या चावीचे वितरण आणि राज्यातील इतर लाभार्थ्यांच्या ई-गृहप्रवेश कार्यक्रम प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला राज्यपाल विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष हरिभाऊ बागडे,ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, पालकमंत्री प्रा.राम शिंदे, नगरविकास राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील, ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे,विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील,  खासदार रावसाहेब दानवे, दिलीप गांधी, सदाशिव लोखंडे, आमदार शिवाजीराव कर्डिले, बाळासाहेब मुरकुटे, स्नेहलता कोल्हे, मोनिका राजळे, श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्थेचे अध्यक्ष सुरेश हावरे आदी उपस्थित होते.

            पंतप्रधान मोदी म्हणाले, देशातील सर्वसामान्यांना विश्वास वाटावा असे काम केंद्र आणि राज्य सरकारने गेल्या 4 वर्षांत केले आहे. सर्वसामान्यांना आधार देणारी घरकुल योजना, आरोग्यासाठी प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, आयुष्यमान भारत, स्वच्छ भारत अभियानाच्या माध्यमातून जनतेच्या हिताची कामे करण्यात आली. याशिवाय, उज्ज्वला योजना, सौभाग्य योजनेच्या माध्यमातून गरीबांना गॅस आणि वीज देण्याचे काम केल्याचे त्यांनी सांगितले. स्वच्छ भारत अभियानाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर असल्याबद्दल त्यांनी राज्य शासन आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे तसेच राज्यातील 11 कोटी नागरिकांचे कौतुक केले.

            प्रधानमंत्री श्री. मोदी म्हणाले, स्वत:च्या घराचं स्वप्नं बघणाऱ्या लाखो कुटुंबांना चांगले घरकुल विजयादशमीची भेट आहे. घरकुलाच्या माध्यमातून गरिबीवर मात करण्याच्या दिशेने प्रवास सुरू झाला आहे. देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असताना सर्व नागरिकांना घरे देण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. सन 2022 पर्यंत सर्वांना घरे देण्याचा संकल्प करीत असताना ही घरे तुलनेने मोठ्या आकाराची आणि सर्व सोईनेयुक्त देण्यात येत आहेत. त्यासाठी दिले जाणाऱ्या अनुदानात 70 हजारावरून आता 1 लाख 20 हजार इतकी वाढ कऱण्यात आली आहे. ही रक्कम थेट लाभार्थींच्या बॅंक खात्यात जमा करण्यात येत असून लाभार्थ्यांची निवड पारदर्शकतेने करण्यात येत आहे.

गरिबांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. गरिबांच्या कल्याणासाठी सुरु कऱण्यात आलेल्या प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेचा लाभ देशातील 50 कोटी नागरिकांना मिळणार आहे. आतापर्यंत देशातील एक लाख रुग्णांना योजनेचा लाभ देण्यात आला असून प्रत्येक रुग्णामागे सरासरी 20 हजार रुपये खर्च झाले आहे, असे त्यांनी सांगितले.

            महाराष्ट्रात यावर्षी पाऊस कमी झाल्याने काहीशी चिंता आहे. प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या माध्यमातून  शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्यात येईल. तसेच राज्य शासनाद्वारे करण्यात येणाऱ्या उपाययोजनांसाठी ही केंद्र शासन भरीव मदत करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. प्रधानमंत्री कृषी सिंचाई योजनेअंतर्गत राज्यात विविध प्रकल्पांची कामे करण्यात येत आहे. जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून 16 हजार गावे टंचाईमुक्त झाली असुन 9 हजार गावात कामे सुरू असल्याचे ते म्हणाले. राज्याने या योजनेच्या अंमलबाजवणीत चांगली कामगिरी केल्याचेही त्यांनी सांगितले.

            शेतकऱ्यांच्या पीकांना दीडपट हमीभाव देण्याचा निर्णय शासनाने घेतला असून त्याचा अनेक शेतकऱ्यांना लाभ झाल्याचे त्यांनी  नमूद केले.

            शिर्डीसारखे धार्मिक स्थळ तर अजिंठा वेरुळ सारखा ऐतिहासिक वारसा देशाला लाभला आहे. आस्था, आध्यात्म आणि इतिहासाची सांगड पर्यटनाशी घालून रोजगार निर्मितीला चालना देण्यात येत असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले. टुरिझम सर्कीटच्या माध्यमातून पर्यटनाला चालना देताना शिर्डी येथील पर्यटनाला चालना देण्यासाठी विमानसेवेचा विस्तार करण्यात येईल, असेही ते म्हणाले.

कोट्यावधी लोकांची सेवा करण्याची आणि जनसेवेप्रती समर्पित होण्याची प्रेरणा साईबाबांच्या सेवा संदेशातून मिळते. सर्व समाजाला एका सुत्रात बांधण्याचे सामर्थ्य त्यांच्या ‘सबका मालिक एक’ या मंत्रात असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी सांगितले.

             शिर्डी संस्थानच्या दर्शन रांग इमारतीचे भूमीपूजन, शैक्षणिक संकुल, 10 मेगावँट सौरऊर्जा प्रकल्प आणि साईसृष्टी प्रकल्पाचा शुभारंभही यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते झाला. यावेळी संस्थानच्या वतीने साई प्रतिमा असणारे चांदीच्या नाण्याचे अनावरण व लोकार्पण पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. प्रातिनिधीक स्वरुपात एक नाणे संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल यांना देण्यात आले.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

।। राम नाम उच्चरा.. जन्माचे सार्थक करा.।।

राष्ट्र उभारणी मध्ये बांधकाम व्यवसायिकाचे मोलाचे स्थान -बोमन इराणी

शेल्टर -2024 ला उदंड प्रतिसाद,,,,,,,,, सुटी चे औचित्य साधून उद्या साईट विझिट चे अनेकांचे नियोजन !