थर्माकोल विक्रेत्यांना उच्च न्यायालयाचा दिलासा नाही, ! समाजहितासाठी बंदी आवश्यकच !! सविस्तर बातमीसाठी खालील लिंकवर क्लिक करा !!!
इको फ्रेंडली‘उत्सवी’नानासाहेब शेंडकरांच्या लढ्याला यश!
थर्माकोलविक्रेत्यांना उच्च न्यायालयाकडून दिलासा नाही,समाज हितासाठी बंदी आवश्यक –
मुंबईतील थर्माकोल फॅब्रिकेटर अॅन्ड डेकोरेटर्स असोसिएशनची विनंती फेटाळून लावत उच्च न्यायालयाने थर्माकोल बंदी कायम केली आहे. त्यामुळे थर्माकोल विक्रेत्यांना न्यायालयाकडून कोणताही दिलासा मिळालेला नाही. ‘पर्यावरणाला हानिकारक अशा वस्तूंना परवानगी देणे शक्य नाही’, असे स्पष्टीकरण उच्च न्यायालयाने याविषयी दिले आहे. तर बंदी संदर्भातील सविस्तर आदेश याआधीच दिलेले असून, विल्हेवाट लावण्यासाठी पुरेसा वेळ दिलेला आहे असेही उच्च न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.
पर्यावरणाला हानी पोहचविणाऱ्या वस्तूंचा विरोध गेली ३२ वर्षे सातत्याने नानासाहेब शेंडकर करीत आहेत. अत्यंत कष्टातून जेजे महाविद्यालयात कलेचे शिक्षण घेऊन नानासाहेब शेंड्कारांनी कलासाधना जोपासली आहे. गेली पन्नास वर्षे ते कलाक्षेत्रात भरीव योगदान देत आहेत. त्यांच्या 'aaartist' या संस्थेद्वारे कलेचे विविध पैलू ते घडवीत आहेतच पण त्यासोबतच ‘उत्सवी’ संस्थेच्या वतीने समाजासाठी अत्यंत महत्वाचे कार्य त्यांनी केले आहे. समाजात पर्यावरण पोषक भान टिकवण्याच्या दृष्टीने जागरुकता निर्माण करण्याच्या हेतूने त्यांनी सुरु केलेल्या पर्यावरणवादी लढ्याला, त्यांच्या भूमिकेला सरकारने पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या वस्तूवरील बंदी जाहीर करून उचित न्याय दिला आहे.
२००१ साली नानासाहेब शेंडकर यांनी आपला दोन एकरातील, १०० हुन अधिक कामगार - कारागीर यांच्या सोबतीने उभा केलेला सुमारे‘१० कोटी रुपयांची गुंतवणूक असलेला ‘थर्माकोल डेकोरेशन निर्मितीचा कारखाना’ ऐन मागणी असताना बंद करून पर्यावरण पुरक ‘इको फ्रेंडली डेकोरेशन’चा डोळस वसा घेत समाजासुखाकरिता एक महत्वाचा निर्णय घेतला. खरंतर त्यांनीच थर्माकोल निर्मितीचे तंत्रज्ञान विकासिक करून जवळपास १५० ते २०० प्रकारची मखरे बाजारात आणली होती. पण ज्या क्षणाला त्यांना थर्माकॉल पासून होणाऱ्या दुष्परिणामांची जाणीव झाली त्याक्षणाला कोणत्याही परिणामांचा विचार न करता तडकाफडकी हा कारखाना बंद करण्याचा निर्णय घेऊन नानासाहेबांनी पैसा – सुबत्तेच्या ऐश्वर्यादायी जीवनासोबत फारकत घेत पर्यावरणाला हानी पोहचाविण्यार्या गोष्टींना विरोध दर्शवित, पर्यावरणाला पुरक गोष्टींच्या निर्मितीस प्रारंभ केला. गेली १७ वर्षे ते इको फ्रेंडली गणेशोत्सव डेकोरेशनसाठी लढा देत आहेत.
सरकारने पर्यावरणाचा ऱ्हास करणाऱ्या वस्तूंवर बंदी घालून त्यांच्या या लढ्याला खऱ्या अर्थाने बळ देण्याचे काम केले असून ही बंदी योग्य असल्याने नागरिकांनीही तिचे उत्स्फूर्त स्वागत केले आहे. सरकारच्या या निर्णयाविरोधात थर्माकॉल मखर निर्मिती कारखानदारांनी उच्च न्यालयात याचिका दाखल केली होती. त्या संदर्भात माननीय न्यायालयात नुकतीच या विषयावर सुनावणी झाली आहे. या सुनावणीचा नेमका काय निकाल लागतोय यावर सगळ्यांचे लक्ष लागले होते आणि हा निर्णय समाजकल्याण आणि पर्यावरणाच्या हिताने व्हावा अशी सगळ्यांचीच अपेक्षा होती.
नानासाहेब शेंडकरांच्या मतानुसार थर्माकॉलच्या मखरांची निर्मिती ही वेगवेगळे‘साचे’ वापरूनच करण्यात येते. यंत्रांचा वापर करून त्यावर रंगरंगोटी केली जात असल्याने या निर्मितीतून कलावंत हद्दपार झाले आहेत. आणि जर हा निर्णय वेगळा लागला असता तर बाजारात कारखानदारांकडून थर्माकॉलच्या डेकोरेशनचे थरच्या थर येऊन पडले असते आणि बाजारपेठा या थर्माकॉलने खचाखच भरून गेल्या असत्या. पर्यावरणाला बाधा आणणाऱ्या वस्तू वापरू नयेत असा विचार समाजात रुजत असतानाच जागरूक नागरिकांच्या मानसिकतेवरही त्याचा दूरगामी परिणाम झाला असता. इतक्या प्रयत्नांतून जनतेत रुजवलेले पर्यावरणवादी विचार पुसले गेले असते.आणि सरकारने तयार केलेल्या समाज सुधारणेच्या मूळ मुद्यालाही सुरुंग लागला असता अशी प्रतिक्रिया नानासाहेब यांनी बोलून दाखविली. तसेच या कचऱ्यामुळे पुन्हा आपले नदया - नाले, समुद्र किनारे थर्माकॉलच्या प्रदूषणाने पांढरेशुभ्र झाले असते, आणि थर्माकॉलच्या ढिगाऱ्याखाली सरकारी व्यवस्थापनाचाही फज्जा उडाला असता. इतके वर्ष केलेल्या परिश्रमांना जागरूक समाजाकुडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना हा निर्णय खूपच महत्वाची भूमिका बजावत आहे. आम्ही दिलेल्या लढ्याला अभूतपूर्व यश मिळाले असून आमचे प्रयत्न सफल झाले आहेत अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा