जेष्ठ साहित्यिक वसंत फेणे यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन
ज्येष्ठ साहित्यिक वसंत नरहर फेणे यांचं निधन झालं आहे. ते 92 वर्षांचे होते. खार येथील राहत्या घरी त्यांचं निधन झालं. त्यांच्या निधनाने साहित्यविश्वात कधीही न भरुन निघणारी पोकळी निर्माण झाली आहे. मुंबईतील जोगेश्वरीत जन्म झालेल्या वसंत फेणे यांचा प्रवास अत्यंत खडतर राहिला. मुंबई, कारवार आणि सातारा असा प्रवास करत वसंत फेणेंनी अनेक अडथळ्यांवर मात करत साहित्यविश्वात स्थान निर्माण केलं होतं.
वयाच्या चौथ्या वर्षी वडिलांचं निधन झाल्यानंतर वसंत फेणे यांना त्यांच्या आईने भावंडांसह कारवारला नेले. तिथे चौथीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर ते मोठ्या भावासोबत साता-याला आले. पण तिथून परत कारवार आणि मग तिथून मुंबई असा प्रवास त्यांनी केला. शिक्षणासाठी वसंत फेणेंना हा सर्व प्रवास करावा लागला. वसंत फेणेंनी मुंबईत आल्यानंतर राष्ट्र सेवा दलाशी स्वत:ला जोडून घेतले.
कथा आणि कादंबरी हे वसंत फेणेंच्या लेखनातील आवडते प्रकार होते. त्यांच्या ‘काना आणि मात्रा’ या कथासंग्रहाला महाराष्ट्र राज्य सरकारचा उत्कृष्ट वाङ्मयाचा पुरस्कार मिळाला आहे. ‘विश्वंभर बोलविले’ या कादंबरीसाठी ना. सी. फडके पुरस्कारानेही गौरव झाला. गेल्या वर्षी ‘शब्द – द बुक गॅलरी’च्या वतीने वसंत फेणे यांच्या एकूण साहित्यिक कारकीर्दीसाठी ‘भाऊ पाथ्ये साहित्य गौरव शब्द पुरस्कार’ देण्यात आला.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा